त्रिविक्रम अनिरुद्धांचे नाम आम्हाला तारुन नेणारच! हाच कलीयुगात जन्माला येण्याचा फायदा!!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौदावा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

माझिया भक्तीपासून, कोण तुम्हांस रोखेल ?
कामक्रोध जरी असले भरून, माझे नाम माझिया भक्तास तारेल॥

त्रिविक्रमाची भक्ती करण्यापासून आम्हाला कोण अडवणार? ही भक्ती म्हणजे काय ?

भक्ती ही भाव हे हृदय असणारी, नित्य वाढत असणारी, अंतरंगी प्रेमशक्ती आणि सस्नेह सेवा आहे.- सत्यप्रवेश चरण ३६

परमेश्वराचे प्रेम मिळवण्याचा मार्ग म्हणजेच भक्ती. – सत्यप्रवेश प्रमाण ८

आमच्यामध्ये काम आणि क्रोध अगदी भरून असले, तरीही त्रिविक्रमाचे नाम आम्हां भक्तांना तारण्यास समर्थ आहे. काम आणि क्रोधाचे एवढे महत्व काय आहे? धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांत धर्मग्रंथांनी कामाला स्थान दिले आहे.

कारण काम हा देखील एक पुरुषार्थ आहे. पण कधी? तर तो धर्मानुसार असेल तेव्हाच. अनीतिपूर्ण काम पापांनाच उत्पन्न करतो. – सत्यप्रवेश चरण २०

ही मनात उत्पन्न झालेली इच्छा म्हणजेच ‘ काम ‘ होय. ज्याला ज्याला म्हणून मन आहे त्याला त्याला इच्छा ही आहेच. बेलगाम, बेजबाबदार ‘ काम ‘ हाच सर्व दुःखांचे मूळ कारण असतो. षड्रिपूंपैकी क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे पाचही रिपू कामाच्या बेलगामपणामुळेच उत्पन्न होतात. जीवन जगताना धर्माच्या क्षेत्रातच ( शेतातच ) काम पेरावा व भक्तीच्या गोफणीने त्याची राखण करावी. – सत्यप्रवेश

क्रोध हा सर्वात प्रभावी व क्षणात होत्याचे नव्हते करणारा भस्मासुरच. चुकीचे विचार, चुकीचा आहार, विहार व चुकीच्या अपेक्षा या सर्वांचे खतपाणी मिळून मनातील क्रोध बळकट होत जातो. क्रोधामुळे महाप्राणाचा मनावर असणारा ताबा क्षीण होतो. अर्थातच माझ्या मनावरील परमेश्वरी अंमल क्रोध सैल करतो.

परमेश्‍वराच्या नामरुपाची मोहिनी ज्या प्रमाणात माझ्या अंतरंगात प्रवेश करते, तिच्या एकेका पदन्यासाबरोबर माझ्यातील षडरिपू त्या त्या प्रमाणात नष्ट होतात व तेवढ्याच प्रमाणात परमेश्वराची षडैश्वर्ये माझ्या आयुष्यात प्रवेश करतात. – सत्यप्रवेश चरण ५३

क्रोध करण्याने, संताप करण्याने व चिडण्याने जेवढे स्वतःचे नुकसान होते त्याच्या एकदशांश सुद्धा ज्याच्यावर आपण चिडचिड करतो त्याचे होत नाही.

लाकडावर लाकूड घासले की अग्नी उत्पन्न होतो व हा अग्नी त्या लाकडांनाच जाळून भस्म करतो, त्याचप्रमाणे क्रोध माणसाला जाळत असतो. मनाची शुद्धता पश्चात्तापावर अवलंबून आहे, परंतु पश्चात्ताप होण्यासाठी प्रथम स्वतःस स्वतःची चूक कळणे आवश्यक आहे.

नामस्मरणाने चूक उमजून येते, ती सुधारण्याची उर्मी उत्पन्न होते आणि चूक सुधारण्याची ताकदही मिळते. आणि हे सर्व काही त्या नामाच्या प्रभावाने आपोआप होत असते, मला फक्त नामावर व नामीवर प्रेम करायचे असते. – मधुफलवाटिका २५५, २५६, २५७

त्रिविक्रमाची भक्ती करण्यापासून आम्हाला कोण अडवणार ? इतिहासातील कथा पहिल्या तर रावणासारखे असुर यज्ञांचा विध्वंस करायचे. मूर्तिभंजक आक्रमक देवळांचा आणि मूर्तींचा नाश करायचे. मग त्यांनी आम्हाला भक्तीपासून अडवले असे म्हणता येणार नाही का? नीट विचार केला तर हे बहिरंग भक्ती पासून अडवणे, अडथळा करणे आहे. अंतरंगी भक्तीपासून या शक्ती अडवू शकत नाहीत. आणि भक्ती ही तर आतली यात्रा आहे.

या वचनातला पहिला चरण आणि दुसरा चरण यांचा सकृतदर्शनी संबंध दिसून येत नाही. संस्कृत श्लोकांचा अर्थ लावताना एक ‘ देहलीदीपन्याय ‘ म्हणून पद्धत येते. देहली दीप म्हणजे उंबऱ्यावरचा दिवा. तो जसा उंबऱ्याच्या दोन्ही बाजूंना ( आत आणि बाहेर ) प्रकाश देतो; तद्वत दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द हा पहिल्या चरणाचा शेवटचा शब्दही मानला तर अर्थोपपत्ती सोपी होते. याठिकाणी दुसऱ्या चरणातील पहिला शब्द कामक्रोध हा आहे. तो पहिल्या चरणात शेवटचा शब्द म्हणून घ्यायचा. माझ्या भक्ती पासून तुम्हाला कोण रोखेल? तर कामक्रोध हा शब्द पुढे जोडायचा. म्हणजे काम क्रोध आम्हाला भक्तीपासून रोखतात. दुसऱ्या चरणाचा अर्थ तर स्पष्टच आहे. हे काम क्रोध राहतात आमच्या मनात, बिघडवतात निर्णयांना आणि वापरतात इंद्रियांना! परमपूज्य बापूंनी यांच्याविषयी सांगितलेल्या काही गोष्टी वर पाहिल्या आहेत.

मुळात मन अतिशय सूक्ष्म. त्यात राहणारे काम क्रोध तसेच सूक्ष्म. मग यांच्यापर्यंत पोहचायचे कसे ? जुन्या लाकडी पलंगाच्या फटींमध्ये ढेकुण होतात. अगदी बारीक असतात. आमच्याकडे जुने शस्त्र गदा किंवा आधुनिक शस्त्र बंदूक असली तरी उपयोग नाही, कारण त्या बारीक जागी पोहोचणे शक्य नसते. एक उपाय असतो तो पलंग पेटवून द्यायचा. पण तो व्यवहार्य नाही. कारण काम क्रोधांचा नाश करण्यासाठी हा देह नष्ट केला तर भक्ती कशाच्या साह्याने करणार? त्यामुळे यांच्या नाशासाठी नामासारखे सुक्ष्म साधन उपयोगी पडते. आणि तेच आम्हाला तारुन नेऊ शकते.

काम करता करता, जिथे शक्य आहे तिथे मनातल्या मनात नामस्मरण करा, शक्य असल्यास संतांची भजने, अभंग ऐकताना त्याबरोबर तल्लीन होऊन ती म्हणण्याचा प्रयत्न करा. ह्या यज्ञातील आहुती कोणती? ह्या यज्ञात आहुती आहे ती अभक्तीची, अश्रद्धेची आणि आळसाची. – सत्यप्रवेश चरण २४

कामक्रोधांमुळे आमच्या हातून चुकीच्या गोष्टी घडतात, पापे घडतात आणि आम्ही भवसागरात गटांगळ्या खाऊ लागतो. कामक्रोधांचे नियंत्रण आम्ही करण्याचा विचारही करायची गरज नाही, नामस्मरणाने ते कसे होईल याचाही विचार करायची गरज नाही. त्रिविक्रम अनिरुद्धांचे नाम आम्हाला तारुन नेणार एवढेच लक्षात ठेवायचे. हाच कलीयुगात जन्माला येण्याचा फायदा आहे.

कृतयुगीं जें प्राप्त ‘ध्यानें’ । त्रेतीं ‘यजनें’ द्वापारीं ‘अर्चनें’ । तें प्राप्त सर्व ‘नामसंकीर्तनें’ । गुरुभजनें कलियुगीं ॥श्रीसाईसच्चरित ३/२७॥

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तेरावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

You cannot copy content of this page