भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई:- बळ, बुध्दी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरु कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

‘विश्व मैत्री दिवस : क्षमापन समारोह’ कार्यक्रमाचे आयोजन भारत जैन महामंडळाच्या वतीने बिर्ला मातोश्री सभागृह, न्यु मरिन लाईन्स येथे करण्यात आले होते. यावेळी आरबीआयचे डेप्युटी गर्व्हनर एम.के.जैन, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के.तातेडजी, बँक ऑफ बडोदा बँकेचे कार्यकारी संचालक एस. एल.जैन, १०८ मुनिश्री प्रमुख सागरजी, महासती कंचनकंवरजी, साध्वी कैलाशवतीजी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म, जाती, पंथ आहेत पण भारतीय म्हणून विचार केल्यास कुठलीही जात, धर्म, पंथ न मानता सर्व समाज हा भारतीय होऊन जातो.

अनेक ऋषी, मुनी, महात्मे यांच्या कठोर तपस्येमुळे देशाची निरंतरपणे प्रगती होत आहे. देशातील आर्य कालापासून ज्ञानाची प्रथा चालत आलेली आहे. समाजातील अनेक धर्माचे लोक विविध देशातून शिक्षण घेत असून या माध्यमातून ज्ञान प्राप्त करत आहेत. हे ज्ञान आता पूर्ण विश्वात पसरत आहे.

सूर्य जसा जाती-पाती, धर्म, वंश न मानता सर्वांना समान प्रकाश देतो त्याचप्रकारे देशात जाती-पाती उच्च निच्च न मानता सर्व समान आहेत. क्षमा हे वीर माणसाचे भूषण असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने वीर बना असेही त्यांनी यावेळी सांगितले. ऋषी, मुनीचा आशीर्वाद आणि उच्च आदर्शामुळे देश सशक्त व समर्थ बनेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रिटीश पार्लमेंटच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भारत गौरव पुरस्काराने मोतीलाल ओसवाल व देवेंद्र भाई यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page