महामार्गासंबधीत समस्या तातडीने मार्गी लावण्याची लेखी हमी

सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचे उपोषण मागे

तळेरे (वार्ताहर):- येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांकडे महामार्ग ओलांडून तसेच महामार्गालगत चालत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्या; ह्या आग्रही मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी वामनराव महाडिक विद्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाकडून शासनस्तरावर दाखल झाल्याची लेखी पोच मिळाल्यानंतर तसेच तळेरे येथील महामार्गासंबधीत इतर प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्याची लेखी हमी मिळाल्यावर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषणाच्या पहिल्या दिवशी पोलिस यंत्रणा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे खारेपाटण उपविभागीय अभियंता एस. एस्. शिवनिवार व त्यांचे सहकारी डी. जी. कुमावत हे उपोषणस्थळी आले असता उपोषणकर्ते राजेश जाधव, जि. प. सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्य दिलीप तळेकर, उल्हास कल्याणकर यांनी आक्रमकपणे प्रश्नांचा भडीमार करून अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्य कर्तव्याबाबत जाब विचारला व निरुत्तर केले. तसेच जोपर्यंत विद्यार्थी सुरक्षिततेच्या प्रश्नांबाबत योग्य ती कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाऊन त्याचे लेखी पुरावे मिळत नाहीत, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते राजेश जाधव यांनी केला. तसेच या निर्णयाचे समर्थन उपोषणकर्ते राजेश जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या तळेरे व पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी केले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हातानेच मागे परतावे लागले.

अखेर उपोषणकर्ते राजेश जाधव व ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून सुस्तावलेली प्रशाकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व ताबडतोब पुढील कामाला लागली. मात्र या सर्व प्रकरणात दोनच दिवसापूर्वी बढतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे खारेपाटण उपविभागीय अभियंता म्हणून पदभार स्वीकारलेल्या एस. एस्. शिवनिवार यांना मागील उपअभियंता यांच्या कर्तव्य कसुरीमुळे नाईलाजाने ग्रामस्थांच्या रोषास समोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी परिस्थितीचे व वस्तुस्थितीचे गांभिर्य ओळखुन उपोषणाच्या मागणीनुसार तातडीने विद्यार्थ्यांकरीता पादचारी पुलाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार केला व तो वरीष्ठ स्तरावर मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही तातडीने सुरु केली.

तसेच उपोषणाच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक संकुलांच्या ठिकाणी महामार्गालगत सुरक्षा रक्षक कठडे, सर्विस रस्ता, योग्य ते फलक, रबरी व प्लास्टीक गतीरोधक इ. आवश्यक त्या उपायोजना करण्याचे लेखी आश्वासन देऊन त्याबाबतच्या कामास सुरुवात केली. त्यामुळे आज सायंकाळी उपोषणाच्या मागणीनुसार आवश्यक ते लेखी पुरावे घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खारेपाटण उपविभागाचे डी. जी. कुमावत उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांचेसह उपोषणकर्ते राजेश जाधव व ग्रामस्थ यांनी सकारात्मक चर्चा करून सहमतीने उपोषण स्थगीत करण्याचा निर्णय घेतला.

तथापी, जरी उपोषण स्थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी दिलेल्या लेखी आश्वासनांच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करण्यास कुचकामी व वेळकाढू धोरण अवलंबल्यास व त्यामुळे तळेरे येथील शैक्षणिक संकुलांकडे पायी ये-जा करणा-या विद्यार्थ्यांच्या बाबतीत महामार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल. तसेच तळेरे येथे महामार्ग चौपदरीकरण कामकाजामुळे निर्माण झालेले व दुर्लक्षित प्रश्न येत्या महिन्याभरात सोडविण्याची संपुर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असेल. त्यामुळे या जबाबदा- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विहीत मुदतीत पार न पाडल्यास त्याकरीता यापुढे उपोषणाचा मार्ग न अवलंबता संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही प्रस्तावीत करण्याबाबत नियमोचित पाऊल उचलले जाईल, असा सज्जड इशारा उपोषणकर्ते राजेश जाधव यांनी दिला.

यामध्ये प्रामुख्याने जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती तथा जि.प.सदस्य बाळा जठार, माजी पं. स. सभापती दिलीप तळेकर, दारूम सरपंच सुनिंद्र सावंत, माजी सरपंच विनय पावसकर, प्रविण वरुणकर, शशांक तळेकर, उल्हास कल्याणकर, राजकुमार तळेकर, मुख्याध्यापक- शिवाजी नलगे, उपसरपंच दिनेश मुद्रस, निलेश तळेकर, अरविंद महाडिक, दादा तळेकर, हनुमंत तळेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उदय दुदवडकर, अमोल सोरप, बली तळेकर, निलेश सोरप, सुयोग तळेकर, शैलेश सुर्वे, सतिश मदभावे, प्रा.हेमंत महाडिक, रोहित महाडिक, प्रकाश आंबेरकर, दिपक तेली, आदीसह शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page