मित्रत्व आणि माणुसकी जपणाऱ्या मित्राला सलाम!

श्री. राजेंद्र नामदेव लोके यांची पोलीस उप-निरीक्षक पदी नियुक्ती

सन्मानिय श्री. राजेंद्र नामदेव लोके (असलदे मधलीवाडी, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग) यांची पोलीस उप-निरीक्षक या पदावर (साकीनाका पोलीस स्टेशन, मुंबई) नियुक्ती झाली असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

पोलीस उप-निरीक्षक श्री. राजेंद्र नामदेव लोके यांचे वडील बृहन्मुंबई पोलीस दलात होते. ते मे- १९९७ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. वडिलांचा आदर्श पाहून श्री. राजेंद्र लोके यांनी देखील आपणही पोलीस खात्यात सेवा करायची हे ध्येय बालपणापासूनच पक्के केले होते. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आणि सन १९८९ साली तर बृहन्मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांची पोलीस दलात ३२ वर्षे निष्कलंक सेवा झालेली आहे. सन २००४ मध्ये एका मर्डर केसच्या तपासात त्यांनी वरिष्ठांच्या सहकार्याने विशेष भूमिका निभावली आणि त्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली होती. त्यावेळी मराठी ई टीव्हीवर त्यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात लोके साहेबांनी आपले सेवाकार्य मोठ्या धीराने, हिंमतीने पार पाडले. त्यांनी पोलीस दलात अशाप्रकारे आदर्शवत-कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे; त्याचा आम्हा मित्रपरिवाराला-नातेवाईकांना अभिमान आहे.

मुळातच लोके साहेब खरेखुरे कलाकार! वारकरी संप्रदायातील भजन असो व संगीत भजन असो; लोके साहेबांचा भजन अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी जिथे जिथे भजन असेल तिथे हजर राहून प्रत्यक्ष सहभागी होण्याची त्यांची आवड आम्ही सगळ्यांनी पहिली आहे. आतातर त्यांनी शास्त्रीय गायन, नाट्य संगीत गायन आणि सिनेमा गीत ,गायन करून त्यातही आपली गायकी सिद्ध केली आहे. खाकी वर्दीतील हा कलाकार आपल्या पोलीस दलाचं प्रतिनिधित्व करून आपल्या गावाचे, समाजाचे  नाव उज्वल केलेलं आहे आणि आता सुध्दा करत आहेत.

आमचे परममित्र श्री. राजेंद्र लोके यांचा मित्र परिवारही खूप मोठा आहे. कारण त्यांनी मित्र जपले! हसऱ्या चेहऱ्याने ते नेहमीच सर्वांचे स्वागत करतात. प्रत्येकाशी प्रेमाने बोलतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारा मनुष्य त्यांच्या सहजपणे प्रेमात पडतो, त्यांचा मित्र होतो. कला जोपासत असताना त्यांनी पोलीस दलातील सेवेला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. `जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हे उद्दीष्ठ ठेवल्याने त्यांची ३२ वर्षाची निष्कलंक सेवा झाली आहे. गावातील प्रत्येक सामाजिक, आध्यत्मिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग असतो.

सन २०१३ मध्ये त्यांनी खात्यांतर्गत पोलीस उप-निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती; त्यात ते यशस्वी झाले होते. परंतु प्रशासकीय कामकाजामुळे त्यांची नियुक्ती होण्यास विलंब झाला. श्री गणरायाच्या आगमनानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी श्री. राजेंद्र लोके यांचे पोलीस उप- निरीक्षक या पदी नाव घोषित झाले. त्याच्या आधी ऑगस्ट महिन्यात त्यांचे लहान बंधू सन्माननिय श्री. संजय लोके यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती झाली होती. हा त्यांच्या सर्व कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे.

श्री. राजेंद्र लोके हे पोलीस सेवा सांभाळताना त्यांना त्यांचा पत्नीचा खूप मोठा पाठींबा असून त्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याही सांस्कृतिक- सामाजिक क्षेत्रात नेहमीच क्रियाशील असतात. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा!

श्री. राजेंद्र व संजय लोके यांची आजी सुद्धा अनुभव संपन्न `सुईण’ होत्या. ४०-४५ वर्षांपूर्वी गावामध्ये बाळंतपण घरातच व्हायचे. सुईणीच्या मार्गदर्शखाली! त्या आजीने गावातील खूप स्त्रियांची बाळंतपणात सुखरूपपणे सोडवणूक केली. ही खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी होती. ती सामाजिक बांधिलकी लोके कुटुंबिय आजही जोपासत आहेत. राजेंद्र-संजय ह्या बंधूनी पोलीस दलात प्रामाणिकपणे व इमाने-इतबारे काम करत असल्याची पोचपावती त्यांनी त्यांच्या प्रमोशन द्वारे दिलेली आहे. त्यात त्यांच्या आई- वडीलांचा, पत्नींचा, मुलांचा सहभागही मोलाचा आहे.

श्री. राजेंद्र लोके हे दिनांक २८/१०/२०२१ रोजी पोलीस उप-निरीक्षक या पदावर रुजू झाले. त्यांना प्रतिक्रिया विचारली, ती खूप महत्वाची आहे. ते म्हणाले, “पोलीस हा पण एक माणूसच आहे. तो तीनही ऋतू – सर्व सण विसरुन आपल्या सेवेसाठी उभा असतो. तेव्हा त्यांना सहकार्य करत जा! त्यांना आपलेपणा दाखवा. तुम्ही जे काम कराल, ते निःस्वार्थीपणे करा. आलेल्या संकटाला बिनधास्त सामोरे जा! परमेश्वर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे!”

मित्रत्व आणि माणुसकी जपणाऱ्या आमच्या मित्राला अर्थात पोलीस उप-निरीक्षक श्री. राजेंद्र लोके यांना मानाचा मुजरा करुन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! गावातील-समाजातील व्यक्ती अशा मोठ्या पदांवर कार्य करतात तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटतो! लोके बंधूंकडून मुंबई पोलीस दलात अभिमानास्पद कार्य घडो; ही सदिच्छा!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page