पंतप्रधानांची `मन की बात’ प्रत्यक्षात आल्यास देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर!

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन कि बात’द्वारे संबोधित केले! त्याचे सविस्तर शब्दांकन देत आहोत! यावेळी पंतप्रधानांनी अनेक महत्वाचे मुद्दे देशवासियांसमोर मांडले. त्यांनी मांडलेला प्रत्येक मुद्दा देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनुकूल ठरणारे होते; म्हणूनच सविस्तर शब्दांकन दिले आहे. पंतप्रधानांची `मन की बात’ प्रत्यक्षात आल्यास देशाला प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही! -संपादक)

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन कि बात’ द्वारे केलेले संबोधन…

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! साधारणपणे या काळात सण-उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये लोकांमध्ये उमंग आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणा-या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळाच स्पर्श जाणवतोय. अगदी सरसकट पाहिल्यानंतर जे जाणवते ते म्हणजे, नागरिकांना आपल्या जबाबदारीचे, दायित्वाचे भान आले आहे. लोक आपली काळजी घेत आहेत, त्याचप्रमाणे रोजची कामे करीत आहेत आणि ते करताना दुस-यांना त्रास होवू नये, असेही त्यांना वाटतेय.

देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे. बहुतांश ठिकाणी पर्यावरणस्नेही गणेशाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, अगदी बारकाईने पाहिलं, तर एक गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे – आपले सण आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये एक दृढ नाते आहे. आपल्या प्रत्येक सण-उत्सवाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात जास्त मिळतो असा संदेश एकीकडे दिला जातो. आणि दुसरीकडे, आपले सगळे सण-उत्सव हे निसर्गाच्या रक्षणासाठीच साजरे केले जातात.

ज्याप्रमाणे बिहारमधल्या पश्चिमी चंपारणमध्ये अगदी युगांयुगांपासून थारू आदिवासी समाजाचे लोक ६० तासांचा लॉकडाउन अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘६० घंटे का बरना’चे पालन करतात. निसर्गाच्या रक्षणासाठी थारू समाजाने ‘बरना’ पाळणे आपल्या परंपरेचा भाग बनवले आहे आणि ही परंपरा ती मंडळी युगांपासून पाळत आहेत. या काळामध्ये गावामध्ये कोणी येत नाही. कोणी आपल्या घरामधून बाहेर पडत नाही. जर कोणी घराबाहेर पडले किंवा बाहेरून कोणी आले आणि लोकांनीही दैनंदिन कामकाज केले तर नवीन रोपांना-झाडांना नुकसान होवू शकते, असं हे लोक मानतात. ‘बरना’च्या प्रारंभी आपले सर्व आदिवासी बंधू-भगिनी एकत्र जमतात, मोठ्या प्रमाणावर पूजा-पाठ करतात आणि ज्यावेळी बरना समाप्ती होते त्यावेळी मोठ्या उत्साहात परंपरागत आदिवासी गीत, संगीत, नृत्य यांचा कार्यक्रम करतात.

मित्रांनो, या दिवसात ओणमचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण चिणगम महिन्यात येतो. या काळात लोक काही ना काही नवीन खरेदी करतात, आपल्या घरांची सजावट करतात, पक्क्लम बनवतात, ओणम-सादियाचा आनंद घेतात. वेगवेगळे खेळ, स्पर्धांचे आयोजनही केले जाते. ओणमचा उत्साह, आता दूर-सुदूर अगदी परदेशांमध्येही पोचला आहे. अमेरिका असो, यूरोप असो किंवा आखाती देश असो; ओणमचा उत्साह सगळीकडे पहायला मिळतोच. ओणम आता एक आंतरराष्ट्रीय सण बनत आहे.

मित्रांनो, ओणम आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत सण आहे. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नवीन वर्षाच्या प्रारंभाचा हा काळ असतो. शेतकरी बांधवांच्या शक्तीवरच आपले जीवन, आपला समाज चालतो. शेतकरी बांधवांच्या परिश्रमामुळेच आमचे सण-समारंभ रंगबिरंगी बनतात. आमच्या या अन्नदात्याला, बळीराजाच्या जीवनदायिनी शक्तीला तर वेदांमध्येही अतिशय गौरवपूर्ण पद्धतीने वंदन केले आहे.

ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे-

अन्नानां पतये नमः क्षेत्राणाम पतये नमः।

याचा अर्थ असा आहे की, अन्नदाता, तुला वंदन आहे, शेती करणा-याला नमस्कार असो.

आमच्या शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत सात टक्के वाढ झाली आहे. धानच्या रोपणीमध्ये जवळपास 10 टक्के, डाळींच्या पेराक्षेत्रामध्ये जवळपास 5 टक्के आणि इतर अन्नधान्याच्या पेरणीत जवळपास 3 टक्के, तेलबियांच्या क्षेत्रात जवळपास 13 टक्के, कपासमध्ये जवळपास 3 टक्के जास्त पेरणी झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोनाच्या या कालखंडामध्ये अनेक आघाड्यांवर देश लढतोय. त्याचबरोबर अनेक वेळा मनात असाही प्रश्न उपस्थित होतो की, इतक्या दीर्घ काळापर्यंत घरामध्ये राहून माझी छोटी-छोटी बालमित्रमंडळी वेळ कसा घालवत असतील? या प्रश्नाला उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. गांधीनगरची ‘चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी’ मुलांसाठी आगळे-वेगळे प्रयोग करते. भारत सरकारचे महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या सर्वांच्या सहकार्याने मिळून आम्ही मुलांसाठी नेमके काय करता येईल, यावर विचार मंथन केले, चिंतन केले. माझ्यासाठी हे करणे अतिशय सुखद होते. लाभकारीही होते. कारण या प्रक्रियेतून मलाही काहीतरी नवीन माहिती मिळाली, नवं शिकण्याची संधी मिळाली.

मित्रांनो, आमच्या चिंतनाचा विषय होता- मुलांची खेळणी, मुलांच्या खेळांच्या वस्तू आणि विशेषतः भारतीय खेळ. आम्ही या गोष्टींवर मंथन केले. भारतातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील, खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकेल, यावर आम्ही विचार मंथन केले. ‘मन की बात’ ऐकत असलेल्या मुलांच्या माता-पित्यांची मी आधीच क्षमा मागतो. कारण कदाचित आताची ही ‘मन की बात’ ऐकल्यानंतर खेळण्यांविषयीची नवीन मागणी येवू शकते आणि त्यांना एक नवीन काम लागू शकते.

मित्रांनो, कोणतेही खेळणे हे मुलांची अॅक्टिव्हिटी वाढवणारे असते. तसेच खेळणे आपल्या आकांक्षांना पंख लावणारेही असते. खेळणे केवळ मन रमवणारे किरकोळ साधन नाही. एखाद्या खेळण्यामुळे मन तयार होते, मुलांच्या मनामध्ये ध्येय निर्माण करण्याचे कामही होते. मुलांच्या खेळण्यांविषयी गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेले मी कुठंतरी वाचले आहे. टागोर म्हणाले होते की, जे खेळणे अपूर्ण आहे, ते सर्वात चांगले, उत्कृष्ट खेळणे असते. जे खेळणे अपूर्ण आहे आणि ते खेळणे मुलांनी मिळून खेळत-खेळत पूर्ण केले पाहिजे. गुरूदेव टागोर यांनी म्हटले होते की, ज्यावेळी ते लहान होते, त्यावेळी ते स्वतःच्या कल्पनेने, घरामध्येच असलेले सामान घेवून आपल्या मित्रमंडळींच्याबरोबर खेळणी आणि खेळ तयार करीत होते. परंतु, एक दिवस त्या बाळगोपाळांच्या मौज-मस्तीच्या क्षणांमध्ये मोठी मंडळी दाखल झाली. त्यांच्यातल्याच एका दोस्ताने एक मोठे आणि सुंदर, विदेशी खेळणे खेळण्यासाठी आणले. मित्र ते खेळणे घेवून ऐटीत मिरवत होता. त्यामुळं आता सर्व मित्रांचे लक्ष खेळामध्ये राहिलेच नाही तर त्या विदेशी खेळण्याकडे होते. प्रत्येकाच्या दृष्टीने खेळातली मौज संपली होती आणि ते खेळणे मात्र सर्वांना आकर्षित करीत होते. जो मुलगा कालपर्यंत अगदी सर्वांमध्ये मिळून मिसळून खेळत होता, सर्वांच्यामध्ये रहात होता, खेळामध्ये अगदी रममाण होत होता, तो मुलगा सर्वांपासून आता दूर राहू लागला. विदेशी खेळणे जवळ असलेल्या मुलाच्या मनात, एक प्रकारे इतर मुलांविषयी भेदाचा भाव निर्माण झाला. महागडे खेळणे आणण्यामध्ये काही विशेष नव्हते, तसंच त्यामध्ये शिकण्यासारखंही काही नव्हतं. फक्त एक आकर्षक रूप त्या खेळण्याचं होतं. त्या आकर्षक खेळण्याने एका उत्कृष्ट मुलाला कुठंतरी दाबून टाकलं, लपवून टाकलं, अगदी मलूल बनवून टाकलं. या खेळण्याने धनाचा, संपत्तीचा, मोठेपणाचा, बडेजाव यांचे प्रदर्शन तर केलं होतंच; परंतु त्या मुलाची निर्मिती क्षमता, सर्जकता संपुष्टात आणली. निर्मितीच्या प्रक्रियेला मिळणारे प्रोत्साहनच थांबवले होते. म्हणजे खेळणे मिळाले परंतु खेळ मात्र संपुष्टात आला होता. त्यामुळे मुलाचे खेळातून उमलणेही कुठं तरी हरवून गेले. म्हणूनच गुरूदेव म्हणत होते की, मुलांना त्यांचे बालपण जगता यावे, असे खेळणे हवे आहे, मुलांमधल्या सर्जकतेला वाव देणारे खेळणे असले पाहिजे. मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा प्रभाव पडत असतो. याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करतानाही खूप लक्ष देण्यात आले आहे. खेळ-खेळताना शिकणे, खेळणी-खेळ बनविण्‍यास शिकणे, ज्या ठिकाणी खेळणी बनवली जातात, त्या स्थानांना भेट देणे, या सर्व गोष्टींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.

मित्रांनो, आपल्या देशामध्ये स्थानिक खेळण्यांची अतिशय समृद्ध परंपरा आहे. अनेक प्रतिभाशाली आणि कुशल कलाकार आहेत, ही मंडळी अतिशय सुंदर खेळणी बनविण्यात पारंगत आहेत. भारताच्या काही भागामध्ये ‘टॉय क्लस्टर’ म्हणजेच ‘खेळणी केंद्र’ म्हणूनही विकसित करण्यात येत आहेत. कर्नाटकमध्ये रामनगरममध्ये चन्नापटना, आंध्र प्रदेशातल्या कृष्णा इथं कोंडापल्ली, तामिळनाडूतल्या तंजौर, आसाममध्ये धुबरी, उत्तर प्रदेशात वाराणसी, अशी अनेक ठिकाणांची नावे घेता येतील. जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षाही जास्त आहे, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. या सात लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा अतिशय कमी आहे. आता आपण विचार करा, ज्या देशाकडे इतकी समृद्ध परंपरा आहे, विविधता आहे, युवा लोकसंख्या आहे, तरीही खेळण्यांच्या बाजारपेठेत आपली भागीदारी अतिशय कमी आहे, ही चांगली गोष्ट वाटते का? नक्कीच नाही. हे ऐकूनही आपल्याला चांगले वाटणार नाही.

मित्रांनो, असं आहे पहा, खेळणी उद्योग अतिशय व्यापक आहे. गृह उद्योग असो, लहान आणि छोटा उद्योग असो, एमएसएमई असो, त्याच्या जोडीला मोठे उद्योग आणि खाजगी उद्योगांच्या क्षेत्रांमध्ये येतात. सर्वांना पुढे जाण्यासाठी देशात सर्वांनी मिळून प्रयत्न, परिश्रम केले पाहिजेत. आता ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये सी.व्ही. राजू आहेत, त्यांच्या गावातले `एति-कोप्पका खेळणे’ एकेकाळी अतिशय प्रचलित होते. या खेळण्याचे खास वैशिष्ट म्हणजे, ही खेळणी लाकडापासून बनविली जात होती. आणखी एक गोष्ट म्हणजे, या खेळण्यामध्ये आपल्याला कुठंही कोणत्याही प्रकारचा अँगल म्हणजेच कोन मिळत नाही. हे खेळणे सर्व बाजूंनी गोलाकार होती. त्यामुळे मुलांना खेळणे हाताळताना लागण्याची, इजा होण्याचीही शक्यता नव्हती. सी.व्ही राजू यांनी एति-कोप्पका खेळण्यासाठी, आता आपल्या गावातल्या कलाकारांना मदतीला घेवून एक नवीन मोहीमच सुरू केली आहे. सर्वात उत्तम दर्जाचे एति-कोप्पका खेळणे बनवून सी.व्ही. राजू यांनी स्थानिक खेळण्याला पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. खेळण्यांच्याबरोबरच आपण दोन गोष्टी करू शकतो – आपल्या गौरवशाली भूतकाळाला पुन्हा आपल्या जीवनात आणू शकतो आणि आपले स्वर्णिम भविष्यही निर्माण करू शकतो. मी आपल्या स्टार्ट-अप मित्रांना, आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की, ‘टीम अप फॉर टॉइज’-चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया! आता सर्वांसाठी ‘लोकल’-स्थानिक खेळण्यासाठी ‘व्होकल’ होण्याचा हा काळ आहे. चला, आपल्या छोट्या दोस्तांसाठी, काही नवीन प्रकारची, उत्तम दर्जाची खेळणी आपण बनवू या. ज्या खेळण्यामुळे मुलांचे बालपण समृद्ध होवून ती अधिक उमलून येईल, अशी खेळणी हवी आहेत. आपल्या पर्यावरणाला अनुकूल ठरतील, अशीच खेळणी आपण बनविणार आहोत.

मित्रांनो, याचप्रमाणे, आता संगणक आणि स्मार्टफोन यांच्या युगामध्ये कॉम्प्यूटर गेम्स खूप लोकप्रिय आहेत. हे खेळ मुलं तर खेळतातच आणि प्रौढही खेळत आहेत. परंतु या खेळांची जी थीम म्हणजे मूळ संकल्पना असते ती, बहुतांशी बाहेरची असते. आपल्या देशामध्ये कितीतरी कल्पना आहेत, कितीतरी संकल्पना आहेत, आपला इतिहास अतिशय समृद्ध आहे, मग आपण यांचा विचार करून असे कॉम्प्यूटर गेम्स तयार करू शकतो का? देशातल्या युवा मंडळींमध्ये असलेल्या प्रतिभेला माझे आवाहन आहे, आपणही असेच गेम्स भारतामध्ये बनवावेत आणि भारतीय संकल्पनेवर हे खेळ असावेत. असं म्हणतात की, ‘लेट द गेम्स बिगीन’! चला तर मग, खेळ सुरू करू या!!

मित्रांनो, आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आभासी खेळ असो खेळण्यांचे क्षेत्र असो, सर्वांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे आणि ही एक संधीही आहे. आजपासून शंभर वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळी असहकाराचे आंदोलन सुरू झाले, त्यावेळी गांधीजींनी लिहिले होते की, ‘‘ असहकार आंदोलन, देशवासियांमध्ये आत्मसन्मान आणि आपल्यामधल्या शक्तीचा परिचय करण्यासाठी एक प्रयत्न आहे.’’

आज, ज्यावेळी आपण देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यावेळी आपण सर्वांनी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. असहकार आंदोलनाच्या रूपातून ते बीजारोपण झाले होते, त्याला आता, आत्मनिर्भर भारताच्या वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतीयांच्या नवसंकल्पना आणि पर्याय देण्याची क्षमता अतिशय कौतुकास्पद आहे. आणि ज्यावेळी समर्पण भाव असेल, संवेदना असेल, तर ही एक- असीम शक्ती बनते. या महिन्याच्या प्रारंभीच, देशातल्या युवकांच्या समोर एक ‘अप्लिकेशन इनोव्हेशन चॅलेंज’ ठेवण्यात आले होते. या आत्मनिर्भर भारत अॅप नवसंकल्पना आव्हानाला आपल्या युवकांनी अतिशय उत्साहाजनक प्रतिसाद दिला. जवळपास सात हजार प्रवेशिका आल्या. त्यामध्ये जवळपास दोन तृतीयांश अॅप्स दुस-या आणि तिस-या श्रेणीतल्या शहरांमधल्या युवकांनी बनवले आहेत. हा आत्मनिर्भर भारतासाठी, देशाच्या भविष्यासाठी एक शुभ संकेत आहे. आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंजचा निकाल पाहून तुम्ही सर्वजण नक्कीच प्रभावित होणार आहे. अनेक प्रकारे तपासणी-पडताळणी केल्यानंतर वेगवेगळ्या वर्गांमध्ये जवळपास दोन डझन अॅप्सना पुरस्कारही देण्यात आले आहेत. आपण सर्वांनी या अॅप्सची माहिती घ्यावी आणि जरूर त्यांच्याशी जोडले जावे. कदाचित आपल्याला असे नवीन, वेगळे, उपयुक्त अॅप बनविण्याची प्रेरणा मिळू शकेल. यामध्येच एक अॅप आहे- कुटुकी! हे लहान मुलांच्या शिक्षणासाठी अॅप आहे. लहान मुलांशी संवाद साधणारे अॅप आहे. त्यामध्ये गाणी आणि कथा यांच्या माध्यमातून गप्पागोष्टी करीत मुलांना गणित आणि विज्ञान हे विषयातले खूप काही शिकवले जाते. यामध्ये अॅक्टिव्हिटी आहे, खेळही आहे. याचप्रमाणे एक मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचेही अॅप आहे. त्याचे नाव आहे ‘कूकू’ यामध्ये आपण आपल्या मातृभाषेमध्ये मजकूर, व्हिडिओ आणि ऑडिओ यांच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचे आहे, ते मांडू शकतो. संवादही साधू शकतो. याचप्रमाणे चिंगारी अॅपही युवा वर्गामध्ये चांगलेच लोकप्रिय होत आहे. एक अॅप आहे- ‘आस्क सरकार’ यामध्ये चॅट बोटच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता आणि कोणत्याही सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेवू शकता. मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओ, या तीनही प्रकारांमध्ये ही माहिती मिळू शकते. हे अॅप आपल्याला खूप मदत करू शकते. आणखी एक अॅप आहे- स्टेप सेट गो. हे फिटनेस अॅप आहे. आपण नेमके किती चाललो, किती कॅलरीज बर्न झाल्या, यांचा सगळा हिशेब हे अॅप ठेवते. आपल्याला तंदुरूस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कामही अॅप करते. ही स्पर्धा जिंकणारी अशी अनेक अॅप्स आहेत. इथं मी काही उदाहरणे दिली आहेत. काही व्यावसायिक अॅप्स आहेत. गेम्सचे अॅप आहे. यामध्ये ‘इज इक्वल टू’, ‘बुक्स अँड एक्सपेंन्स’, ‘जोहो’, ‘वर्कप्लेस, एफटीसी टॅलेन्ट, आपण सर्वांनी याविषयी नेटवर सर्च करावे, तुम्हांला खूप माहिती मिळेल. आपणही असे अॅप बनविण्यासाठी पुढे यावे. नवीन काही करावे. आपण केलेले प्रयत्न आजचे लहान-लहान स्टार्ट अप्स उद्या मोठ-मोठ्या कंपनीत रूपांतरित होतील आणि जगामध्ये भारताची एक वेगळीच ओळख बनेल. आणखी एक आज संपूर्ण जगामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला दिसत आहेत, त्याही कोणे एके काळी अशाच स्टार्टअप होत्या, हे तुम्ही कधीच विसरू नका.

प्रिय देशवासियांनो, आपल्याकडे लहान मुले, आमचे विद्यार्थी, आपली संपूर्ण क्षमता दाखवू शकतील, आपले सामर्थ्‍य दाखवू शकतील, यासाठी सर्वात मोठी भूमिका असते ते पौष्टिकतेची! त्यांना मिळणा-या पोषणाची! संपूर्ण देशामध्ये सप्टेंबर महिना ‘पोषण माह’ म्हणून पाळण्यात येणार आहे. नेशन आणि न्यूट्रिशन यांचा अगदी खोलवर संबंध आहे. आमच्याकडे एक वाक्प्रचार प्रचलित आहे- ‘यथा अन्नम तथा मन्नम’’ म्हणजेच जसे अन्न ग्रहण केले जाते तसाच आमचा मानसिक आणि बौद्धिक विकासही होत असतो. तज्ज्ञ सांगतात की, अर्भकाला गर्भामध्ये असताना आणि बालपणी जितके चांगले पोषण मिळेल, तितका त्याचा चांगला मानसिक विकास होतो आणि ते बाळ स्वस्थ राहते. लहान मुलांच्या पोषणासाठी मातेलाही चांगला पोषक आहार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पोषण अथवा न्यूट्रिशन याचा अर्थ आपण काय खातो, किती खातो आणि कितीवेळा अन्न ग्रहण करतो, इतकाच मर्यादित नाही. तर याचा अर्थ आहे, आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नातून मिळत आहेत का? हे पाहणे. आपल्याला आयर्न, कॅलशियम मिळते की नाही, सोडियम मिळते की नाही, व्हिटॅमिन्स मिळतात की नाही. या सर्वांचे पोषणामध्ये अतिशय महत्व आहे. पोषक आहार आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग असणे महत्वाचे आणि जरूरी आहे. जन-भागीदारीच हे आंदोलन यशस्वी करू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये या दिशेने आपल्या देशात अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. विशेष करून आपल्या ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सहभागाने हे जन आंदोलन बनविण्यात येत आहे. पोषण सप्ताह असो, पोषण महिना असो, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागरूकता निर्माण केली जात आहे. शाळांना यामध्ये जोडण्यात आले आहे. मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. पोषणाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ज्याप्रमाणे एक वर्गामध्ये मॉनिटर असतो, त्याप्रमाणे न्यूट्रिशन मॉनिटरही असावा, प्रगती पुस्तकाप्रमाणे ‘न्यूट्रिशन कार्ड’ही बनविण्यात यावे, अशा गोष्टींनाही प्रारंभ करण्यात येत आहे. पोषण माह- न्यूट्रिशन मंथ’ या काळामध्ये माय गव्ह पोर्टलवर एक ‘फूड अँड न्यूट्रिशन क्विज’ आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक मीम (meme) स्पर्धाही होणार आहे. आपण सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा आणि इतरांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

मित्रांनो जर आपल्याला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ स्मारकाला भेट देण्याची संधी मिळाली असेल तर तुम्ही पाहिले असेलच.आता कोविडनंतर हे स्मारक पर्यटकांच्या भेटीसाठी पुन्हा उघडले जाणार आहे, त्यावेळी जाण्याची संधी मिळाली तर तिथं एक अगदी वेगळे, अव्दितीय न्यूट्रिशन पार्क बनविण्यात आले आहे, ते पहा. अगदी खेळा-खेळातून न्यूट्रिशनविषयी शिक्षण मिळते. अगदी सहजतेने ज्ञान देणे, हे जणू आनंदाचे काम बनवले आहे, आपण सर्वजण हे पार्क जरूर पाहू शकता.

मित्रांनो, भारत एक विशाल देश आहे. आपल्याकडे खाद्यशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळे सहा ऋतू असतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिथल्या हवामानानुसार अनेक वेगवेगळ्या गोष्टीं तयार होतात, उगवतात; म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातल्या हवामानाचा विचार करून तिथल्या ऋतुमानानुसार स्थानिक भोजन आणि तिथेच उगवणारे अन्न, फळे, भाज्या यांच्यानुसार एक पोषक, पोषण द्रव्यांनी समृद्ध असे आहार नियोजन केले जाते. आता ज्याप्रमाणे मिलेटस म्हणजे धान्य आहे- यामध्ये रागी आहे, ज्वारी आहे, ही धान्ये अतिशय उपयोगी आणि पोषक आहारात येतात. सध्या एक ‘‘भारतीय कृषी कोष’’ तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणती पिके, उत्पादित होतात, त्यांच्यामध्ये किती पोषण मूल्य आहे, याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयोगी कोष ठरणार आहे. चला तर मग, या पोषण महिन्यामध्ये पौष्टिक अन्नाचे सेवन करणे आणि स्वस्थ राहण्यासाठी आपण सर्वाना प्रेरित करूया.

प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला, त्यावेळी एका अतिशय रंजक बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. ही बातमी आहे, आपल्या सुरक्षा दलातल्या दोन अतिशय धाडसी सदस्यांविषयी आहे. एक आहे सोफी आणि दुसरी विदा. सोफी आणि विदा हे दोन्ही भारतीय लष्कराचे श्वान आहेत. आणि त्यांना ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सोफी आणि विदा यांना हा सन्मान यासाठी देण्यात आला की, त्यांनी आपल्या देशाचे रक्षण करताना, आपले कर्तव्य अतिशय उत्कृष्टेने पार पाडले आहे. आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत. हे देशासाठी जगतात आणि देशासाठी आपले बलिदानही देतात. कितीतरी बॉम्बस्फोटांना, कितीतरी दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्वपूर्ण काम या बहादूर श्वानांनी केले आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका किती महत्वाची असते, याची माहिती अगदी विस्ताराने घेण्याची संधी, मला काही दिवसांपूर्वीच मिळाली. यावेळी अनेक किस्सेही मी ऐकले.

एका बलराम नावाच्या श्वानाने २००६ मध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, स्फोटके शोधून काढली होती. २००२ मध्ये भावना या श्वानांनी आयईडी शोधून काढले. आयईडी काढण्यात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि त्या स्फोटामध्ये हे श्वान शहीद झाले. दोन-तीन वर्षापूर्वी छत्तीसगडमधल्या बीजापूर इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक ‘स्नीफर’श्वान क्रॅकर हा सुद्धा आयईडी स्फोटामध्ये शहीद झाला होता. काही दिवसांपूर्वी कदाचित आपण सर्वांनी टी.व्ही. वर एक खूप भावुक करणारे दृश्य पाहिले असेल; त्यामध्ये बीड पोलिसांनी आपला साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला होता. या रॉकीने ३०० पेक्षा जास्त गुन्हे प्रकरणांची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत केली होती.

आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यामध्येही श्वान खूप मोठी भूमिका पार पाडतात. भारतामध्ये तर राष्ट्रीय आपत्ती कृती दल- एनडीआरएफमध्ये अशा डझनभर श्वानांना विशेष प्रकारे प्रशिक्षित केले जाते. कुठे भूकंप आल्यानंतर, इमारत कोसळल्यानंतर, ढिगा-याखाली गाडले गेलेल्या जीवित लोकांना शोधून काढण्यात हे श्वान अतिशय तज्ज्ञ असतात.

मित्रांनो, भारतीय वंशाचे श्वानही अतिशय चांगले असतात, सक्षम असतात, अशी माहितीही मला सांगण्यात आली. भारतीय जातीमध्ये मुधोल हाउंड आहे, हिमाचली हाउंड या खूप चांगल्या जाती आहेत. राजापलायम, कन्नी, चिप्पीपराई आणि कोम्बाई या भारतीय जातीचे श्वानही चांगले आहेत. यांच्या पालनपोषणाचा खर्चही तुलनेने कमी असतो आणि हे श्वान भारतीय वातावरणात सामावलेही जातात. आता आपल्या सुरक्षा संस्थांनी या भारतीय वंशाच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकामध्ये समाविष्ट करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या काही काळामध्ये लष्कर, सीआयएसएफ, एनएसजी यांनी मुधोल हाउंड श्वानांना प्रशिक्षित करून श्वान पथकामध्ये सहभागी करून घेतले आहे. सीआरपीएफने कोम्बाई श्वानांना सहभागी करून घेतले आहे. भारतीय कृषी संशोधन मंडळाच्यावतीनेही भारतीय वंशाच्या श्वानांवर संशोधन करण्यात येत आहे. यामागे उद्दिष्ट असे आहे की, भारतीय जातीच्या श्वानांना अधिक चांगले बनवून त्यांना उपयोगी करणे. तुम्ही इंटरनेटवर श्वानांच्या या नावांचा शोध घेतला तर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. या प्राण्यांचे देखणे रूप, त्यांच्यामध्ये असलेले गुण पाहून तर तुम्हाला खूप नवल वाटेल. जर तुम्ही कुत्रे पाळण्याचा विचार करणार असाल,तर यापैकीच कोणत्याही भारतीय वंशाच्या श्वानाला आपल्या घरी घेवून या. आत्मनिर्भर भारत, हा ज्यावेळी जन-मनाचा मंत्र बनतोय तर मग, कोणतेही क्षेत्र यातून मागे सुटून कसे काय चालणार!

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनीच म्हणजे पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करणार आहे. सर्वजण आपल्या जीवनातल्या यशाला, तसंच आपल्या जीवन प्रवासाकडे पाहतात, त्यावेळी त्यांना आपल्या कोणत्या ना कोणत्या शिक्षकाचे नक्कीच स्मरण होते. अतिशय वेगाने काळ बदलतोय आणि या कोरोना संकट काळामध्ये तर आपल्या शिक्षकांच्या समोर परिवर्तनाचे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आपल्या सर्व शिक्षकांनी या आव्हानाला समस्या न मानता, त्याचा संधी म्हणून स्वीकार केला, याचा मला आनंद वाटतो. शिक्षणामध्ये आता तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग होत आहे. यासाठी नवीन पद्धतीचा स्वीकार त्यांनी केला आहे. विद्यार्थी वर्गाला कशी मदत करता येईल, याचा विचार आपल्या शिक्षकांनी सहजतेने केला आणि त्या पद्धतीचा स्वीकार करून मुलांना शिकवले. आज देशामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी नवसंकल्पना रूजते आहे. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून काहीतरी नवीन करीत आहेत. ज्या प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक मोठे परिवर्तन घडून येत आहे, त्याचा लाभ विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे शिक्षक अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे.

मित्रांनो आणि विशेष करून माझ्या शिक्षक साथीदारांनो, वर्ष २०२२ मध्ये आपला देश स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करणार आहे. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी अनेक वर्षांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. या काळामध्ये देशासाठी प्राणाचे बलिदान करणारे महान पुत्र देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात आहेत. या महान पुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे. आजच्या पिढीला, आमच्या विद्यार्थी वर्गाला, स्वातंत्र्याच्या लढ्यातल्या महान नायकांच्या परिचय करून देणे, या वीरपुत्रांची माहिती देणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळामध्ये नेमके काय घडले, ते आंदोलन कसे केले, त्यावेळी कोणी हौतात्म्य पत्करले, किती जण त्यावेळी कारागृहामध्ये होते, या सर्व गोष्टी आजच्या विद्यार्थी वर्गाने जाणल्या तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा नक्कीच प्रभाव पडेल. यासाठी अनेक कामे करणे सहज शक्य आहे. ही मोठी जबाबदारी आमच्या शिक्षकांची आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या जिल्ह्यामध्ये गेल्या शताब्दीमध्ये स्वातंत्र्य लढ्याविषयी कोणती घटना घडली? याविषयी विद्यार्थी वर्गाकडून संशोधन करून घेणे शक्य आहे. त्या घटनेविषयीची माहिती शाळेच्या हस्तलिखित अंकाच्या रूपामध्ये तयार करणे शक्य आहे. आपल्या शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा ज्याच्याशी संबंध आहे, असे कोणते स्थान असेल तर त्या स्थानी विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेवून जाता येईल. कोणा एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्‍यांनी निश्चय करावा आणि स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त या लढ्यातल्या ७५ नायकांवर कविता, नाट्य, कथा लेखन करण्यात यावे. तुम्ही असे प्रयत्न केले तर देशातल्या हजारो, लाखो, अनामिक नायकांचा महान त्याग लोकांसमोर येवू शकेल. या महान राष्ट्रपुत्रांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीमध्ये गेली आहेत, त्यांनी देशासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. अशा महान व्यक्तिमत्वांना आपण लोकांसमोर आणले तर स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी त्यांचे स्मरण करून त्यांना ख-या अर्थाने श्रद्धांजली अर्पण होवू शकेल. आता ज्यावेळी दिनांक ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करीत आहोत, त्यावेळी मी माझ्या शिक्षक साथीदारांना आग्रह करू इच्छितो की, त्यांनी यासाठी एक प्रकारे वातावरण निर्मिती करावी, सर्वांना जोडावे आणि सर्वांनी मिळून हे कार्य करावे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, देश आज ज्या विकास मार्गाने वाटचाल करीत आहे, त्या मार्गामध्ये या देशाचा प्रत्येक नागरिक ज्यावेळी सहभागी होईल, त्यावेळी वाटचालीचे यश सुखद ठरणार आहे. या यात्रेचा यात्रिक व्हावे आणि या मार्गा वर सर्वांनी पांथस्त व्हावे; यासाठी या देशाचा प्रत्येक नागरिक आरोग्यदायी असला पाहिजे, सुखी झाला पाहिजे. आपण सर्वजण मिळून कोरोनाची लढाई पूर्णपणे जिंकणार आहे. कोरोनाला हरवणार आहोत. ज्यावेळी आपण सुरक्षित असणार आहे, त्याचवेळी कोरोना हरणार आहे. ज्यावेळी आपण एकमेकांमध्ये दोन गज अंतर राखणार आहे, मास्क वापरणार आहे, त्याचवेळी कोरोना हरणार आहे. या संकल्पाचे पूर्णतेने सर्वांनी पालन करावे. आपण सर्वांनी स्वस्थ रहावे, सुखी रहावे, या शुभभावनेबरोबरच पुढच्या ‘मन की बात’ मध्ये पुन्हा भेटूया!

खूप खूप धन्यवाद! नमस्कार!!