जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सनी माझी घरच्या सारखी काळजी घेतली!

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सनी घेतलेली घरच्यांसारखी काळजी, वेळेवर मिळालेला योग्य औषधोपचार यामुळेच आज मी कोरोनामुक्त झाल्याची भावना व्यक्त केली, अशी प्रतिकिया ५८ वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाने दिली.

पोलीस दलातील निवृत्त झालेले घोटगे येथील 58 वर्षीय रुग्ण, इतर कोणत्याही व्याधी नाहीत. पण, कोरोनाने गाठलं. कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण ऑक्सिजन पातळी 80 पर्यंत खाली आली आणि त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. एचआरसीटी स्कोअर 20 होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. योग्य व वेळेवर उपचार झाल्यामुळे ते आज कोरोना मुक्त झाले आहेत.

रुग्णालयात दाखल असतानाचा आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, ऑक्सिजनची पातळी खाली आली होती, एचआरसीटी स्कोअरही 20 इतका होता. त्यामुळे कोरोनातून बरा होतो का नाही ही काळजी लागली होती. 7 दिवस आयसीयूमध्ये काढले. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स यांनी अगदी घरच्या सारखी माझी काळजी घेतली. दोन वेळा डॉक्टर येऊन स्वतः तपासत होते. दिवसातून दोन वेळा काढा दिला जात होता. वेळेवर आणि चांगले जेवण दिले जात होते. डॉक्टर्स आणि नर्सने केलेल्या उपचारांमुळेच आज मी कोरोना मुक्त झालो आहे.