एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।

एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।
।। हरि ॐ ।।
तूं मजकडे अनन्य पाहीं।
पाहिन तुजकडे तैसाच मीही।
माझ्या गुरूनें अन्य कांहीं।
शिकविलें नाहींच मजलागीं।।७३।।
नलगे साधनसंपन्नता।
नलगे षट्शास्त्रचातुर्यता।
एक विश्वास असावा पुरता।
कर्ता हर्ता गुरु ऐसा।।७४।।
म्हणूनि गुरूची थोर महती।
गुरुहरिहरब्रह्ममूर्ती।
जो कोण जाणे तयाची गति।
तो एक त्रिजगतीं
धन्य गा’’।।७५।।
(श्रीसाईसच्चरित अ. १९ वा)

साईसच्चरितकार हेमाडपंत श्रीसार्इंचे अत्यंत प्रेमाने-श्रद्धेने चरण दाबत होते. त्याचवेळी मुंबईतील साठे नावाचे प्रसिद्ध व्यापारी तेथे आले. त्यांना व्यवसायामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे स्वत:च्या आयुष्याला-जीवनाला ते कंटाळले होते. प्रपंचही सोडून द्यावा आणि कुठेतरी निघून जावे, असं त्यांना वाटत होतं. व्यवसायामधील नुकसानाने त्यांचं जीवनच बरबाद झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या एका स्नेहाने श्रीसाईनाथांचे माहात्म्य सांगून शिरडीला जाण्याचा सल्ला दिला होता. हेमाडपंत श्रीसार्इंचे चरण दाबत असताना ह्याच साठ्यांना `‘श्रीगुरुचरित्राचे पारायण कर म्हणजे तुझे कल्याण होईल’’ असे श्रीसाई सांगतात. त्याच क्षणाला हेमाडपंताच्या मनात विचार येतो, ‘मी गेली चाळीस वर्षे श्रीगुरुचरित्राचे पठण करीत आहे. सात वर्षे सद्गुरु श्रीसार्इंच्या दर्शनाला येत आहे. पण साठ्यांना जे सात दिवसात श्रीसार्इंकडून मिळालं ते मला का नाही प्राप्त झालं? मी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे तो श्रीसार्इंचा उपदेश मला कधी ऐकता येणार?’
सद्गुरु आपल्या भक्ताच्या मनात चालणाऱ्या गोष्टींना जाणतच असतो. मनात हजारो-लाखो-करोडो-अगणित विचार असले तरी भक्ताचा प्रत्येक विचार हा त्या सद्गुरु माऊलीला त्याचक्षणी कळतो. म्हणूनच सद्गुरु श्री साईनाथ हेमाडपंतांच्या मनात आलेला विचार सहजपणे जाणतात आणि हेमाडपंतांना म्हणतात, ‘‘तू शाम्याकडे जाऊन माझ्यासाठी पंधरा रूपयांची दक्षिणा मागून आण. त्याच्याकडे गप्पागोष्टी करीत बस आणि थोड्या वेळाने ये.” हेमाडपंत श्रेष्ट भक्त असणाऱ्या माधवराव देशपांडे यांच्याकडे जातात. माधवराव पूजा करीत असतात. हेमाडपंताना समोरच एकनाथी भागवताचा ग्रंथ दिसतो, तो ग्रंथ ते उघडतात तर सकाळी दर्शनाच्या गडबडीत जो अध्याय अपूर्ण राहिला होता तोच अध्याय त्यांच्यासमोर उघडला जातो. तो अध्याय हेमाडपंत वाचून पूर्ण करतात.

सद्गुरु भक्ताची भक्तीसुद्धा पूर्ण करून घेण्याची जबाबदारी घेत असतात. आम्ही देवाची उपासना करतो ती काही कारणाने अपूर्ण राहिली, तरी तो परमात्मा सद्गुरु अपूर्ण उपासना पूर्ण करुन घेतो. एवढंच नाहीतर तो स्वत: परमात्मा आम्ही केलेली अपूर्ण उपासना स्वत: उपासना करून पूर्ण करतो. हेच ते सद्गुरुचे भक्तांवरील प्रेम.

पूजा झाल्यानंतर माधवराव बाहेर येतात व हेमाडपंत श्रीसार्इंचा निरोप सांगतात. पंधरा रुपयांची दक्षिणा म्हणून माधवराव पंधरा नमस्कार श्रीसार्इंना देण्यास सांगतात. नंतर गप्पा गोष्टी सुरू होतात. तेव्हा माधवराव बाबांची कथा सांगतात. संगमनेरच्या खाशबा देशमुखांची आई राधाबाई बाबांकडून उपदेश मिळावा म्हणून शिरडीत राहून अन्नपाणी सोडते. माधवरावांच्या विनंतीवून श्रीसाई तिला सांगतात, ‘‘असे जीवाचे हाल करू नकोस मी सांगतो ते नीट ऐक. तू सुखी समाधानी होशील. मी सुद्धा असाच हट्टीपणा केला होता, माझ्या गुरुकडे. त्यासाठी मी त्याची खूप सेवा केली. त्यांनी मागितल्याबरोबर निष्ठा आणि धैर्य हे दोन पैसे त्यांना दिले.’’

तो सद्गुरुच माझं भलं करतो ही निष्ठा आणि उचित वेळी उचित गोष्ट तो मला देणार आहे; ही सबुरीच खूप आवश्यक असते.
इथे श्रीसाईनाथ आपल्या गुरुंविषयी सांगतात,
१) माझ्या गुरुने माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले.
२) मला लहानाचा मोठा करून माझ्या सगळ्या गरजा पुरविल्या.
३) माझा गुरु हा प्रेमाचा पुतळा. आमचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते.
४) गुरुविणा मला क्षणभरही करमत नसे.
५) त्यांच्याशिवाय माझ्या मनात अन्य कोणताही विचार येत नसे.
६) माझा सर्वस्वी हा गुरुच होता; माझ्याकडून त्यांची हीच अपेक्षा होती. सद्गुरुंच्या चरणाशी समर्पित राहिल्यानेच भक्ताचं कल्याण होतं व भक्ताचं कल्याण व्हावं म्हणूनच सद्गुरु आपल्या भक्तांना परमात्म्याची भक्ती करायला शिकवतो व स्वत: भक्ती करून दाखवितो.
७) सद्गुरुंनीच मला प्रत्येक संकटातून तारले व मला कोणत्याही प्रसंगी उपेक्षित ठेवले नाही.
८) सद्गुरुची माझ्यावर अखंड कृपादृष्टी होती. मी कोठेही असलो तरी माझ्यावर ते सतत लक्ष ठेवून असायचे.
९) नदीच्या पैलतरी असणारी कासवी जशी केवळ प्रेमदृष्टीने पैलतीरवरील आपल्या पिल्लांचे पालन पोेषण करते; तसंच सद्गुरु माऊली आपला भक्त कुठेही कसाही असो त्याचं पालन पोषण करतेच.
१०) सद्गुरुंनीच माझ्या मनात सद्गुरुंविषयीचे प्रेम भरले.
म्हणूनच पुढे साईबाबा सांगतात,

तूं मजकडे अनन्य पाहीं।
पाहिन तुजकडे तैसाच मीही।
माझ्या गुरूनें अन्य कांहीं।
शिकविलें नाहींच मजलागीं।।

भावार्थ- तू माझ्याकडे अनन्यपणे म्हणजे एकनिष्ठपणे बघ. म्हणजे मी सुद्धा तुझ्याकडे तसाच पाहीन. याशिवाय दुसरे काही माझ्या गुरुने मला शिकविलेले नाही.
सद्गुरुंच्या प्रतिमेकडे बघा, मुर्तीकडे बघा किंवा प्रत्यक्ष त्याच्याकडे बघा; पण प्रेमाने बघा, भावाने बघा, विश्वासाने बघा, मनापासून बघा. त्याच्याकडे पूर्ण श्रद्धेने-निष्ठेने
तो एकच माझा तारणहार,
तो एकच माझा कर्ता करविता,
तो एकच माझा सर्वस्वी;
ह्या भावाने भक्त जेव्हा त्याच्याकडे बघतो, त्याच्या नयनांकडे बघतो; तेव्हा तो सद्गुरु परमात्माही आपल्या भक्तांकडे बघतो.
सद्गुरुंनी बघितल्यावर आमचं दुष्प्रारब्ध कितीही मोठं असो, आमच्या समोर कुठलंही संकट असो, आमचा कुठलाही प्रॉब्लेम असो; त्याची उकल होतेच. आमच्या ह्या जन्मासह मागील सर्व जन्मातल्या पापांना जाळून नष्ट केलं जातं, आमच्या अंगावर कोसळणारा डोंगर जागच्या जागी थांबविला जातो, आमच्या मनातील नास्तिकता नाहीशी केली जाते, आमच्या मनात-बुद्धीत पवित्र विचार स्थिर केले जातात. त्यासाठी सद्गुरुंना आम्ही बघायला शिकलं पाहिजे आणि ह्याचं प्रशिक्षणही तोच देतो. म्हणूनच साईनाथ म्हणतात,

नलगे साधनसंपन्नता।
नलगे षट्शास्त्रचातुर्यता।
एक विश्वास असावा पुरता।
कर्ता हर्ता गुरु ऐसा।।७४।।

त्या सद्गुरुंचं प्रेम मिळविण्यासाठी सद्गुरु श्रीसाईनाथ आम्हाला अत्यंत सोपा, पवित्र, सुदंर मार्ग सांगतात.
ज्ञानप्राप्तीची चार साधने आहेत. विवेक, वैराग्य, शमादी षड्संपत्ती आणि मुमुक्षता. ही साधनं असल्यावर साधन संपन्नता येते. परंतु सद्गुरुंचं प्रेम मिळविण्यासाठी साधन संपन्नतेची आवश्यकता नाही.

न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा अर्थात वेदोक्त. सद्गुरुंचं प्रेम मिळविण्यासाठी ह्या सहा शास्त्रांमध्येही निपुणता असण्याचीही गरज नाही. मग भक्ताकडे काय असायला हवे? सद्गुरुंची कृपा जीवनात येण्यासाठी, सद्गुरु आमच्या जीवानाचा सुत्रधार होण्यासाठी,  सद्गुरु माऊलीचं प्रेम मिळविण्यासाठी संपूर्ण सद्गुरुच आपलासा होण्यासाठी भक्तांचा भाव कसा असायला पाहिजे?

एक विश्वास असावा पुरता।
कर्ता हर्ता गुरु ऐसा।।

‘त्या’ एकाचवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे की, तोच आमचा कर्ता आहे. आमच्यातील पापांचा दुष्प्राब्धाचा नाश करणारा तोच आहे. आमच्या मनातील शत्रू असो वा बाहेरचे शत्रू असो; त्यांचा नाश करणारा तो एकच आहे. हा एक विश्वासच यापुढे येणाऱ्या काळासाठी आम्हाला सामर्थ्य पुरविणार आहे. म्हणूनच आमच्या सद्गुरु माऊलीने– सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी

एक विश्वास असावा पुरता।
कर्ता हर्ता गुरु ऐसा।।

हे पद आम्हा प्रत्येकाला जीवनात दृढ करायला सांगितलं होतं व दृढ करण्यासाठी लागणारी ताकदही सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पुरविली. चुकतमाकत, अडखळत-पडत, चाचपडत आम्ही प्रयास केला आणि खूप काही मिळाले. जे अनंत काळासाठी आमची सोबत करणार आहे. यापुढेही मिळत राहणारआहे. जे मिळाले ते शब्दात मांडणे कठीण. पण मिळाल्याचे ‘भाव’ प्रकट करणं सोपं आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच सद्गुरु श्री अनिरुद्ध बाप्पाच्या चरणी समर्पित!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *