लाखोचा गंडा घालणाऱ्या महिलेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

देवगड:- शेअर मार्केटमध्ये दर महिना चांगला परतावा देणारी गुंतवणूक स्किम असल्याचे आमिष दाखवून देवगड, जामसंडे शहरातील महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देवगड- पवनचक्की येथील श्रद्धा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (३६) या संशयित महिलेला जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संशयित महिलेच्यावतीने ॲड. कौस्तुभ मराठे व ॲड.  गिरीश भिडे यांनी काम पाहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित श्रद्धा मोंडकर हिने देवगड व जामसंडे शहरातील पाच महिलांची सुमारे १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद देवगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार देवगड पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. देवगड न्यायालयाने संशयित महिलेला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित महिलेच्या पोलीस कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ केली. बुधवारी पुन्हा संशयित श्रद्धा मोंडकर हिला जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित श्रद्धा मोंडकर हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.

error: Content is protected !!