`अनिरुद्ध पहाट-८’ सद्गुरुंची कृपा जीवनात प्रवाहीत करण्याचा मार्ग म्हणजेच गुरुगीता!
।। हरि ॐ।।
सद्गुरुंची महिमा काय वर्णावी? आम्ही श्रद्धावान आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या लाडक्या सद्गुरुंचे तोडक्या मोडक्या शब्दात रूप व गुणसंकिर्तन करतो. तेही `तो’ गोड मानून घेतो. कारण त्या शब्दांपेक्षा आमचा भाव `तो’ पाहतो नव्हे जाणतो! ह्या सद्गुरुंची महिमा साक्षात भोलेनाथांच्या मुखातून ऐकताना त्या आदिमाता पार्वतीला किती आनंद झाला असेल? आणि हाच संवाद वाचताना-ऐकताना आम्हालाही सद्गुरुंची कृपा मिळणारच आहे. हे मात्र नक्की! म्हणूनच श्री गुरुगीतेचा लाभ अवश्य घेऊयात! सद्गुरुंची कृपा जीवनात प्रवाहीत करण्याचा मार्ग म्हणजेच गुरुगीता!
यदंघ्रिकमलद्वंद्वं, द्वंद्वतापनिवारकम्। तारकं सर्वदाऽऽपद्भ्यः, श्रीगुरुं प्रणमाम्यहम्॥४३॥
ज्याचे चरणकमलयुगुल, सुखदुःख, शीतोष्ण, मानापमानादि द्वंद्वापासून होणारा ताप, त्रास निवारण करणारे आणि सर्वदा सर्वकाळी आपत्तीतून तारणारे, संकटभयनाशक करणारे आहेत. अशा श्रीगुरुला प्रणाम असो.
शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता, गुरौ क्रुद्धे शिवो न ही। तस्मात्सर्वप्रयत्नेन, श्रीगुरुं शरणं व्रजेत्॥४४॥
शंकराला क्रोध आला, तो साधकावर रागावला तर गुरुभक्ताचा पाठीराखा गुरू असतो. पण गुरुच रुष्ट झाला तर मात्र आपला त्राता त्रिभुवनात कॊणी नाही. म्हणून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुरुशरणागति पूर्णपणे पत्करण्याचा प्रयत्न करायला हवा.
वन्दे गुरुपदद्वंद्वं, वाङ्मनश्चित्तगोचरम्। श्वेतरक्तप्रभाभिन्नं, शिवशक्त्यात्मकं परम्॥४५॥
वाणी म्हणजे सर्व पंचज्ञानेंद्रिये, मन, चित्त ह्यांना दिसणारे श्वेत आणि रक्त म्हणजे पांढरा व तांबडा प्रकाश ह्याहून भिन्न जो नीलवर्ण अशा शिवशक्तीरूप श्रेष्ठ गुरुचरणांना मी वंदन करतो.
गुकारं च गुणातीतं, रुकारं रूपवर्जितम्। गुणातीतस्वरूपं च, यो दद्यात्स गुरुः स्मृतः॥४६॥
गु अक्षराने गुणातीत आणि रु अक्षराने रूपातीत स्वरूप निर्देशित होते. जो गुणरुपाच्या पलीकडे म्हणजेच निर्गुण निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरू ही संज्ञा प्राप्त होते.
अ-त्रिनेत्रः सर्वसाक्षि, अ-चतुर्बाहुरच्युतः। अ-चतुर्वदनो ब्रह्मा, श्रीगुरुः कथितः प्रिये॥४७॥
हे प्रिये, तीन नेत्र नसूनही जो सर्वसाक्षी शिवरूप आहे, चतुर्भुज नसूनही जो अच्युत, विष्णू आहे, चार मुखे नसतानाही जो ब्रह्मदेव आहे, असा हा गुरूचा महिमा वर्णिलेला आहे.
अयं मयाञ्जलिर्बद्धो, दयासागरवृद्धये । यदनुग्रहतो जन्तुश्चित्रसंसारमुक्तिभाक्॥४८॥
ज्याच्या कृपेने जिवाला ह्या भेदात्मक संसारातून मुक्त होता येते; त्या दयासागर गुरूच्या कृपेला भरती यावी म्हणून मी गुरूला हात जोडून प्रणाम करतो.
श्रीगुरोः परमं रूपं, विवेकचक्षुषोऽमृतम्। मन्दभाग्या न पश्यन्ति, अन्धाः सूर्योदयं यथा॥४९॥
श्रीगुरुचे परम रूप, विवेकरूपी चक्षूंसाठी अमृतसमान होय. परंतु आंधळ्यांना जसा सूर्योदय दिसू शकत नाही त्याप्रमाणे मंदभाग्य असलेले जीव ह्या गुरुरूपाला पाहू शकत नाहीत.
श्रीनाथचरणद्वंद्वं, यस्यां दिशी विराजते। तस्यै दिशे नमस्कुर्याद्भक्त्या प्रतिदिनं प्रिये॥५०॥
हे प्रिये, ज्या दिशेला श्रीगुरुनाथांचे चरणयुगुल विराजमान झालेले असतात त्या दिशेला प्रतिदिनी भक्तीपूर्वक नमस्कार करावा.
तस्यै दिशे सततमञ्जलिरेष आर्ये, प्रक्षिप्यते मुखरितो मधुपैर्बुधैश्च। जागर्ति यत्र भगवान् गुरुचक्रवर्ती, विश्वोदयप्रलयनाटकनित्यसाक्षी॥५१॥
हे आर्ये, जेथे भगवान सार्वभौम गुरुमहाराज विश्वाचा उदय, प्रलय, उत्पत्तिस्थितिरूपी घडामोडीचे नाटक नेहमी साक्षीभावाने बघत जागृत असतात त्या दिशेला भुंग्यांप्रमाणे गुरुस्तवन करणाऱ्या शब्दांचा गुंजारव करणारे ज्ञानी पुरुष हात जोडून नमस्कार करित असतात.
श्रीनाथादिगुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं, सिद्धौघं बटुकत्रयं पदयुगं दूतीत्रयं शांभवम् । वीरेशाष्टचतुष्कषष्टिनवकं वीरावलीपञ्चकं, श्रीमन्मालिनिमंत्रराजसहितं वन्दे गुरोर्मण्डलम् ॥५२॥
श्रीगुरुदेव, परमगुरुदेव आणि परात्परगुरुदेवस्वरूप श्रीनाथादि तीन गुरुदेवांना, जगाला कारणभूत असलेल्या गणपतीला, उडीयान जालंधर आणि मूलाधारपीठ या तीन आधारमंचकांना, आत्मस्वरूप भैरवाला, सिद्धांच्या समुदायाला, वामदेव, सनत्कुमार आणि शुकदेव या तीन बटूंना, पूर्णपद आणि सिद्धपद या दोन पदांना, शिवदूती, चामुण्डा व काली या तीन दुति म्हणजे सेविकांना, शांभवी दीक्षा देणाऱ्या शंभुस्वरूप असलेल्या, जाती, लज्जा, कुल, अभिमान, देहाहंकार, आधीव्याधी, ज्ञानमय, पापपुण्यादि आठ विकारपाशांनी बद्ध जीवाला, वीरेश स्वरूप असलेल्या, चौसष्ट प्रकारच्या मंत्रांना रचणाऱया नवमातृकास्वरूप, ब्रह्मा, विष्णु, महेश, शिव व शिवस्वरूप पाच वीरांच्या रांगेला, सर्व मलांची शुद्धी करून सर्व जिवांना स्वयंप्रकाश बनविणाऱ्या श्रीमालिनीस्वरूप, गुरू अशा दोन अक्षरांनी युक्त श्रीगुरुस्वरूपी मंत्रराजाला, जो माझा अंतरात्मा आहे, तत्त्वपदाचा जो लक्ष्य साध्य आहे, ज्याने कुंडलिनी शांभवी दीक्षाद्वारा आपल्या शरणागत साधकांच्या अंतरी प्रवेश केलेला आहे अशा श्रीगुरुदेवांच्या मंडलाला मी नमस्कार करतो.
-`स्टार वृत्त’ ०७०५२०२५