सिंधुदुर्गात १० ते १५ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा; दक्षतेच्या सूचना!
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात ११ जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दि. १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.
सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी व त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन करावे. शोध व बचावाची सामग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी. १० जून ते ११ जून या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडू नये. बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित बाजूला करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजनची वाहतूक करणारे मार्ग अखंडितपणे सुरू राहतील, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. बंदर विभागाने अतिवृष्टीच्या कालावधीतील भरती – ओहोटीच्या तारखा जिल्हा व तालुका प्रशासनास उपलब्ध करून द्याव्यात. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी व डीसीएचच्या ठिकाणी पावसाचे पाणी जावून रुग्णांना त्रास होणार नाही; याची दक्षता घ्यावी. सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच या ठिकाणी अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहील; यासाठी नियोजन करावे. तसेच कोविड केंद्रांसाठी जनरेटर उपलब्ध करून ठेवावेत. महसूल व पोलीस विभाग यांनी आपल्या ताब्यातील बोटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला – 02362-228847 या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी.
जिल्ह्यात 10 व 11 आणि 12 ते 15 जून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
नागरिकांनी दक्षता घ्यावी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दि. 10 व 11 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच 12 जून ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. या कालावधीत नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने केले आहे.
विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.
* संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.
* दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
* नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
* घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
* विजेच्या खांबांपासून लांब रहावे.
* उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
* एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
* धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी
* आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
*अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रावास करु नका.
*घरा बाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्तेवाहतुकीची आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.
*पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तुंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
* हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी. तसेच टीव्ही, रेडिओ इ. वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा.
*कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कोणत्याही बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 – 228847 किंवा टोल फ्री क्रमांक – 1077 या क्रमांवर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.
* अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे.
* आपतकालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण रहात असल्यास प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
* पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपतकालीन परिस्थितीत उद्भवल्यास त्याबाबत जागरूक रहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
* जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जाऊ नये.
* अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी – नाले इत्यादी ठिकाणी जाऊ नये.
* अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वाहन चालवताना आवश्यकती काळजी घेण्यात यावी.
* पुराच्या पाण्यात, समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपतकालिन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.
* हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.
*मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष- 02362-228847 किंवा टोल फ्री – 1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी – 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी – 02363-272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी – 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी – 02362-222525, मालवाण तालुक्यासाठी – 02365-252045,कणकवली तालुक्यासाठी – 02367-232025, देवगड तालुक्यासाठी- 02364-262204, वैभवाडी तालुक्यासाठी – 02367-237239, या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.