सलाम न झुकलेल्या लेखणीला… सवाल विकलेल्या व्यवस्थेला!

आज ६ जानेवारी, पत्रकार दिन!
पत्रकार असल्याने अनेकांनी शुभेच्छा दिल्या आणि त्या मी मनापासून स्वीकारल्या!
शुभेच्छांमध्ये अतिशय सुंदर आणि मनाला भावणारे शब्द होते.
“आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे पत्रकार लोकशाहीचे खरेखुरे आधारस्तंभ!”
“सत्य, निर्भीडपणा आणि समाजहित यांचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या पत्रकारांना सलाम!”
“तुमची लेखणी सदैव जनतेचा आवाज म्हणून अन्यायविरुद्ध लढत राहो!”
“सत्य मांडण्याचे धाडस, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि समाजाला जागं ठेवण्याचे कार्य तुम्ही अखंड करीत राहा!”

असे अनेक शुभेच्छारुपी संदेश वाचताना मात्र अगणित प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले; जे प्रश्न मला गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून सतावत होते! आता ते प्रश्नच एवढे भयंकर – भीषण झाले आहेत की, त्यातून माझा गाव, माझा जिल्हा, माझं राज्य आणि माझा देश अशा चक्रव्यूहात अडकवला जातोय की ज्यातून बाहेर पडणं शक्य नाही.

निसर्गावर, भूमीवर खाजगी राक्षसी मालकी सिद्ध केली जात आहे! `मानव’ म्हणून मानवाला जे अधिकार मिळायला पाहिजे तेच हिरावून घेतले जात आहेत! ह्याला जबाबदार कोण? लोकशाही ज्या खांबांवर उभी आहे, तेच खांब! कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका बेभान झाली असताना प्रसारमाध्यमांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी ठेवता येईल? तरीही हाताच्या बोटावर मोजता येणारी प्रसारमाध्यमे – पत्रकार आपले कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत! जे पत्रकार विकले गेले नाहीत, जे राक्षसी महत्वाकांक्षेच्या वातावरणात- घडामोडींमध्ये देशाच्या समाजाच्या हिताचे मुद्दे मांडत असतात; कशाचीही पर्वा न करता; त्यांना आजच्या दिवशी सलाम करावाच लागेल आणि जे देशालाच संपवायला निघालेत त्यांचा समाचार घ्यावाच लागेल! तोच खरा पत्रकार दिन!

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुका झाल्या! नंतर महाराष्ट्रात विधानसभासभेच्या निवडणुका झाल्या. नुकत्याच नगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुका आपण पहिल्या! आता महानगरपालिकांमधील निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि पुढील एक-दोन आठवड्यात जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत! निवडणुका ह्या लोकशाही सुदृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात; पण ह्या निवडणुकांमध्ये जे काही घडलं आणि जे काही घडत आहे ते अनैतिक, गैर, भ्रष्ट आहे. लोकशाहीला कलंकच नव्हेतर लोकशाहीचा खून करणाऱ्या घटना घडविल्या जात आहेत! अविश्वसनीय ईव्हीएम मशीन, सदोष मतदार याद्या, मतांची चोरी, मतांची अदलाबदल, उमेदवारांची पळवापळवी, उमेदवारांचे खून, दहशत अशा अनेक गोष्टींना निवडणूक आयोग रोखू शकत नाही! बिनविरोध निवडून येण्याच्या प्रकारात तर लोकशाही संपवण्याचा कट यशस्वी केला जातो आणि आमचे कायदेमंडळ, न्यायपालिका झोपा काढते! जे काही सगळं सुरू आहे ते गलिच्छ आहे; त्याहीपेक्षा देशातील लोकशाहीला संपविण्याचे कारस्थान आहे!

अशीच अनेक कारस्थानं सुरू आहेत! मायनिंगचा राक्षस उभा राहिलाय; त्यातून पर्यावरणाची हानी होणार आहे! ज्यामध्ये सामान्य जनताच होरपळत मरणार आहे! काश्मीरमध्ये पाण्याचे स्त्रोत खाजगी कंपन्यांनी विकत घेतले व ते पाणी देशभरात – परदेशात विकत आहेत आणि स्थानिक जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे. सरकारी उद्योगधंदे आता खाजगी झाले आहेत; तर दुसरीकडे छोटे व्यापारी – छोटी व्यावसायिक जो उद्योग – व्यापार करतात त्या क्षेत्रात भांडवलदारी खाजगी कंपन्यांनी घुसखोरी केली आहे. सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी मुडदे पाडले जात आहेत! अन्याय- अत्याचार विरोधात लढणे, अन्यायाविरुद्ध दाद मागणे अशक्य झाले आहे! भ्रष्ट व गैर कारभाराविरोधात जो उभा राहील, त्याला संपण्याची क्रूर यंत्रणा उभी राहिली आहे! कष्टकरी जनता, शेतकरी, मजूर, आदिवासी भरडला जात आहे. अक्षरशः त्यांचे विविध पातळीवर शोषण होत आहे! लोकशाहीच्या संरक्षणार्थ उभारलेली यंत्रणाच विकली गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जे जे देशाच्या, मानवाच्या, निसर्गाच्या हितासाठी लढत आहेत त्यांना प्रणाम करता आला पाहिजे! त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच पत्रकारांचे आद्यकर्तव्य आहे!

मतदानासाठी पूर्वी उमेदवार पैसे वाटायचे; पण आता काही मतदार उमेदवारांकडून मतासाठी पैसे मागून घेत आहेत! एखाद्या सुंदर तरुणीला एखादा गुंड वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतो. आपण समजू शकतो की तरुणी मनाविरुद्ध दहशतीखाली तो व्यवसाय करते! पण जेव्हा तीच तरुणी स्वमर्जीने तोच व्यवसाय स्वीकारते तेव्हा मात्र नाईलाज असतो! त्याचप्रमाणे मत देण्यासाठी पैसे मागणारे मतदार पहिले की किव येते! ह्या दलदलीतून बाहेर न पडल्यास देशाच्या व माणुसकीच्या अस्तित्वाला धोका आहे! त्यासाठी सडलेल्या – किडलेल्या यंत्रणेच्या प्रबोधनाबरोबर सामान्य जनतेचे प्रबोधन होण गरजेच आहे आणि ते सच्च्या पत्रकारांनी करावं; अशी आजच्या पत्रकार दिनी सदिच्छा!
-नरेंद्र हडकर

error: Content is protected !!