महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रतिभेचे कौतुक!
अटल टिंकरींग इनोव्हेशन मॅराथॉनचा निकाल जाहीर
नवी दिल्ली: ऑटोमोबाईल कंपन्यातील पाण्याचा पुनर्वापर, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, सोलर वॉटर बल्ब आणि आयुस्प्रे हे महत्वाचे संशोधन मांडणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनासह देशातील शालेय विद्यार्थ्यांनी ३० महत्वपूर्ण संशोधन करून संशोधकवृत्तीचे दर्शन घडविले आहे.
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग इनोव्हेशन मॅरॉथॉन` स्पर्धेत निवड झालेल्या देशातील सर्वोत्तम ३० विद्यार्थी संशोधनांची आज निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार आणि अटल इन्होवेशन मिशनचे संचालक रमनन रामनाथन यांनी निती आयोगाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून यावेळी उभय मान्यवरांनी `अटल टिंकरिंग इनोव्हेशन मॅराथॉन` मध्ये निवड झालेल्या संशोधनाचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले.
अटल इनोव्होशन मिशन (AIM) अंतर्गत ‘अटल टिंकरिंग मॅराथॉन’चे आयोजन सहा महिन्यापूर्वी करण्यात आले. यातंर्गत सहा क्षेत्रांची निवड करण्यात आली. स्वच्छ ऊर्जा, जलसपंदा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य क्षेत्र, स्मार्ट गतिशिलता, कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रांचा समावेश असल्याची माहिती डॉ. राजीव कुमार यांनी दिली.
निवड झालेल्या ३० शाळांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या विद्यार्थी संशोधकांना निती आयोगाने देशातील उद्योगक्षेत्र व स्टार्टअप्स यांच्या सहकार्याने तयार केलेल्या तीन महिने कालावधीच्या ‘अटल विद्यार्थ्यी संशोधक कार्यक्रमात’ सहभागी करून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये या विद्यार्थ्यांच्या संशोधनाची उपयुक्तता यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी संशोधकांना उद्योग, उद्योजकता कौशल्य, संवाद कौशल्य आदी बाबी शिकविण्यात येतात. यासोबत या विद्यार्थ्यांना जागतिक रोबोटिक ऑलम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे.
स्पर्धेत निवड झालेल्या सर्वाधिक ४ शाळा महाराष्ट्रातील
या स्पर्धेत सर्वाधिक ४ संशोधने ही महाराष्ट्रातून निवडण्यात आली. पुणे येथील निगडी भागातील जनप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मल्हार लिंबेकर, वरूण कोल्हटकर आणि तन्मय वाल्हेकर या विद्यार्थ्यांनी जलव्यवस्थापन विषयावर तयार केलेले ‘ऑटोमोबाईल कंपन्यातील पाण्याचा पुनर्वापर’ या संशोधनाची निवड करण्यात आली आहे. याच शाळेच्या श्रावणी लिमये, जय अहेरकर आणि श्रेया गायकवाड या विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयावर तयार केलेल्या ‘आयुस्प्रे’ या संशोधनाची निवड झाली आहे.
‘जलसंपदा’ या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथली ‘शिवराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया’च्या प्रथमेश उदय शेटे, अनुजा आनंद पाटील, मुबना सिंकदर शिकलगर, या विद्यार्थ्यांनी औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी व्यवस्थापनावर संशोधन करून प्रकल्प सादर केला.
नागपूरतील रामदास पेठ येथील सोमलवार उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या निनाद अजणे, वल्लभ कावरे, अनुराग अपराजित या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ ऊर्जा’विषयावरील संशोधनमध्ये ‘सौरऊर्जा वॉटर बल्ब’ ची निर्मिती केलेली आहे.
अशी झाली ३० संशोधनांची निवड
`अटल टिंकरिंग इनोव्हेशन` स्पर्धेत स्वच्छ उर्जा, जलसंपदा, कचरा व्यवस्थापन,आरोग्य, कृषी तंत्रज्ञान आणि स्मार्ट मोबीलिटी या ६ विषयांवर शालेय विद्यार्थ्यांकडून संशोधन कार्य मागविण्यात आली होती. देशभरातून या स्पर्धेसाठी ६५० संशोधन पाठविण्यात आले होते, पैकी १०० संशोधनांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या १०० संशोधनासाठी विद्यार्थ्यांना या संशोधनात आवश्यक सुधारणा व प्रभावी कार्य करण्यासाठी वेळ देण्यात आला. पुन्हा या १०० संशोधनांमध्ये स्पर्धा घेण्यात आली व अंतिमत: देशातील उद्योग व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञांनी ३० संशोधनांची निवड केली. स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ६ विषयांपैकी प्रत्येक विषयासाठी देशातील ५ संशोधनांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील ३ आणि उत्तर प्रदेशातील २ शाळांची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. (सौजन्य ‘महान्यूज’)