आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला

सद्गुरु अनिरुद्धांच्या अतीव प्रेमामुळे यावेळी वर्धमान व्रताधिराज व्रतकालात त्रिविक्रमाची अठरा वचने व्रतपुष्प म्हणून पठण करता आली. रोज वाढत्या क्रमाने वारंवार म्हणत गेल्यामुळे आपोआपच प्रत्येकाच्या मनात या वचनांचा ज्याला त्याला आवश्यक असा वेगवेगळा अर्थ उकलू लागला. मला उमगले असे वाटले ते लिहीत आहे. सुरुवात पहिल्या वचनापासून.

दत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर।
श्रद्धावानास देईन सदैव आधार॥

 

त्रिविक्रम अनिरुद्धांच्या सर्व सामर्थ्याचे मूल ‘दत्तगुरुकृपा’ आहे; इथूनच सुरुवात.

परमात्मा स्वतःच आपल्या वागण्यातून त्याच्या बाळांना शिकवित असतो. तो सर्वसमर्थ का ? तर दत्तगुरुकृपेने!
आम्हालाही हे बाणवायला हवे की आमच्याकडेही जे काही सामर्थ्य आहे त्याचे कारण ‘सद्गुरुकृपा’ आहे. ही जाणीव मनात घट्ट झाली की आम्हाला आयुष्यातल्या त्या त्या प्रसंगी आवश्यक असे बौद्धिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सर्व प्रकारचे सामर्थ्य आपोआपच प्राप्त होते.

कसलाही प्रसंग आला तरी आम्हाला सतत सद्गुरुंच्या कृपेचा भरवसा आणि आधार वाटायला हवा.

खूप मोठा बंगला आहे; ही कृपा नाही! खूप छान रुप आहे; ही कृपा नाही! अफाट पैसा मिळाला; ही कृपा नाही! प्रपंचातली एखादी गोष्ट खूप मिळणे म्हणजे कृपा नाही! तसे पाहिले तर देवाला न मानणाऱ्यालाही सगळे काही देणारा देवच असतो. खूप मिळणे; ही कृपा नाही. मिळालेले सगळे देवयान पंथावर राहून पचवता येणे ही ‘त्या’ची कृपा!

त्रिविक्रम अनिरुद्ध कृपा करताना काहीही पाहत नाही. जनाबाईवर कृपा करताना ती काय काम करते? हे पाहिले नाही, कुब्जेवर कृपा करताना तिचे व्यंग पाहिले नाही, चोखा मेळ्यावर कृपा करताना त्याची जात पाहिली नाही, सुदाम्यावर कृपा करताना त्याचे दारिद्र्य मधे आले नाही. जर हा कृपा करताना काही बघत नाही ; तर आम्हीही भक्ती करताना Topmost Priority ने याच्यावर प्रेमच करायला हवे.

आमच्या मनात भक्ती निर्माण झाली आहे ही सुध्दा त्याचीच कृपा आहे. देवर्षी नारदही भक्तीसूत्रांत हेच सांगतात.

मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा ॥ ३८ ॥

अर्थ : परंतु प्रामुख्याने (ती भक्ति) महान असे जे महात्मे पुरुष त्यांच्या कृपेनेच (प्राप्त होते) अथवा भगवंताच्या अंशमात्र कृपेनेही (प्राप्त होते).

आमची काही आध्यात्मिक प्रगती होते ती आम्ही फार पवित्र कर्मे करीत असतो; फार थोर भक्ती करतो म्हणून नाही. आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणून.

बायबलही हेच सांगते…
इफिसकरांस पत्र २:८
“कारण कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि तुमच्या हातून झालेले असे नाही, तर हे देवाचे दान आहे.”

आमच्या आयुष्यात ‘समाधान’ आहे हीच त्याची कृपा!
आमच्या आयुष्यात ‘भक्ती’ आहे हीच त्याची कृपा!
आमच्या आयुष्यात ‘तो’ आहे हीच त्याची कृपा!

त्रिविक्रम अनिरुद्ध कृपा करतात आणि या कृपेची जाणीव झालेल्या श्रध्दावानाला सदैव आधारही देतात. सदैव आधार म्हणजे सतत आधार , काहीही झाले तरी अखंड आधार! काहीही झाले तरी म्हणजे – मी हाक मारली नाही तरीही, मी बेशुद्ध असलो तरीही, अगदी मी मृत झालो तरीही! तिथेही हात पसरुन मला न्यायला ‘तो’च उभा असतो.

 पहिले वचन वाचता वाचता बापूंची कृपा पाहून मन भरुन आले. त्या आनंदाश्रूंच्या दोन थेंबाचेच हे शब्दरूप ! ‘त्या’च्याच चरणी अर्पण!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

(क्रमश:)

– डाॅ आनंदसिंह बर्वे
शिवाजीनगर केंद्र पुणे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक  वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *