आज माझ्या आक्काचा `अमृत’ वाढदिवस…

|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ||

चिरकाल टिकणारी सुसंस्काराची अमूल्य श्रीमंती तिने आम्हाला मुक्तहस्ताने भरभरून दिली. तिच्या प्रेममय जिव्हाळ्याच्या शुभ स्पंदनातून आम्हा भावंडांची प्रगती झाली. कारण तिचा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ सदैव तिच्या संगतीलाच नव्हे तर आमच्याही निरंतर पाठीशी उभा राहिला- प्रसंगी आम्हाला आलेल्या संकटाच्या समोर उभा राहिला.

सच्ची स्वामी भक्त असणाऱ्या आमच्या आक्काने आम्हा भावंडांना आईसारखीच माया आणि बापासारखाच आधार दिला. तिने आम्हाला जे काही दिले ते शब्दात न मांडता येणारे आहे. तिची स्वामींवर अपार श्रद्धा, अतूट विश्वास. ह्या भक्तीतूनच तिने सुसंस्काराचे बीज रोवले आणि ते आज वटवृक्षाप्रमाणे वाढले आणि भविष्यातही वाढत राहील….

माझी मोठी बहीण म्हणजे आमची आक्का. आमचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबातील. वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव सीताबाई. नावाप्रमाणेच आध्यात्मिक आचरण असलेल्या आईवडीलांच्या पोटी आमचा जन्म झाला. गरीब कुटुंबात हालअपेष्टा पाचवीला पुजलेल्या. त्यामुळे चौथीपर्यंत अर्धवट शिक्षण घेऊन आक्काने शाळेला रामराम ठोकला खरा; मात्र आपल्या स्वकर्तृत्वाने गेली सहा दशकं जीवनाच्या शाळेत परिपूर्ण यशस्वी विद्यार्थिनी म्हणून ती वावरली.

मोठ्या कष्टाची कामं करताना तिची कधी दमछाक झाली नाही. वडिलांना शेती कामात दिवसभर ती मदत करायची. वयाच्या सोळाव्या वर्षी तिचं लग्न झालं. चंदेवण येथे सासरी आईवडिलांप्रमाणेच सासूसासऱ्यांची सेवा केली. भावोजी मुंबईमध्ये नोकरी करीत होते. त्यामुळे ती मुंबईत आली. मुंबईमध्ये येऊन आपल्या चार मुलांचे संगोपन करून त्यांना उच्चशिक्षित करताना सुसंस्कार दिले. त्यामुळे तिच्या मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचे नांव उज्ज्वल केले. संसाराचा गाढा हाकत असताना तिने शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले आणि संसाराला आर्थिक हातभार लावला.

चाळीतील छोट्याशा झोपडीवजा खोलीत राहून पतीच्या मदतीने गावातील सासरच्या आणि माहेरच्या मंडळींना अडीअडचणीमध्ये तिने नेहमीच मदतीचा हात दिला. आम्हा भाऊबहिणींना मुंबईमध्ये आश्रय देऊन नोकरीत स्वावलंबी केलं. त्यांना जीवनात स्वबळावर उभं केलं.

आज अशा बहिणीचा म्हणजेच आक्काचा आदर्श ठेवून आम्ही भावाबहिणीने आमच्या मुलांना उच्चशिक्षण व सुसंस्कार देऊ शकलो. आमची बहिण व आमचे भावोजी यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे व प्रेरणेमुळे आम्ही खऱ्या अर्थाने सन्मार्गावर दृढ राहिलो.

अशा माझ्या आक्काकडे पाहाताना मला अभिमान व गर्व वाटतो. सगळ्यांवर सामान्यपणे प्रेम करणारी आक्का आज ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. आज तिचा `अमृत’ वाढदिवस. तिला आम्हा सावंत कुटुंबियांकडून मनःपूर्वक हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा!

तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा, तिचा आशीर्वाद आम्हाला सदैव मिळावा आणि माझ्या आक्काला पुढील आयुष्य आरोग्यदायी, सुखसमृद्धी व आनंददायी जावो; हीच परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या चरणी प्रार्थना!

||नाथसंविध्||

-सौ.मुग्धा(जना) मोहनसिंह सावंत

You cannot copy content of this page