सोशल मीडियावर महिलांविरोधी टिपणी, सायबर समितीचा ३ महिन्यात अहवाल…!
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती!
नवी दिल्ली:- सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांविरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, अश्लील टिपणींना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने स्थापन करण्यात आलेली ‘सायबर समिती’ येत्या तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्य महिला आयोगाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी येथील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमती रहाटकर म्हणाल्या, सध्या सोशल मीडियातून महिलांविरोधात होत असलेल्या मानहानीकारक टिपणीच्या विविध तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. यासंदर्भात ठोस पावले उचलत आयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ८ सदस्यीय सायबर समिती स्थापन केली आहे. समितीची पहिली बैठक ८ मे २०१८ रोजी श्रीमती रहाटकर यांच्या उपस्थितीत झाली.
या समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा समावेश असून महिलांविरोधी अवमानकारक टिपणी रोखण्यासंदर्भातीत विविध सुचनांचा अहवालही समिती येत्या तीन महिन्यात आयोगाला सुपूर्द करणार आहे. या अहवालाचा अभ्यासकरून आयोगाच्यावतीने यासंदर्भात राज्य शासनाला शिफारशी करण्यात येतील, अशी माहिती श्रीमती रहाटकर यांनी दिली.
सुहिता हेल्पलाईच्या माध्यमातून २ महिन्यात १२०० तक्रारी
अडचणीत सापडलेल्या महिलांना आपले म्हणणे थेट राज्य महिला आयोगाकडे मांडता यावे व त्यांना तत्काळ मदत पुरविण्यासाठी आयोगाने २ महिन्यांपूर्वी ‘सुहिता हेल्पलाईन’ सुरु केली आहे. कार्यालयीन वेळेत यावर महिलांकडून तक्रारी प्राप्त होतात आजपर्यंत राज्याच्या विविध भागातून १२०० तक्रारी प्राप्त झाल्या असून संबंधित महिलांना मदत करण्यात आली असल्याचे श्रीमती रहाटकर यांनी सांगितले. तसेच राज्य महिला आयोगाने मागील वर्षी ‘तेजस्वीनी’ हे ॲप सुरु केले आहे, या ॲपवरही महिलांच्या तक्रारी प्राप्त होतात व त्यांना मदत पुरविण्यात येते. आयोगाच्या संकेतस्थळावरही महत्वपूर्ण माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आयोगाच्या वतीने विदर्भ व मराठवाडा भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींसाठी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले होते. या महिलांना येणाऱ्या विविध अडचणी समजून घेऊन त्यांचे समाधान या परिषदेत करण्यात आले, असे सांगत श्रीमती रहाटकर यांनी आयोगाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. (सौजन्य ‘महान्यूज’)