लोकांनी मान्य केलेले नेतृत्व : लोकमान्य टिळक

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४

सध्या सर्वत्र कोविड – १९ या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक नियमावली निर्गमित करण्यात आली आहे. त्यातच दरवर्षीप्रमाणे लोकांची पीकविमा भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. त्यासोबतच निसर्गाच्या आपत्तीमुळे आलेल्या महापुरात उध्वस्त झालेले सर्वसामान्य लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. लोकांना पीकविमा आणि आपत्तीत सापडलेल्या लोकांना मदत कधी मिळेल? हे येत्या काळात समजेल. मात्र हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी सन १८९६ मध्ये महाराष्ट्रात खूप मोठा कोरडा दुष्काळ पडला. त्यावेळी इंग्रज सरकार, शेतकऱ्यांकडून दुष्काळ विमा निधी या अंतर्गत लोकांकडून काही रक्कम जमा करत असे. ती रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी; यासाठी काही वर्तमानपत्रांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन करतानाच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. त्यासाठी याच वर्तमानपत्रांनी इंग्रज सरकारला ठणकावले की, FAMINE RELIEF CODE नुसार दुष्काळ पडला असताना शेतकऱ्यांना कर माफ करावे, दुष्काळ निधी मंजूर करावा; अशी सूचना केली. परिणामी सरकारला विमा देतानाच कर रद्द करावे लागले. ते वर्तमानपत्र होते केसरी व मराठा. आणि त्याचे संपादक आणि नेतृत्व होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

परखड बाणा, जनसामान्यांची कणव, राष्ट्रप्रेमाचे उदाहरण आणि परिवर्तनाची आस धरून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पत्रकारिता केली. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांच्या याच वर्तमानपत्रातील कामगिरीने त्यांचे जहाल आणि क्रांतिकारी विचार समस्त भारतीयांपर्यंत पोहचत राहिले आणि ते भारतीय असंतोषाचे जनक बनले. त्याचवेळी भारतात प्लेगची साथ आली. त्यातून इंग्रजांच्या वतीने जनरल डायरने खुप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांवर अन्याय करत त्यांच्या वर अत्याचार केले. हे पाहून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी `सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ आणि `राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’ असे सवाल आपल्या वर्तमानपत्रातून करत इंग्रज सरकारला धारेवर धरले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला की, त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यांना त्यासाठी शिक्षाही सुनावली. परिणामी त्यांच्या राष्ट्रकार्यात खंड पडला नाही. म्हणूनच आज त्यांच्या शतकोत्तर प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या याच राष्ट्रप्रेमी विचारांना मनःपूर्वक अभिवादन!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म चिखली, जिल्हा रत्नागिरी मधील. मात्र त्यांची कर्मभूमीचे ठिकाण पुणे ठरले. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली झाला. मूळ नाव केशव असले तरी सर्वजण त्यांना बाळ या नावाने संबोधायचे. आणि तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यात आले. मुळातच चिकित्सक स्वभाव असल्याने बाळने गणित, संस्कृत या विषयात कौशल्य संपादन केले. शालेय जीवनापासूनच त्यांच्यात सत्यप्रीयता, स्पष्टवक्तेपणा आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ती प्रकट होत होती. १८७२ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर डेक्कन कॉलेजांतून त्यांनी १८७६ मध्ये बी.ए. ही पदवी परीक्षा उतीर्ण केली. १८७९ मध्ये ते एल. एल. बी. झाले. सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यावेळी विचारांच्या आधारावर त्यांची ओळख गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्या मित्रत्वात नेहमी राष्ट्र, राष्ट्रांचे स्वातंत्र्य, ब्रिटिशांची जुलमी शासनपद्धती, ती दूर करण्यासाठी काय करता येईल याचाच विचार होत असे. त्यातून असे ठरले की, फक्त शिक्षकी पेशात अडकून राहण्यापेक्षा राष्ट्रकार्यासाठी सदैव तत्पर राहावे, लोकांच्या मनात स्वदेशाविषयीची निष्ठा वाढवावी, परकियांच्या सत्तेतून भारतीयांची मुक्तता व्हावी, भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटावी हे हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इंग्रजीत मराठा आणि मराठीत केसरी अशी दोन वर्तमानपत्रे सुरुवात केली. त्या वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेचे वर्णन करतानाच देशातील तरुणांना जागे करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांना अपेक्षित असणारा बदल लोकांच्या विचारात व्हायला सुरुवात झाली. केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रामधील लेख वाचून लोकांच्या मनात ब्रिटीश राजवटीबद्दलचां असंतोष वाढू लागला. याच असंतोषातून सरकारला केसरी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा खूप मोठा धाक निर्माण होऊ लागला.

स्वदेशीच्या मुद्द्यावर त्यांनी लोकांना एकत्र करत परदेशी कपड्याच्या होळ्या केल्या. त्यामुळे त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर घ्यायला सुरुवात झाली. सुरत येथे भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी परकीय सत्तेविरूद्ध लढण्याचा मार्ग सांगितला. याच ठिकाणी त्यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करून घेतला. त्याचवेळी भारतात दोन गट निर्माण झाले. एक गट हा सर्वप्रथम सामाजिक सुधारणा इंग्रज करत आहेत तर करू देत त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले तरी चालेल या मताचा होता तर दुसरा गट हा आधी स्वातंत्र्य द्या सुधारणा आमच्या आम्ही करू. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे दुसऱ्या गटाचे नेतृत्व करत होते. त्यांच्या मतानुसार इंग्रजांनी या देशातून चालते व्हावे, त्यानंतर आम्ही आमच्या देशाच्या सुधारणा आमच्या पातळीवर करून घेऊ. कारण आम्ही आता इंग्रजांच्या गुलामगिरीत जास्त काळ राहू शकत नाही. त्यांच्या याच आक्रमकतेने त्यांना राष्ट्रीय नेतृत्व ही ओळख निर्माण करून दिली. अनेक क्रांतीकारकांना विविध स्वरूपात त्यांनी प्रेरणा दिली. त्यामुळे क्रांतीकारकांना त्यांचा सहवास लाभला. त्यातून अनेक बाबींची साध्यता भारतीय स्वातंत्र्यचळवळीत झाली. महात्मा गांधी यांच्या उदयापूर्वी टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ योग्य मार्गावर नेली.

इंग्रज सरकारने सुरू केलेल्या विविध कायद्याने सुरू केलेल्या अत्याचाराविरूद्ध ब्रिटीश सत्ता ही धोकादायक असल्याचे सांगितले. म्हणून त्यांनी `देशाचे दुर्दैव’ हा अग्रलेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचा परिणाम असा झाला की, ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. आणि त्यांना मंडाले येथील तुरुंगात ठेवले. त्याही ठिकाणी ते शांत राहिले नाहीत. आपल्या अभ्यासुपणातुन तेथे त्यांनी भगवद्गीतेवर टिका करणारा `गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. त्यासोबतच आर्यांचे वस्तीस्थान, ओरायन, द आर्कटिक होम ऑफ द वेदाज (The Arctic Home in the Vedas), The Hindu philosophy of life, ethics and religion, Vedic Chronology & Vedang Jyotish, टिळक पंचांग पद्धती इत्यादी ग्रंथ लिहिले. या सर्व लेखनात लहानपणापासूनच हुशार असल्याने त्यांनी कधीही अभ्यास वा इतर बाबीत टाळाटाळ केली नाही. कोणतेही तथ्य मांडताना त्यांनी सर्वच बाजूंचा विचार करून आपले मत मांडले. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथातून अनेक बाबी समोर आल्या.

ज्याप्रकारे त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांनी इतिहास घडवला. तसाच काहीवेळा वादही झाला. मवाळ असलेली काँग्रेस त्यांच्या प्रवेशानंतर जहाल झाली. त्यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्धचा रोष वाढू लागला. सार्वजनिक गणेशोत्सव असो किंवा सार्वजनिक शिवजयंती असो या व अशा उपक्रमातून लोकांना त्यांनी एकत्र करत त्यांच्यात स्वातंत्र्याबद्दल जाणीवजागृती निर्माण केली. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवाला त्यांनी सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामुळे अनेक उपक्रम सार्वजनिक स्वरूपात व्हायला सुरुवात झाली.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान हे अत्त्युच होतेच. परंतु काही बाबतीत त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार करता घेतलेले निर्णय हे बराच काळ समाजात वादळ निर्माण करणारे ठरले. त्यामध्ये चिरोल प्रकरण, वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण इत्यादी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर गादीचे वारसदार राजर्षी शाहू महाराज यांच्या विरोधात काही प्रस्थापित लोकांनी कट कारस्थान केली. त्यामध्ये त्यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार टिळकांनी राजर्षी शाहू महाराज यांना विरोध करत कोल्हापूर संस्थानातील ब्राह्मण वर्गाची बाजू घेतली त्यामुळे सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी लोकमान्य टिळक यांच्यातील वाद अख्ख्या देशाने पाहिला. वेदोक्त प्रकरणात तर कहरच झाला. मुघल सत्तेपासून लोकमान्यता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला, कोल्हापुरातील सनातनी वर्गाने छत्रपती शाहू महाराजांनाच शूद्र ठरवले. आणि दुर्दैवाने लोकमान्य टिळकांनी या प्रकरणात राजर्षी शाहू महाराजांच्या विरोधात भूमिका घेत आपली पूर्ण ताकद महाराजांच्या विरोधात उभी केली. याचा परिणाम असा झाला की, दोघांतील वैर हे वाढतच गेले. त्यामुळे ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर यांच्यात एक प्रकारची दरी तयार झाली. असे असले तरी राजर्षी शाहू महाराजांनी टिळकांबद्दल आणि लोकमान्य टिळकांनी राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल सतत आदरच व्यक्त केला. ज्यावेळी टिळकांचे निधन झाले त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी भोजन करत होते. तेंव्हा त्यांनी उदगार काढले की, दिलदार शत्रू कमी झाला. मात्र दोघांच्याही समर्थकांनी या वादाला पूर्णपणे विभागणी करत दोघांच्याही कार्याला नक्कीच मर्यादित केले असे म्हणायला वाव आहे. त्याकाळची परिस्थिती लक्षात घेता या दोन्ही राष्ट्रीय नेत्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या कालानुरूप दोघांसाठीही योग्य होत्या की अयोग्य हे इतिहासालाच माहीत. मात्र दोघांचेही कार्य हे आपापल्या क्षेत्रात आदर्शवत होते. त्या कार्याचाच आदर्श आजच्या समस्त समाजाने घेणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या सभेला राष्ट्रव्यापी स्वरूप दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली या सभेने ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांमध्ये जनजागृती करण्यात आघाडी घेतली. शेतकरी, कामगार, क्रांतिकारक, सर्वसामान्य जनता यांना टिळकांनी एकत्र आणले. त्यामुळे हा लढा राष्ट्रव्यापी आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्यास मदत करणारा ठरला. म्हणूनच त्यांचे भारताच्या इतिहासात आदराचे स्थान आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी घेतानाच त्यांना सर्वसामान्य जनतेनीदेखील राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत स्थान दिले. ज्यावेळी त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळी त्या अंत्ययात्रेतील उपस्थित असणारा लाखो लोकांचा समुदाय त्यांचे लोकमान्यत्व मान्य करणारा होता.
आज समाजात वा देशात प्रचंड वाढलेली महागाई, गगनाला भिडणारे दर यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. कुणालाही काही पडले नाही. मात्र टिळकांनी त्या काळात लोकांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घ्यायला शासनाला भाग पाडले. आज १ ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळक यांची शतकोत्तर पहिल्या स्मृतीदिनानिमित्त लोकांनी मान्य केलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन!

©® श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर

You cannot copy content of this page