…शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल!

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ स्थापन करून आणि गडकिल्ल्यांची जोपासना करून

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त अर्थात सरदार! कालच शिवरायांचा हा मावळा-सरदार शिवरायांना भेटावयास गेला. संपूर्ण आयुष्य शिवमय होऊन जगण्याचा आदर्श त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले; त्या स्वराज्याच्या प्रसारासाठी-प्रचारासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, ते शिवशाहीर पद्मविभूषण-महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपला देह सोडला.

बाबासाहेब पुरंदरे खऱ्या अर्थाने शिवजीवन जगले आणि शिवजीवनाचा मतितार्थ जगात पोहोचविला. छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी त्यांनी गायली आणि पोहचविली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, कर्तृत्व, योगदान; हे सर्व काही सांगण्यासाठीच शिवरायांच्या ह्या सरदाराचा जन्म झाला होता, असं म्हणावं लागेल. ह्या शिवभक्ताला सुद्धा राजकारणाची झळ पोहोचली होती. एकाने मांडलेला इतिहास हा दुसऱ्याला तंतोतंत पटेल असं होत नाही. कारण इतिहासाचे बारकावे शोधताना संशोधकाला मिळालेली माहिती, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा अभ्यासूपणा, त्याची जिज्ञासा अशा कितीतरी गोष्टी परिणामकारक ठरत असतात. भगवंताची दिव्य दृष्टी मानवाला मिळणे शक्य नाही म्हणूनच मानवाने लिहिलेला इतिहास अपूर्ण राहू शकतो. त्यात काही अंशी त्रुटी राहू शकतात. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर सुद्धा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काही तथाकथित नेत्यांनी टीकेचे फुसके बाण सोडले होते. त्यांना अदखल करून पुरंदरे यांनी आपला मोठेपणा सिद्ध केला होता. महाराष्ट्र शासनाने त्यांचा अंत्यसंस्कार शाहीइतमामात करून केलेला मानाचा मुजरा योग्य होता. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन महाराष्ट्राची आदरांजली बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जो इतिहास संशोधित केला, तो इतिहास त्यांनी लोकांसमोर मांडला. नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांना शब्दातून-नाटकातून जिवंत करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते आणि ते त्यांनी सात-आठ दशके जोपासले. त्यासाठी ते संपूर्ण देश फिरले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि विचार देशाचे कल्याण करू शकतो. हा विचार कृतीत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती आवश्यक ठरते आणि ती बाबासाहेबांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार येणाऱ्या हजारो वर्षांपर्यंत चिरकाल टिकून राहणार आहेत आणि अशा विचारांना प्राधान्य देऊन इतरांना तो विचार देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालण्याची महानता बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे होती आणि ती उभ्या देशाने पाहिली. हा त्यांचा मोठेपणा होता, ही त्यांची विद्वत्ता होती, हा त्यांचा प्रामाणिकपणा होता, ही त्यांची कार्यक्षमता होती. हा आदर्श खूप मोठा आहे. देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या कार्याला शिवरायांचा महाराष्ट्र सलाम करतो. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे ह्या महाराष्ट्राला शक्य नाही.

एका खेडेगावातून आलेला एक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची किमया सांगण्यासाठी स्वतःला वाहून घेतो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्य करीत राहतो. असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ग्रंथांमधून, आपल्या कलाकृतीमधून, वक्तृत्वातून, वागण्यातून, आपल्या विचारातून, आपल्या कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या समोर ठेवले. त्यासाठी आयुष्यातील ८० वर्षे खर्ची घातली; हे खूप मोठं कार्य आहे. एक सामान्य मनुष्य जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास करायला लागतो; तेव्हा तो सुद्धा असामान्य ठरतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य बाबासाहेब पुरंदरे यांना मिळाले होते. त्यातून जे काही उभे राहिले ते खरोखरच महान होते- महान आहे; आणि ह्याचे सर्व श्रेय बाबासाहेब पुरंदरे यांना द्यायला हवे. ह्या त्यांच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र शासनाने जेव्हा त्यांना पुरस्कार दिला तेव्हा सुद्धा काही तथाकथित नेत्यांनी विरोध दर्शविला; परंतु त्या विरोधाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. हा त्यांचा मोठेपणा होता. पण आज त्या विरोधकांना सुद्धा बाबासाहेब पुरंदरे यांची थोरवी मान्य करावीच लागेल. खऱ्याखुर्‍या प्रामाणिक विचारांचा मनुष्य आपल्या विचारांवर व कार्यावर ठामपणे उभा राहतो, तेव्हा तो यशस्वी होतो.

महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ खूप मोठे काम करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विचार, जनतेबद्दल असलेले प्रेम, प्रशासनाची रचना; ह्या यासंदर्भात राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांना माहिती मिळावी ह्यासाठी ठोस कृती करून कार्य करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शुद्ध इतिहास समोर आणण्यासाठी अजूनही संशोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ उभे राहू शकते. त्याविद्यापीठातून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा परिपूर्ण अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना सहजपणे मिळू शकते. देशाला दिशा दाखविण्यासाठी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन धोरण ठरवता येईल म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन, संपूर्ण आदर्श कार्य, संपूर्ण विचार ह्याचा प्रसार करता येऊ शकतो.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इतिहास सांगणारे अनेक किल्ले आहेत. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले सुद्धा किल्ले आहेत. त्यांची जोपासना करण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले पुरातत्व खाते नेहमीच दुर्लक्ष करीत असते. दिल्लीमधील असलेल्या सरकारी बाबूंना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नसतं-कौतुक नसतं. केंद्र सरकारने सुद्धा या संदर्भात ठोस निर्णय घेऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभ्यास विद्यापीठाच्या माध्यमातून करता येईल आणि महाराष्ट्रातील किल्ले जोपासल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहील. त्यासाठी पुरातत्व खात्याने क्रियाशील होणे अत्यंत गरजेचे आहे. अशाप्रकारे कार्य केल्यास बाबासाहेब पुरंदरे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली जाईल; असे आमचे म्हणणे आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा!

-मोहन सावंत
सहसंपादक-पाक्षिक ‘स्टार वृत्त’