ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

खोपोली परिसरातील `रमाधाम’ वृद्धाश्रमाच्या पुनर्विकसित केलेल्या सुसज्ज वास्तूचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

अलिबाग:- ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या रमाधाम वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करताना ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ कायम फुलविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वांच्या आशीर्वादातून आणि सहकार्यातून प्रयत्न केला आहे, असे भावूक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे काढले.

खोपोली परिसरातील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमाच्या पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या नव्या सुसज्ज वास्तूचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सामना वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका रश्मी ठाकरे, डॉ. संजय उपाध्ये हे मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मुलांना संघर्ष करायला नको म्हणून प्रत्येक आई-वडील स्वतः काबाडकष्ट करतात. परंतु काळाच्या ओघात मुले त्यांची स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दूर जातात. अशा वेळी ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविता यावा, त्यांचे स्वतःचे घर असावे,आयुष्य असावे, त्यांना आधार असावा, वात्सल्य मिळावे यासाठी दूरदृष्टीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांनी रमाधाम उभे करण्याचे ध्येय बाळगले. ते पूर्ण केले. या वास्तूच्या पुनर्विकासानंतर येथील ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने आशिर्वादाने पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. हे करीत असताना स्व. बाळासाहेबांनी इथली निसर्गसंपदा टिकविण्याच्या सूचनेचे परिपूर्ण पालन करण्याची काळजी घेण्यात आली आहे. येथील प्रत्येक ज्येष्ठांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईलच तसेच या रमाधामची संकल्पना स्व.बाळासाहेबांनी व शिवसैनिकांनी जपली आहे, जोपासली आहे, यापुढे आपण सर्वांनी मिळून ती अशीच यशस्वीपणे जोपासू, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. तसेच या वास्तूच्या निर्मितीसाठी आणि पुनर्विकासासाठी रतन टाटा, जमनालाल बजाज ट्रस्ट, श्री. जिंदाल, श्री.मित्तल, सुप्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू, प्रमोद नवलकर,सुधाकर चुरी, अनिल देसाई, काकासाहेब, सुनील चौधरी, विजय शिर्के अशा अनेक व्यक्तींनी हातभार लावला, या सर्वांचे आभारही मानले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पद्मविभूषण खासदार शरद पवार, पद्मविभूषण रतन टाटा, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.

रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी रमाधामच्या जुन्या आठवणींना स्वतःच्या मनोगतातून उजाळा दिला.तर डॉ.संजय उपाध्ये यांनी आयुष्य कशाला म्हणायचे,मन प्रसन्न ठेवण्याचे महत्त्व, जगणं सुंदर कसे बनवावे याबद्दल अतिशय समर्पक शब्दात प्रबोधन केले.

सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी कवी वसंत बापट यांची “देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना” तसेच संत तुकारामांची “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती” ही गाथा ऐकविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page