`अनिरुद्ध पहाट-५’ गुरुगीता- श्रीगुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच!

।। हरि ॐ।।

जगद्गुरु श्रीशिवशंकर अर्थात महादेव व पार्वती माता यांच्या संवादातून प्रकट झालेली व समग्र स्कंदपूरणाचा सारांश असलेली गुरुगीता सर्व श्रद्धावानांसाठी, परमात्म्याच्या भक्तांसाठी आदर्शदिपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गर्दर्शन करीत राहते. गुरुगीता श्रद्धायुक्त श्रवणाने व पठणाने सुद्धा सद्गुरु भक्तीचे माहात्म्य समजून येतेच; त्याचबरोबर आपसूकपणे सद्गुरूंचे नामस्मरण व गुणसंकीर्तन आपल्याकडून सहजपणे केले जाते. गुरुगीतेतून जगाला अंतिम सत्याचा, सर्वोच्च आनंदाचा मार्ग समजावून दिला आहे. तसेच गुरुगीता समजून घेतल्याशिवाय सद्गुरूंचे नामस्मरण व गुणसंकीर्तन पूर्णच होऊ शकत नाही. कालपासून आपण थोडक्यात गुरुगीता पाहण्यास सुरुवात केलीय! आज १२ व्या श्लोकापासून पुढील श्लोक पाहू!

गुरुपादांबुजं स्मृत्वा, जलं शिरसि धारयेत् । सर्वतीर्थावगाहस्य, संप्राप्नोति फलं नरः ॥१२॥

श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून मस्तकावर पाणी ओतले असता म्हणजेच स्नान केले असता (चरणतीर्थ मस्तकी धारण केल्यास), सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला मिळते. सद्गुरुचरणतीर्थ निरंतर सर्व तीर्थांचे माहेर होय. ॥१२॥

शोषणं पादपंकस्य, दीपनं ज्ञानतेजसाम् । गुरुपादोदकं सम्यक्, संसारार्णवतारकम् ॥१३॥

श्रीगुरुचरणतीर्थ पापरूपी चिखलाला सुकविणारे, पापहारक आहे. ज्ञानरूपी तेजाला उज्ज्वल, अधिक प्रकाशित करणारे, ज्ञानवर्धक आहे. संसारसागरातून पार करणारे तारक आहे. ॥१३॥

अज्ञानमूलहरणं, जन्मकर्मनिवारणम् । ज्ञानवैराग्यसिद्धयर्थं, गुरुपादोदकं पिबेत् ॥१४॥

समूळ अज्ञान दूर करणारे, जन्म आणि कर्म ह्यांचे निवारण करणारे हे गुरुपादोदक, श्रीगुरुचरणतीर्थ, ज्ञान आणि वैराग्यप्राप्तीसाठी प्राशन करावे. ॥१४॥

गुरोः पादोदकं पीत्वा, गुरोरुच्छिष्टभोजनम् । गुरुमूर्तेः सदा ध्यानं, गुरुमंत्रं सदा जपेत् ॥१५॥

गुरुचरणतीर्थ प्राशन करून, श्रीगुरुआज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून, श्रीगुरुमूर्तीचे अंतरी सदैव ध्यान करित गुरूने दिलेल्या मंत्राचा सदा जप करावा. ॥१५॥

काशीक्षेत्रं तन्निवासो, जान्हवी चरणोदकम् । गुरुर्विश्वेश्वरः साक्षात्, तारकं ब्रह्म निश्चितम् ॥१६॥

श्रीगुरुचे निवासस्थान म्हणजेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ म्हणजेच गंगा, श्रीगुरू म्हणजेच प्रत्यक्ष श्रीविश्वेश्वर समजावेत, श्रीगुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच होत. ॥१६॥

गुरोः पादोदकं यत्तु, गयाऽसौ सोऽक्षयो वटः । तीर्थराजः प्रयागश्च, गुरुमूर्ते नमो नमः ॥१७॥

श्रीगुरुचे चरणतीर्थ हेच प्रत्यक्षात गयातीर्थ होय. गुरुच जणू गयेचा चिरंतन वटवृक्ष होय. सर्व तीर्थात जे प्रमुख प्रयाग तीर्थ ते गुरुच होय. अशा महान गुरुमूर्तीला द्विवार नमस्कार असो. ॥१७॥

गुरुमूर्ति स्मरेन्नित्यं, गुरुनाम सदा जपेत् । गुरोराज्ञां प्रकुर्वीत, गुरोरन्यन्न भावयेत् ॥१८॥

श्रीगुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्रीगुरुची आज्ञा मनःपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात अन्य भावभावना ठेवू नये. ॥१८॥

गुरुवक्त्रस्थितं ब्रह्म, प्राप्यते तत्प्रसादतः । गुरोर्ध्यानं सदा कुर्यात्, कुलस्त्री स्वपतेर्यथा ॥१९॥

गुरु ब्रह्मरूप होय. गुरुमुखस्थित ब्रह्म हे गुरूच्या कृपेनेच प्राप्त होते. म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे चिंतन करते त्याप्रमाणे स्त्रीगुरुचे ध्यान, चिंतन सदा करावे. ॥१९॥

स्वाश्रमं च स्वजातिं च, स्वकीर्तिपुष्टिवर्धनम् । एतत्सर्व परित्यज्य, गुरोरन्यन्न भावयेत् ॥२०॥

आपले घरदार, आपली जात, कुळ, वंशाभिमान, आपली कीर्ति, वैभव, कला, विद्या, धन इ. वृद्धीचा लोभ, हाव, आसक्ती सोडून देऊन केवळ गुरुशिवाय इतर कोठेही कशावरही भावना ठेवू नये. एकमेव गुरुच भजावा. गुरुचेच ध्यान करावे. ॥२०॥

अनन्याश्चिन्तयन्तो मां, सुलभं परमं पदम् । तस्मात्सर्वप्रयत्नेन, गुरोराराधनं कुरु ॥२१॥

अनन्यभावाने, एकनिष्ठेने जे कोणी शिवरूप गुरूचे चिंतन करतात त्यांना परम पद सुलभ आहे. म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न करून श्रीगुरुची आराधना, भक्ती करावी. ॥२१॥

त्रैलोक्यस्फुटवक्तारो, देवाद्यसुरपन्नगाः । गुरुवक्त्रस्थिता विद्या, गुरुभक्त्या तू लभ्यते ॥२२॥

त्रैलोक्यात स्पष्टवक्ते, देवादिक, दैत्य, असुर आणि पन्नग म्हणजे नाग, सर्प इ. असले तरी गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही. ॥२२॥

सद्गुरुंच्या चरणी पूर्णपणे समर्पित होण्यासाठी मनाची, बुद्धीची मशागत व्हावी लागते. त्यानंतर त्यातून सद्गुरु भक्तीचे भरघोस पीक येते. मनाची व बुद्धीची मशागत गुरुगीता करते! म्ह्णूनच गुरुगीता सर्व श्रद्धावानांना प्रिय असते!

-`स्टार वृत्त’ ०४०५२०२५

अनिरुद्ध पहाट-१ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

अनिरुद्ध पहाट-२ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

अनिरुद्ध पहाट-३ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

अनिरुद्ध पहाट-४ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!