माझा बाप तो माझा बाप!

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।

गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी श्रीहरिगुरुग्रामला परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी नित्यनूतन पितृवचन करताना श्रद्धावानांशी सुसंवाद साधला! त्यावेळी श्रीसाईनाथांवर भोळ्याभाबड्या भावाने श्रद्धा ठेवून त्यांची भक्ती करणाऱ्या एका भक्ताची खरीखुरी कथा सांगितली! त्या कथेच्या शेवटी बापूंनी “ॐ माझा बाप तो माझा बाप” हा जप उपस्थित श्रद्धावानांकडून करून घेतला; त्याबद्दल त्रिवार अंबज्ञ!

माझा परमात्मा, माझा स्वयंभगवान त्रिविक्रम, माझा सद्गुरु माझ्यावर खरेखुरे प्रेम करतो. हाच माझा बाप! आईची आभाळमाया आणि बापाचं प्रेम याचे एकत्रीकरण म्हणजेच सद्गुरूंची आपल्या श्रध्दावान भक्तांवर असलेली कृपादृष्टी! आपल्या लेकरांवर कोणतेही संकट येवो, आपली लेकरं कुठल्याही अडचणीत असो; त्या संकटातून – त्या अडचणीमधून सहीसलामत बाहेर काढण्याची किमया हाच बाप करतो! स्वयंभगवान त्रिविक्रम अर्थात सद्गुरुतत्व त्याच्यावर प्रेम करणाऱ्यावर – त्याला बाप मानणाऱ्या श्रद्धावानावर कृपा करतो. एक मानवी बाप आपल्या मुलाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी अपार कष्ट घेतो; तर स्वयंभगवान त्रिविक्रम, सद्गुरु आपल्या भक्तांसाठी किती श्रमत असेल? आपल्या भक्तांवर किती प्रेम करीत असेल? याचा विचार करायला हवा!

एका लहान बाळाला कोब्रा जातीच्या नागाने चावा घेतला! हे समजताच त्याचा मानवी बापाने आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता त्या कोब्रा नागाला आपटून आपटून मारले. त्याचा व्हिडिओ आपण युट्युबवर पाहू शकतो! (खाली लिंक दिलेली आहे.) (https://youtu.be/6rZqhNHQS-I?si=w-EO7AW87Em1pbJc) एक मानवी बाप आपल्या मुलाला त्रास देणाऱ्या नागाला आपटून आपटून मारतो; तसा सद्गुरु भक्तांच्या संकटरुपी, दुःखरुपी, अपघातरुपी नागाला आपटून आपटून मारत असतो! कारण तो आम्हा श्रद्धावानांवर बापाचं प्रेम करीत असतो! त्याबदल्यात त्याची आमच्याकडून कशाचीही अपेक्षा नसते! फक्त आणि फक्त आम्ही त्याला `बाप’ म्हणायला पाहिजे! आमचा सद्गुरु आमचा बाप आहे; त्याच्याशिवाय मला तारणारा कोणीच असू शकत नाही. तोच आम्हाला प्रत्येक क्षणी सांभाळतो आणि सांभाळत राहणार! तोच आम्हाला संकटात मार्ग दाखविणारा असतो. तोच आम्हाला जीवनामध्ये आनंद देणारा असतो आणि तोच आम्हाला जन्मोजन्मी आपल्याबरोबर ठेवणार असतो; हे लक्षात ठेवले पाहिजे!

मी कसाही असेल, मी चुकत असेल, मी पापी असेल, मी अज्ञानी असेल, मी अडाणी असेल, पण तो मला कधीच टाकणार नाही! असं वचनही तो देतो. आम्हाला फक्त एकच करायचं असतं; त्याचा हात सोडायचा नसतो! माझा सद्गुरु – माझा देव श्रीस्वामीसमर्थ असो वा श्रीसाईनाथ; श्रीदत्तगुरु असो वा श्रीहनुमंत; आदिमाता असो वा विठू माऊली; तो एकच आहे! तो वेगवेगळ्या पवित्र रूपांमधून माझ्या जीवनात येतो; पण तो एकच आहे! असा सद्गुरू माझा खराखुरा बाप असतो! जो आपले सामर्थ्य लेकरांना देण्यासाठी उतावीळ झालेला असतो; कारण त्याला त्याची बाळ सामर्थ्यवान बनवायची असतात!

(क्रमशः)
-नरेंद्रसिंह हडकर

error: Content is protected !!