स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्र गजरानेच जीवनात अपरंपार सुख येते!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तेरावा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

शरणागत होऊनी करी जो गजर ।
त्याचिया जीवनी सुख अपरंपार ॥

यात सांगितलेला गजर म्हणजे स्वयंभगवान त्रिविक्रमाचा सार्वभौम मंत्रगजर.

रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरू समर्था
सद्गुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा

बापूंनी सांगितलेल्या या गजराच्या महतीची थोडी उजळणी करू.

● या सार्वभौम मंत्रगजराचा प्रथमार्ध म्हणजेच श्रध्दावानांनी त्रिविक्रमाची व त्रि-नाथांना केलेली प्रार्थना आणि ह्या सार्वभौम मंत्रगजराचा द्वितियार्ध म्हणजेच भगवान त्रिविक्रमाकडून श्रद्धावानांसाठी येणारा कृपेचा स्त्रोत अर्थात प्रसाद. हा महामंत्र सार्वभौम आहे. कारण हा एकमेवाद्वितीय असा परिपूर्ण मंत्र आहे. जेथून हा मंत्र सुरू होते तेथेच येऊन थांबतो, म्हणजेच वर्तुळ पूर्ण होते.

● स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर मानव सुखात असेल तेव्हाही, अडचणीत किंवा दुःखात असेल तेव्हाही आणि त्याचप्रमाणे सुख व दुःख दोन्ही नसतील अर्थात विशेष काही घडत नसेल तेव्हाही करू शकतो; म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत करू शकतो.

● जो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या १६ माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीत कमी ३ वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र ‘हनुमत्-चक्र’ बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.

● स्वयंभगवानाच्या जिवंत अस्तित्वाची व रसरशीत प्रेमाची जाणीव अखंडपणे मन व बुद्धीत राहणे, हे सामान्य मानवाला जमू शकत नाही. परंतु भक्तिभाव चैतन्याचा हा मंत्रगजर अतिशय प्रेमपूर्वक करीत राहिल्यास, थोडा जपही मोठा बनतो आणि खंडित आठवणही अखंड बनते.

इतका सामर्थ्यशाली हा गजर आहे मग शरणागत होऊन का करायचा ? शरणागत न होता गजर केला तरी तो प्रभाव दाखवणारच आहे. एक उदाहरण पाहू. बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे. अगदी कोणालाही चिंब भिजवेल एवढा. मी खिडकीतून फक्त हात बाहेर काढला तर हातच भिजेल. संपूर्ण भिजण्यासाठी मला बाहेर यायला हवे. पावसात उभे राहिला हवे. अगदी स्वतःला त्याच्या हवाली करायला हवे.

शरणागत होऊन केलेल्या गजराने असा परिणाम होतो. ‘त्या’च्या कृपेत चिंब भिजता येते.

‘शृ शीर्यते, नश्यते दुःखं अत्र इति शरणम्’ अशी शरण शब्दाची व्याख्या आहे. ह्याचा अर्थ जिथे दुःखाचा नाश केला जातो ते शरण…

सार्वभौम मंत्रगजरासारखा सामर्थ्यशाली जप; तोही शरणागत होऊन केलेला….
दुःखांचा नाश होणारच!

स्वयंभगवानांना शरण जाऊन हा मंत्र गजर केल्यावर जीवनात अपरंपार म्हणजे भरपूर, मोजता न येण्याएवढे सुख मिळते. आमच्या सुखाच्या कल्पना व्यावहारिक जगात प्रपंच करताना, वेगवेगळ्या गोष्टींशी निगडीत असतात. त्या सगळ्याची प्राप्ती नक्कीच होईल.

या अपरंपार सुखाच्या एका वेगळ्याच अर्थाचा बापूकृपेने आपण आनंद घेऊन पाहू.

‘अपरम्’ म्हणजे यापुढे, आणखीन… आम्हाला सुखी होण्यासाठी बापूंकडून वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. त्यातल्या उचित असतील त्या बापू देतातच. पण आणखीन काहीतरी, आणखीन काहीतरी हे चालूच असते. अपरंपार म्हणजे या ‘आणखी काहीतरी’ च्या पलीकडे गेलेले! जे मिळाले असता त्यापुढे ‘आणखीन काही’ नाहीच ; असे पराकोटीचे सुख!!

सुख हा शब्द पाहिला तर सु + ख. सु म्हणजे चांगले, सुंदर ; आणि ख म्हणजे आकाश. पराकोटीचे सुंदर आकाश म्हणजे अपरंपार सुख….

आता हे आकाश कोणते ? तर आमचे हृदयाकाश. प्रायः या हृदयाकाशात निरनिराळ्या वासना, इच्छा भरून ठेवल्यामुळे यात असणाऱ्या परमात्म्याकडे लक्ष जात नाही, त्याची जाणीव होत नाही. हेच खरे तर दुःखाचे मूळ कारण असते.

या हृदयाकाशात जेव्हा परमात्मा विराजमान असतो, तेव्हाच आणि फक्त तेव्हाच ते पराकोटीचे सुंदर असते. लंकिनीसारखी निशाचरही हे सत्य जाणते आणि हनुमंतांना सांगते,

प्रबिसी नगर कीजै सब काजा
हृदय राखी कोसलपुर राजा

अनिरुद्ध मानसपूजेत अखेरीस डॉक्टर योगीन्द्रसिंह हेच पसायदान मागतात,

हृदयी माझ्या असाच राही आलो तुज शरण
देवा आलो तुज शरण
पूजावे अनन्यभावे मी तुझे चरण
बापू मी तुझे चरण
हीच आहे ओवी माझी पसायदानाची ॥२४॥

शास्त्रांमध्ये ह्या हृदयाकाशाला ‘दहराकाश’ असे म्हटले आहे.

छांदोग्य उपनिषदात पुढील वर्णन येते, छांदोग्य उपनिषद ८.१.१ येथे म्हटले आहे

’अथ यदिदमस्मिन् ब्रह्म, पुरे दहरं पुण्डरीकं वेश्म दहरोऽस्मिम् अनन्तराकाशस्तस्मिन् यदन्तस्तदन्वेष्टव्यं तद् वाव विजिज्ञासितव्यम्’

या ब्रह्माचे नगररूप मनुष्यशरीरात कमलाच्या आकाराचे एक घर (हृदय) आहे, त्यात सूक्ष्म आकाश आहे, त्याच्या आत जी वस्तू आहे ती जाणण्याची इच्छा केली पाहिजे.

गणेश सहस्त्रनामात श्रीगणेशाचे एक नाव हृत्पद्यकर्णिकाशालिवियत्‌केलिसरोवर असे आहे त्याचा अर्थ

ह्रदयकमलपुष्पाने सुशोभित दहराकाश हेच ज्याचे क्रीडासरोवर आहे असा किंवा ह्रदयातील कर्णिकांनी शोभणारा आणि आकाश हेच ज्याचे क्रीडा सरोवर आहे असा.

ललिता सहस्त्रनामात आदिमातेचे दहराकाशरूपिणी असे नाव आहे.

देवेशी दण्डनीतिस्था दहराकाश रुपिणी।

सच्चिदानंद उत्सव पूजनात आपण जी १०८ नावे घेतो , त्यात ६५ वे नाव दहराकाशमध्यगाय नमः असे आहे.

विकारवासनांनी भरलेल्या ह्रदयाची; हृदयस्थ नारायणाची जाणीव विस्मृतीत जाते. हेच दुःखाचे मुख्य कारण. दुःख म्हणजे दुः + ख = वाईट ( झालेले ) ह्रदयाकाश. सार्वभौम गजर ही जाणीव अखंडपणे मनात आणि बुद्धीत जागृत करतो.

सद्गुरूंना अनन्यभावे शरण जाऊन मंत्र गजर करणाऱ्या भक्ताला हे अपरंपार सुख अर्थात पराकोटीचे सुंदर हृदयाकाश प्राप्त होते. त्याच्या जीवनात परमात्मा कार्यकारी होतो.

अशा भक्ताची ‘ सुखी ‘ अवस्था साधनाताईंनी अचूक सांगितली आहे

” कितीवेळ पाहियले देवाचे ते अरूप
माझा देव अनिरुद्ध चिदानंद भोगवित
साधी नहाली निवाली देवा तुझ्या चैतन्यात “

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक बारावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

You cannot copy content of this page