कोविआच्या माध्यमातून रामशेठ ठाकुर यांच्याकडून करुळच्या शाळेला पाच लाख
कणकवली:- रायगड जिल्ह्यातील लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकुर यांनी करुळ येथील नाथ पै ज्ञान प्रबोधनी विद्यालयाला रुपये पाच लाखाची देणगी दिली आहे; अशी माहिती कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी पत्रकातून दिली आहे.
करुळ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या गावातील नाथ पै ज्ञान प्रबोधिनी विद्यालय चालविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे आपल्याला सांगितले होते. त्यानुसार माजी खासदार, साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकुर यांना माहिती दिली. या विद्यालयाची आर्थिक अडचण लक्षात घेऊन श्री ठाकूर यांनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून ही देणगी दिली.
श्री. केळुसकर हे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. यापूर्वी त्यांनी या विद्यालयाला रुपये एक लाख, तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.