पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२१

बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २६
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष त्रयोदशी सकाळी ९ वाजून ५० मिनिटापर्यंत
नक्षत्र- अश्विनी रात्री २२ वाजून ४२ मिनिटापर्यंत
योग- व्यतिपात १८ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून १४ मिनिटापर्यंत

करण १- तैतिल सकाळी ०९ वाजून ५० मिनिटांपर्यंत
करण २- गरज रात्री २२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४९ मिनिटांनी
सूर्यास्त- संध्याकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १६ वाजून ४७ मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ०४ वाजून ५७ मिनिटांनी

भरती- सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून २६ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ४ वाजून ४९ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ५५ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपासून सायंकाळी १३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत

——————

दिनविशेष:- श्रीगोरक्ष नाथ प्रकटदिन
गोरक्षनाथ ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांचे मंदीर गोरखपूर उत्तरप्रदेशामध्ये आहे. गोरक्षनाथांचे नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पद चिन्ह आहे. येथे वैशाख पौर्णिमेस उत्सव होतो.

मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असताना एका घरी भिक्षा मागण्यास गेले. त्या स्त्रीस संतती नव्हती. दारी आलेल्या तेज:पूंज साधूला भिक्षा वाढताना त्या स्त्रीने पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली. मच्छिंद्रनाथांननी त्या स्त्रीला चिमूटभर भस्म देऊन पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला. सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली, शेजारीण हसू लागल्याने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा घडलेली हकीगत त्या स्त्रीने सांगितली. सर्व हकिकत स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन `चलो गोरक्ष’ म्हणून हाक मारली. त्या शेणातून मुलगा प्रगटला व म्हणाला ‘आदेश’ मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले. तेच गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतातच नाही तर अरब जगतावरही आहे.

गोरक्षनाथांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपला धर्मविचार लोकभाषांतून सांगितला. संस्कृत, प्राकृत वा अपभ्रंश मिश्र हिंदी अशा भाषांतून त्यांचे अनेक ग्रंथ मिळतात.

योगधारणा, पिंडब्रह्मांडविचार, कुंडलिनीजागृती, गुरुचे महत्व, देशकालातीत व जातिभेदातीत तत्वज्ञान, लोकभाषांचा उपयोग; हे गोरक्षनाथांच्या पंथांचे मुख्य विशेष होत. नाथपंथात स्त्रीशूद्रांच्या उद्धाराची तळमळही प्रामुख्याने दिसते. गोरखनाथांच्या प्रेरणेमधूनच भाषेचा उपयोग अखिल भारताच्या संदर्भात होत राहिला. गोरखनाथांच्या पंथात वर्णाश्रमधर्माला स्थान नसल्यामुळे वर्णभ्रष्टांना या संप्रदायाचा मोठाच आधार वाटला.

जागतिक स्मृती दिन- जागतिक स्मृती दिन रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी नोव्हेंबर १७ मानला जातो.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन:-
१७ नोव्हेंबर १९३९ रोजी जान ओपले ताल या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या आणि झेकोस्लो व्हॅकिया वर नाझींनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारणाऱ्या विद्यार्थ्यांची निदर्शने निर्दयपणे चिरडून टाकत नाझी सैन्याने नऊ जणांना विना चौकशी देहदंड ठोठावला आणि १२०० जणांची तुरुंगात रवानगी केली. त्या हुतात्म्यांची आठवण म्हणून हा दिवस जगभर पाळला जातो.

ग्रीसमधील अथेन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी १९७३ साली तिथल्या लष्करी राजवटीविरोधात पुकारलेले बंड, १९८९च्या सुवर्णमहोत्सवी वर्षी सोशालिस्ट युनियन ऑफ यूथ या संघटनेतर्फे कम्युनिस्ट झेक सरकारविरुद्ध छेडलेले आंदोलन ह्या विद्यार्थी दिनाच्या ठळक घटना होत.
झेकमधील स्वराज्य आणि प्रजासत्ताकाच्या हक्कांसाठीची गाजलेली वेल्वेट क्रांती याच दिवशी झाली होती.
बलिर्नशी भिंत कोसळल्यानंतर देखील इंटरनॅशनल युनियन ऑफ स्टुडंटतर्फे ह्या दिवशी जल्लोश झाला होता.
२००४ च्या नोव्हेंबरला मुंबईत भरलेल्या र्वल्ड सोशल फोरमच्या परिषदेत पुन्हा एकदा जगभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हक्कांचा उद्घोष केला होता.

देशाच्या धामिर्क, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत बदल घडवून आणण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये असते.

राष्ट्रीय अपस्मार दिन:-
फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणे यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१८६९साली भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

१९२८ साली स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन झाले.
ते भारतीय राजकारणी, लेखक व जहाल मतवादी नेते होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली. लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.

१९३८ साली मराठी लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचा जन्म झाला.

मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना करणारे आणि ज्वलंत हिंदुत्वाचा विचार देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन! २०१२ साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आणि भगव्या झेंड्यांलाही अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या अंत्ययात्रेला अभूतपूर्व गर्दीचा विक्रम करीत लाखो लाखो लोकांनी उपस्थिती दाखवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

२०१५ साली विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन झाले. विहिंपच्या जागतिक कीर्तीमध्ये अशोक सिंघल यांचे योगदान सर्वात जास्त आहे. त्यांच्या काळातच परिषदेच्या कार्यात धर्म जागरण, सेवा, संस्कृत , चिंतन, गोरक्षण इत्यादी अनेक नवे आयाम जोडले गेले . यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे श्री रामजन्मभूमी मंदिर चळवळ , ज्यामुळे परिषदेचे कार्य गावोगावी पोहोचले. त्यातून देशाची सामाजिक आणि राजकीय दिशा बदलली.