श्री. राम गावडे-`अर्थ’ पुरुषार्थाचा मार्गदर्शक -क्षा. म. समाजातील आदर्श
समाज माझा, मी समाजाचा!
।। हरि ॐ ।।
‘समाज माझा, मी समाजाचा’ ही लेखमाला क्रमश: लिहित असताना अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. नवव्या लेखामध्ये पुढे काय लिखाण करायचे आहे, त्याची रूपरेषा ठरविली. दहाव्या लेखामधून आदर्श व्यक्तीमत्वांबद्दल लिहायचे होते; परंतु `शिरोडकर बिझनेस ग्रुप’चा जो कार्यक्रम होणार होता त्याला शुभेच्छा देण्यासाठी लेख लिहिला. खूप वेळानंतर पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला येत आहे.
‘शिरोडकर बिझनेस ग्रुप’चा आता वर उल्लेख झाला. त्या ग्रुपची पायाभरणी करणाऱ्यांपैकी एक श्री. रामचंद्र कृष्णराव गावडे अर्थात राम गावडे. व्यवसायाने सीए असणारे राम गावडे यांच्यावर प्रथम लेख लिहिण्याचा योग आम्हाला आला. आम्ही समाधानी आहोत.
श्री. राम गावडे यांची क्षा. म. समाजाच्या निवडणुकी दरम्यान ओळख झाली; नंतर अनेक भेटीगाठी झाल्या, फोनवरून बोलणं झालं आणि माझ्या लक्षात आलं; क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजासाठी श्री. राम गावडे हे भूषण आहेत. क्षा. म. समाजाच्या उत्कर्षासाठी नेमकं काय करायला हवं? ह्याचा संपूर्ण आराखडा त्यांच्या मुखोद्गत आहे. समाजाबद्दल त्यांच्या मनात आपुलकी आहे. ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो, त्या समाजाला विधायक गोष्टी दिल्या पाहिजेत; असं त्यांचं म्हणणं. उच्चशिक्षित असूनही साधं राहणीमान आणि त्याचा गर्व नाही. आज आपल्या समाजामध्ये अनेकजण उच्चशिक्षित आहेत. त्यातील अनेकजण आपला कथित स्टेटस् सांभाळण्यात व्यग्र असतात. त्यातूनच त्यांच्याकडे असणारा अहंकार जाणवतो. असे लोक समाजाचं भलं कसं करणार? हा माझा प्रश्न! परंतु राम गावडेंसारखं व्यक्तीमत्व जेव्हा समोर येतं, तेव्हा त्यांचा आदर्श जपावासा वाटतो.
श्री. राम गावडे यांचे वडील मिलमध्ये नोकरीला होते. १९८२ चा संप झाला आणि साहजिकच आर्थिक समस्या निर्माण झाली. तरीही त्यांनी स्वत:च्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. सायन येथील चाळीत राहणारे राम गावडे यांनी पुढे शिक्षण घेत असताना शिकवणी वर्ग घ्यायला सुरुवात केली. सात वर्षे शिकवणी वर्ग (क्लासेस) घेत असताना ते सीएच्या शिक्षणाकडे वळले. सीएचा अभ्यास करायचा असल्याने त्यांनी क्लासेस बंद केले; परंतु दुसरीकडे सीएचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. वयाच्या चोवीसाव्या वर्षी सीए होणारे राम गावडे यांनी सुरूवातीला दिडवर्षे शेअरमार्केटमध्ये काम केले. त्यानंतर शामराव विठ्ठल सह. बँकेत सहव्यवस्थापक ते ब्रॅन्चहेड म्हणून सात वर्षे उच्च पदावर नोकरी केली. परंतु आपल्या मुलाने नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करावा; अशी त्यांच्या वडिलांची तीव्र इच्छा होती. त्याबद्दल ते आपल्या मुलाकडे नेहमी आग्रह करीत. २००३ साली त्यांच्या वडिलांचे देहावसन झालं. २००४ साली राम गावडे यांनी स्वत:ची फर्म सुरू केली. भारतीय वैदिक सनातन हिंदू संस्कृतीमध्ये `अर्थ’ हा एक पुरुषार्थ मानला जातो. त्या `अर्था’संबंधी अचूकपणे मार्गदर्शन करणारे श्री. राम गावडे इतर सीएंपेक्षा उजवे ठरतात; कारण ते `कर’ का भरायचा? कसा भरायचा? अर्थाचे नियोजन कसे करायचे? हे अगदी प्रामाणिकपणे प्रत्येकाला सांगतात. स्वत:कडील ग्राहक वाढावेत एवढाच संकुचित विचार ते करत नाहीत. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने `अर्थ’ पुरुषार्थाचे मार्गदर्शक आहेत.
अभ्यासुवृत्ती असल्याने गावडे यांनी २००५ मध्ये ‘व्हॅट’ करप्रणालीमध्ये तज्ञत्व मिळविले. त्याचा फायदा त्यांच्या मित्रांना-व्यावसायिक ग्राहकांना झाला. त्यामुळे राम गावडे हे अनुभवी चार्टड अकाऊंटंड म्हणून नावारूपास आले. आज ते स्वत:ची फर्म यशस्वीपणे सांभाळत असून त्यांनी शेकडो पदवीधर तरुण तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांच्या व्यवसायामध्ये ते पूर्ण यशस्वी झाले आहेत.
स्वत:चा व्यवसाय सांभाळत असताना समाजकारणामध्येही त्यांना विशेष स्वारस्य आहे म्हणूनच ते कोकणातील बहुतेक स्वयंसेवी संघटनांशी संबधीत राहिले आहेत. ‘ग्लोबल कोकण’मध्येही त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. एवढेच नाहीतर भारतीय जनता पक्षाचे कुडाळ तालुका संपर्क प्रमुख म्हणून ते राजकारणातही यशस्वीपणे कार्य करीत आहेत.
सामाजिक कार्यामध्येही राम गावडे यांनी अनेक अत्यावश्यक असणारे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. ग्रामीण भागामध्ये जमिनीचा सातबारा प्रत्येकासाठी खूप महत्वाचा असतो. तो सातबारा कसा समजून घ्यायचा हे समजून सांगणारी चर्चासत्रे, केंद्राच्या अर्थसंकल्पातून रोजगारांच्या संध्या व उद्योगांना-नोकरदारांना होणारा फायदा सांगणारी मार्गदर्शन शिबिरं राम गावडे यांनी यशस्वीपणे घेतली आहेत. क्षा. म. समाजाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला; अन्यथा क्षा. म. समाजाला त्यांच्या कार्याचा निश्चितच चांगला अनुभव घेता आला असता. तरीही त्यांच्याकडे सकारात्मक उर्जा प्रचंड दिसली. कारण समाजाच्या महिलासांठी ‘स्वयंसिद्धा फाऊंडेशन’ ह्या संस्थेच्या अंतर्गत सर्वांगसुदर विकासासाठी कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. समाजातील बेरोजगारांसाठी सेवा सहकारी संस्था स्थापन करून एक नवीन व्यासपीठ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला समाजबांधव शैक्षणिक प्रगतीत मागे पडतो; तसेच आरोग्याच्याही सुविधा त्याला प्राप्त होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी आमच्यासमोर मांडलेली योजना प्रत्यक्षात यायलाच हवी. जेणेकरून समाजातील एकही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडणार नाही आणि आजारपणात वैद्यकीय खर्चही करू शकतो.
कोचरा गावडेवाडा येथील मुळ गाव असणारे राम गावडे यांच्याकडे क्षा. म. समाजासाठी अनेक योजना आहेत. क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राम गावडे तन-मन-धन अर्पण करून प्रामाणिकपणे- कार्यक्षमतेने प्रयत्न करू शकतात. त्याच्या हृदयात डॉ. शिरोडकर, एच् डी. गावकर यांच्याबद्दल, क्षा. म. समाजाबद्दल खरेखुरे प्रेम आहे. एखादी गोष्ट खटकली की ते पटकन बोलतात. पण त्यांचा उद्देश समाजाचं भलं व्हावं हाच असतो. असं माझ्या तरी नजरेनं जाणलं. समाज बांधवांच्या भल्यासाठी राम गावडे यांच्याकडे असलेली तत्परता खरोखरच वाखाण्याजोगी आहे. गैरप्रकार, गैरव्यवहार ह्याबद्दल त्यांच्या मनात नेहमीच चीड असते. क्षा. म. समाजाची संघटना अनेक विधायक कार्याला पुढे घेऊन जावू शकते; त्यासाठी राम गावडे यांच्यासारखे प्रामाणिक नेतृत्व आम्ही समाज बांधवांनी जपले पाहिजे, वाढविले पाहिजे. त्यांच्या कर्ततृवाला वाव दिला पाहिजे.
आजपर्यंत अशा व्यक्ती समाज संस्थेपासून दूर का राहिल्या? ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास इथे सहजतेने मिळते. विद्वान व्यक्ती जर प्रामाणिकपणे समाजाला घडविण्यासाठी पुढे येत असतील तर त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. `समाज माझा, मी समाजाचा’ ही शुद्ध भावना सीए असणारे राम गावडे यांच्याकडे निश्चितपणे आहे. त्या भावनेपोटी ते आपला बहुमुल्य वेळ देण्यास तयार आहेत. मग आम्ही समाजबांधवांनी राम गावडे यांना साथ द्यायला नको का? असे रत्न एकतर मिळत नाही आणि मिळाल्यास ते जपले पाहिजेत. त्या रत्नांची किंमत आम्हाला समजली पाहिजे. त्यासाठी क्षा. म. समाजबांधवांनी रत्नपारखी व्हायला पाहिजे.
क्षा. म. समाजात पुन्हा एकदा सुवर्ण युग आणण्यासाठी राम गावडे यांनी नेहमीच अग्रेसर राहिलं पाहिजे. `समाज माझा, मी समाजाचा’ ह्या माध्यमातून आम्ही अशा रत्नांचा शोध घेणार आहोत; त्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.
`गावडे इंडियन्स’ची विधायक चळचळ उभारणाऱ्या श्री. राम गावडे यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा! (क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर