पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विलीन!

पुणे:- महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, इतिहास संशोधक, ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक, शिवभक्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला होता.

“आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं दिली.
७० वर्षे त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले.
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन २०१५ मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला होता.
इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले.
त्याशिवाय ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया…