चिपळूणला श्रमदानासाठी तयार असणाऱ्या हातांची गरज आहे!

 

हा लेख चिपळूण जवळील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागामध्ये साहाय्यक प्राध्यापक श्री. अमेय विनोद फणसे B.E.(Mechanical engineering), M.E.(Design engineering) यांनी लिहिला आहे. उच्चशिक्षित समाजभान असलेली व्यक्ती जेव्हा काही मुद्दे ठेवते त्यावर चिंतन करणे गरजेचं ठरतं; कारण त्यातूनच वास्तव सहजपणे समजून येतं!                                                                                   -संपादक

 

नरेंद्र महाराज..! आमच्या कोकणातलं संपूर्ण महाराष्ट्रात भक्तमंडळी असणारं एक नाव.. खरं तर त्यांचा नाणीज या गावी असलेला मठ मी आजपर्यंत एवढ्या जवळ असूनही कधी पाहिलेला नाही.. पण त्यांच्या नावाने फिरणाऱ्या ऍम्ब्युलन्स आणि वार्षिक उत्सवाला त्यांच्या दर्शनाला होणारी लाखोंची गर्दी ह्या गोष्टी आम्ही बघतोय, ऐकतोय. आज हे नाव घेण्याचं कारण म्हणजे त्यांच्या भक्तमडळींनी आज चिपळूणमध्ये येऊन केलेलं श्रमदानाचं काम!

सकाळी सहज बाहेर पडलो तर आमच्या चिंचनाक्यात प्रचंड गर्दी दिसली. कितीतरी पुरुष, बायका, तरुण मुलं मुली हातात हिराच्या केरसुणी, घमेली, फावडी असं समान घेऊन रांगेत उभी होती. यात अगदी रोजंदारीवर काम करणाऱ्यापासून ते आय टी कंपनीत काम करणारी अशी सगळी माणसं होती. अजिबात गडबड नाही की गोंधळ नाही. प्रत्येकाच्या हातात ग्लोव्ह्ज, तोंडाला मास्क आणि खिश्याला नरेंद्र महाराजांचा फोटो! साधारण पाचशे माणसं मला समोर उभी दिसत होती. अक्षरशः दहा मिनिटात त्यांच्या टीम तयार झाल्या आणि मुख्य रस्त्याबरोबर लहान लहान गल्ल्यांमध्ये त्यांचं काम सुरू झालं.

सहज त्यांच्यापैकी एकाकडे चौकशी केली तर त्याच्याकडून जी माहिती मिळाली तिने थक्क झालो. ही सगळी मंडळी पुण्याच्या विविध भागातून इथे मदतीसाठी आली होती. काल रात्री पुण्यातून निघालेली ही नरेंद्र महाराजांची भक्तमंडळी संपूर्णपणे स्वखर्चाने दोन हजाराच्या संख्येने आज सकाळी चिपळूणला दाखल झाली. वाटेत पाटण जवळ फक्त दोन तास विश्रांती घेऊन लगेच चिपळूणला श्रमदानासाठी सगळे आले होते. मी राहतो त्या गल्लीत पूर येऊन गेल्यापासून नगरपालिकेची घंटागाडी फिरकलेली नाही. सगळा कचरा तसाच रस्त्यावर पडून होता. त्यातला निम्मा कचरा कुसून प्रचंड दुर्गंधी पसरली होती. आमच्या प्रभागाच्या नगरसेवकांनी याची दखल घ्यायची सोडाच; पण नुसतं येऊन लोकांचं काय नुकसान झालं आहे हे बघायचेही कष्ट घेतले नव्हते. आणि देवासारखे धावून आलेल्या ह्या सगळ्यांनी अक्षरशः तीन ते चार तासात पूर्ण गल्ली चकाचक केली. तसंच इथे असलेल्या पशु वैद्यकिय दवाखान्याच्या इमारतीचा परिसरही स्वच्छ करून दिला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यात कुठेही आम्ही मोठं काही काम करतोय; असा अजिबात अविर्भाव नव्हता. काम करतानाचे फोटो काढले जात नव्हते. एक मार्गी “जय सियाराम” आणि “जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय” असा जयघोष करत काम चालू होतं. सकाळचा चहा, नाश्ता,पिण्याच्या पाण्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत सगळी सोय त्यांची त्यांनीच केलेली होती.

न राहवून त्यापैकी एकाला मी त्यांच्या इथे एवढ्या मोठ्या संख्येने यायचं कारण विचारलं, त्याने दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं होतं. तो म्हणाला, “परवा रात्री आम्हाला आमच्या महाराजांनी आज्ञा केली की चिपळूणला तुमची गरज आहे. रोगराई पसरण्याआधी तिथे जाऊन स्वछता करा.” या एका आदेशावर ही दोन हजार मंडळी चोवीस तासाच्या आत तिथून निघाली. संध्याकाळी परत निघून उद्या पहाटे हे सगळे आपापल्या घरी जाणार होते. एवढ्या मोठ्या संख्येने आज मनुष्यबळ उपलब्ध असताना नेहमीप्रमाणे आमच्या नगरपालिकेने कच खाल्ली. कचरा वाहून नेण्याची व्यवस्था पुरेशी नसल्याने आणि बाहेरून काही व्यवस्था करायची इच्छाशक्ती नसल्याने बराच कचरा रस्त्यावर तसाच ठेवावा लागला. बाकी पोलीस यंत्रणा बिचारी मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्त करत होती.

काल सकाळी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची काही माणसं मला साफसफाई करताना दिसली. आज नरेंद्र महाराजांची भक्तमंडळी स्वछता मोहीम राबवत होती. एका माणसावर किंवा संस्थेवर असणाऱ्या श्रद्धेपायी अशी कित्येक माणसं चोवीस तासात मदतीसाठी हजर होणं हेच मुळात प्रशंसनीय आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात असा एक राजकीय नेता कुणी मला दाखवा की ज्याच्या एका शब्दावर इतकी माणसं मदतीसाठी धावून जातील. नुसते धावते दौरे करायचे आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायची हे एवढंच काम दुर्दैवाने सर्वपक्षीय नेते चिपळूणला येऊन करत आहेत. कोण पॅकेजची घोषणा करून जातोय, कोण स्थानिक प्रशासनाचे वाभाडे काढतोय, कोण नद्यांना भिंती बांधायच्या घोषणा करतोय..

प्रत्यक्षात इथे शहरासाठी काही करायची किंवा भविष्यात पुन्हा असं काही होऊ नये म्हणून ठोस काही उपाययोजना करायची एकाही नेत्याची इच्छाशक्ती नाही. या अशा सर्वपक्षीय नेत्यांना एकच सांगणं आहे, तुम्हाला काही करायचं नसेल तर उगाच स्थानिक प्रशासनाला ताण द्यायला इथे येऊच नका. कोकणी माणूस नेहमीप्रमाणे यातूनही स्वतःच्या जीवावर सावरेल…

खरं सांगतो, चिपळूणला आज तुमच्या पोकळ आश्वासनांची आणि कधीही लोकांपर्यंत न पोचणाऱ्या पॅकेजची गरज नसून अश्या पद्धतीच्या मदत करणाऱ्या, श्रमदानासाठी तयार असणाऱ्या हातांची गरज आहे..

– अमेय फणसे, चिपळूण

You cannot copy content of this page