सॅनेटरी नॅपकिनवर आता शून्य कर दर; राज्याच्या मागणीचा जीएसटी कौन्सीलकडून स्वीकार

मुंबई:- सॅनेटरी नॅपकिन्सला वस्तू आणि सेवा करातून वगळण्यात यावे यासाठी महाराष्ट्राच्यावतीने मी अर्थमंत्री म्हणून वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर आग्रही मागणी केली होती आज या पाठपुराव्याला यश मिळाले असून सॅनेटरी नॅपकिन्सवरील कर दर शून्य करण्यात आला असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वस्तू आणि सेवा कर परिषदेची २८ वी बैठक काल नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले की, सॅनेटरी नॅपकिन्सवर वस्तू आणि सेवा करात १२ टक्के कर होता. तो शून्य करावा अशी राज्याची मागणी होती. महिलांच्या स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय होणे खूप महत्वाचे होते. आज ही मागणी मान्य केल्याबद्दल आपण केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांचे आभारी आहोत, असेही श्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

याच बैठकीत बांबू फ्लोअरिंग वरचा १८ टक्क्यांचा कर दर १२ टक्के करण्यात आला. बांबू उद्योगाच्या वृद्धीसाठी हा निर्णय ही खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्यावतीने ही मागणीही वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर आग्रहाने मांडण्यात आली होती. आज राज्याची ही मागणी पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असेही श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!