श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – १७
*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -१७🌟*
*🔆भक्तिमय सेवा : भाग – १🔆*
*🔅🧵मायेची ऊब🪡*
🔅आई किंवा आजीच्या साडीची प्रेमाने शिवलेली ‘गोधडी’ ही सर्वसाधारण गोधडी नसते, तर अशा गोधडीतून मिळणारी ऊब ही ‘मायेची ऊब’ असते. मात्र देशात अनेक कष्टकरी कुटुंबांना अशी मायेची ऊब देणारी गोधडी मिळणे दुरापास्त असते. हिवाळ्यातील बोचर्या थंडीत अंगावर पांघरण्यासाठी काहीही उपलब्ध नसलेल्यांना हे दिवस कुडकुडत काढावे लागतात. म्हणूनच सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘मायेची ऊब’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत जुन्या साड्यांपासून श्रद्धावान गोधड्या शिवतात व या गोधड्यांचे नंतर गरजूंना वाटप केले जाते.
🔅यासाठी श्रद्धावान पुरुष व स्त्रिया दोघांनाही गोधड्या शिवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जुन्या साड्या, चादरी यांपासून गोधडी तयार करायला शिकवले जाते. गोधडी शिवताना घालण्यात येणारे टाके मुद्दामहून अतिशय छोटे घातले जातात. यामुळे लहान बाळांच्या कानातली रिंग किंवा पायातले वाळे त्यात अडकत नाहीत. तसेच या गोधड्या वजनाने हलक्या बनविल्या जातात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनाही या गोधड्या धुवून वाळत घालता येतात. तसेच गोधड्यांच्या चारही बाजू पद्धतशीरपणे बंद केल्या जातात. यामुळे खेड्यापाड्यात गोधडीच्या आतील (पदराच्या) भागात कीटक, गांडूळ किंवा सापाचे पिल्लू शिरू शकत नाही.
*गोधडीचे वैशिष्ट्य –*
🔅बाजारात विकत घेतलेल्या गोधड्या आणि श्रध्दावानांनी स्वतःच्या हाताने बनविलेल्या या गोधड्या यांमधील महत्वाचा फरक म्हणजे या कुठल्याही अपेक्षेशिवाय व सद्गुरुंवरील निरपेक्ष प्रेमापोटी बनविलेल्या असतात. श्रद्धावान परमेश्वराचे व सद्गुरुंचे नामस्मरण करीत या गोधड्या बनवतात, त्यामुळे या सेवेला भक्तीची जोडही मिळते तसेच गोधडी तयार करण्याचेही समाधान मिळते.
*🔅दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ मध्ये अनसूयामाता आणि महिषासुरमर्दिनीला अर्पण केलेले ब्लाऊजपीस आणि दत्तगुरुंना अर्पण केलेले उपरणेही गोधडी तयार करताना वापरली जातात. यामुळे अनसूयामाता, मोठी आई जगदंबा आणि दत्तगुरुंचा आशीर्वादही गोधडी बनवणार्या श्रद्धावानाला व वापरणार्या गरजवंताला अशा उभयतांनाही मिळतो असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.*
*🔆गोधड्या वाटप –🔆*
🔅दरवर्षी कोल्हापूर आणि विरार येथील मेडिकल कॅम्पमध्ये गरजूंना गोधड्या दिल्या जातात. २६ जुलै २००५ च्या मुंबई पुरादरम्यान अनेक गरजू कुटुंबांना गोधड्या देण्यात आल्या होत्या. २००२ सालापासून (२०१८ पर्यंत) धुळे, कोल्हापूर, रत्नागिरी व नवी मुंबई इथे सुमारे *८४,००० गोधड्या* बनवून त्या गरजूंना वाटण्यात आल्या. सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा वाढदिवस किंवा इतर विशेष धार्मिक कार्याच्या निमित्ताने श्रध्दावान गोधडी शिवून त्या भेट किंवा दान स्वरूपात देतात.
*🔅🧶🧥वात्सल्याची ऊब*
🔅अंगावर घालण्यासाठीही पुरेसे कपडे नसलेल्या भारतातील कष्टकरी समाजाला थंडीचे दिवस म्हणजे मोठे संकट असते. या दिवसात थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना साधे स्वेटर्ससुद्धा उपलब्ध होत नाहीत, ती खरेदी करण्याचे सामर्थ्यही त्यांच्यामध्ये नसते. थंडीच्या लाटेत मृत्यु झाल्याच्या घटना, बातम्या आपल्या वाचनात येत असतात. यामध्ये लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. अशा मंडळींना ‘वात्सल्याची ऊब’ या सेवेअंतर्गत विणलेले स्वेटर्स दिले जातात.
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली *‘अहिल्या संघा’तर्फे ‘वात्सल्याची ऊब’* हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात लोकरीच्या विणकामाची सेवा श्रद्धावान करतात. या सेवेत सहभागी असलेले श्रद्धावान लोकर व दोन सुयांच्या सहाय्याने स्वेटर्स विणतात. नवजात बालके, दहा वर्षांखालील मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर्स विणले जातात. स्वेटर्स व्यतिरिक्त कानटोप्या, टोपरी, मोजे आणि मफलर ही विणले जातात. आतापर्यंत (२०१८ पर्यंत) श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट व संलग्न संस्थांद्वारे सुमारे *२२,००० स्वेटर्सचे* वाटप करण्यात आले आहे.
🔅ज्या स्त्री श्रद्धावानांना स्वेटर्सचे विणकाम करण्याची इच्छा आहे, अशा स्त्रियांना अहिल्या संघातर्फे विनामूल्य विणकामाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण आठवड्यातून दोन वेळा दिले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी साधारण सहा महिन्यांचा असतो.
🔅साधारपणे वयाच्या पन्नाशीनंतर बर्याच गृहिणी कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या असतात. अशा गृहिणींकडे मोकळा वेळ असतो. हा वेळ त्या स्वेटर्स विणकामासाठी वापरू शकतात. बर्याच स्त्री श्रद्धावान याचा लाभ घेतात. प्रेमाने व निरपेक्ष भावनेने विणलेल्या स्वेटरला नुसती लोकरीची ऊब नाही, तर त्याला वात्सल्याचीदेखील ऊब असते. अनेक स्त्री श्रद्धावान भगवंताचे व सद्गुरुंचे नामस्मरण करीत ही सेवा करतात, त्यामुळे या सेवेला भक्तीची जोडही मिळते. अशा सेवेतून निर्माण होणारी ही ऊब माणसाला आयुष्यात तग धरून राहण्यास मदत करते.
*🔆🌟जुनं ते सोनं🌟🔆*
‘
🔅जुनं ते सोनं’ ही एक जुनी म्हण आहे. बर्याच वेळा अडगळीत टाकून दिलेल्या किंवा उपयोगात नसलेल्या कित्येक गोष्टी अचानक इतक्या उपयोगी वाटू लागतात की त्याचे मूल्य त्यावेळी सोन्यापेक्षा कमी वाटत नाही. सध्या ‘वापरा आणि फेका’ अर्थात ‘यूज अँड थ्रो’
चा जमाना आहे. मात्र असे असूनही अनुभवातून साकारलेल्या ’जुनं ते सोनं’ या म्हणीचे महत्त्व अबाधित आहे. याच म्हणीतून मिळणार्या बोधावर आधारलेल्या ‘जुनं ते सोनं’ या उपक्रमाची २००२ साली सद्गुरु अनिरुद्धांनी (बापूंनी) घोषणा केली.
🔅३ ऑक्टोबर २००२ साली *तेरा कलमी कार्यक्रमाची घोषणा* करताना, बापूंनी यातील एक कलम ‘वस्त्र योजना’ जाहीर करताना ‘जुनं ते सोनं’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. या उपक्रमाची घोषणा करून साध्यासाध्या गोष्टीतून आपण कशाप्रकारे आपली सामाजिक जबाबदारी पार पाडू शकतो, याची जाणीव बापूंनी श्रद्धावानांना करून दिली.
🔅देशात सामाजिक दरी इतकी मोठी आहे की अनेक ग्रामीण भागात अंगावर घालण्यासाठी धड कपडे नसतात, मुलांकडे खेळणी नसतात. शिक्षण घेण्यासाठी पुस्तके व शालेय वस्तू नसतात. मात्र ज्यांच्याकडे त्या पुरेशा आहेत, त्याचे कधी कधी त्यांना मोल नसते. अनेक वेळा आपले जुने झालेले कपडे आपण असेच फेकून देतो. लहान मुलांची जुनी झालेली खेळणी अशीच अडगळीत पडून राहतात किंवा भंगारात विकली जातात. पुढच्या वर्गात गेल्यावर मागच्या वर्गातील शालेय पुस्तकांचीही अशीच स्थिती होते. मात्र आपल्यासाठी टाकाऊ असलेल्या किंवा कोणतेही मोल न उरलेल्या या वस्तू, ज्यांना नवीन गोष्ट विकत घेणे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या शक्य नाही, त्यांच्यासाठी सोनंच ठरतात. आपले जुने कपडे, खेळणी, पुस्तके या योजनेअंतर्गत दिल्या तर काय फरक पडू शकतो, हेही बापूंनी पटवून दिले. त्यानंतर सद्गुरु बापूंच्या मार्गदर्शनाने सद्गुरु अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने ‘जुनं ते सोनं’ या प्रकल्पाची सुरुवात केली.
*🔅‘सद्गुरु अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ने मान्यता दिलेल्या उपासना केंद्रांवर तसेच ‘श्रीहरिगुरुग्राम’ (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे)* येथे दर गुरुवारी श्रद्धावानांनी स्वेच्छेने आणून दिलेले जुने कपडे जमा केले जातात. हे कपडे जमा करताना ते स्वच्छ व फाटलेले नसल्याची खात्री संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. सुस्थितीतील कपडे ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळावेत हे संस्कार बापूंनी श्रध्दावानांच्या मनावर रुजवले आहेत.
*🔅‘जुनं ते सोनं’ सेवेचे व्यवस्थापन व अंमलबजावणीची पद्धत –*
🔅कपडे केंद्रांवर जमा झाल्यानंतर श्रद्धावान त्या कपड्यांचे वयोगटावरून वर्गीकरण करतात. लहान मुलांचे, मध्यमवयीन स्त्री-पुरुषांचे, तसेच वृद्ध स्त्री-पुरुषांचे वयोगटानुसार वर्गीकरण केले जाते. त्यानंतर प्रत्येक केंद्राजवळचे श्रद्धावान त्यांच्या विभागाजवळच्या गावांमध्ये जाऊन सर्वेक्षण करतात.
🔅प्रत्येक गरजू कुटुंबात किती माणसे आहेत, याची मोजणी केली जाते. त्यात स्त्रिया, पुरुष व लहान मुले किती आहेत, या सगळ्याचा सखोल अभ्यास केला जातो. सर्वेक्षण झाल्यानंतर जमा झालेले कपडे पुरेसे आहेत का, याचाही आढावा घेतला जातो. कपडे पुरेसे नसतील तर केंद्रांमध्ये कपडे जमा करण्यासाठी निवेदन केले जाते. एकदा का पुरेसे कपडे जमा झाले की कपड्यांच्या वर्गीकरणाची सुरूवात होते.
🔅कुटुंबांप्रमाणे गाठोडी तयार केली जातात. प्रत्येक कुटुंबाच्या गाठोड्यात त्या घरातील प्रत्येकासाठी कपडे असतात. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला कुटुंबाला एक नंबर दिला जातो आणि त्या नंबरने ते कुटुंब ओळखले जाते किंवा त्या गाठोड्यावर कुटुंबाचे नाव लिहीतात. असे करण्यामागचे कारण म्हणजे जेणेकरून ते गाठोडे कुणाला द्यायचे आहे हे कळते.
🔅सगळी गाठोडी एकत्र बांधून टेम्पो किंवा अन्य गाडीत भरून सर्वेक्षण केलेल्या गावांमधे नेली जातात. गावात गेल्यावर पूर्वनियोजित मध्यवर्ती ठिकाणी श्रद्धावान प्रत्येक कुटुंबाचे नाव पुकारतात व त्या कुटुंबातील एक जण पुढे येऊन ते गाठोडे श्रद्धावानांकडून स्वीकारतो. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. ही मंडळी अत्यंत समाधानाने हे गाठोडे घेऊन घरी जातात. त्यांच्या चेहर्यारवचे ते भाव पाहून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.
🔅या योजनेत केवळ कपडेच नाहीत जुनी भांडी व खेळणीदेखील स्वीकारली जातात. गरीब कुटुंबाना या भांड्यांची व ह्याच कुटुंबातील मुलांना ह्या खेळण्यांची खूप आवश्यकता असते.
🔅गेल्या काही वर्षांपासून ‘जुनं ते सोनं’ योजनेची व्याप्ती वाढली आहे. कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरातील सेवेत ‘जुनं ते सोनं’च्या द्वारे संस्था कपडे, खेळणी, भांड्यांचे वाटप करीत आहेत.
🔅कोल्हापूरच्या *पेंडाखळे* गावात हे वैद्यकीय शिबिर आयोजित केले जाते. या शिबिराच्या खूप दिवस आधी काही श्रद्धावान मंडळी केवळ सर्वेक्षणासाठी तिथे जातात आणि प्रत्येक कुटुंबात कपड्यांची, भांड्यांची, खेळण्यांची किती गरज आहे त्याचे सर्वेक्षण करतात. परत या कपड्यांचे कुटुंबाप्रमाणे व त्यांच्या गरजांप्रमाणे गाठोडे बांधले जाते. शिबिराच्या दिवशी श्रद्धावानांकडून गरजूंना कपड्यांचे, खेळण्यांचे, भांड्यांचे व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जाते. काही गावांमध्ये स्वतः *परमपूज्य नंदाई व परमपूज्य सुचितदादा जाऊन गावकर्यांना या वस्तूंचे वाटप करतात.* त्यावेळी ह्या गावातील माणसांच्या चेहर्यावरचा आनंद हा वर्णनाच्या पलीकडचा आहे.
🔅श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या ह्या जुनं ते सोनं या सद्गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या प्रेरणेने सुरु केलेल्या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबाना कपडे व गरजेच्या वस्तूंचा लाभ मिळाला. तसेच ती कुटुंबे बापूंच्या निरपेक्ष प्रेमाच्या सावलीत सुखाने राहू लागली. आणि सर्वांत विशेष म्हणजे श्रद्धवानांकडच्या अनेक जुन्या वस्तूंचे सोनं झालं.
*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*
साभार – WhatsApp