रेशनच्या दुकानावर धान्य उपलब्ध करून देण्याची आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची मागणी!
मुंबई:- (मोहन सावंत यांजकडून) `वर्सोवा मतदार संघातील रेशनच्या दुकानावर रेशन मिळत नसून त्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात!’ अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीमध्ये गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून पुरेसे धान्य वाटप होणे गरजेचे आहे. माझ्या वर्सोवा मतदारसंघात गोर गरीब लोकांच्या रेशन मध्ये काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मी आपल्याला दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीच्या पत्रान्वये कळवले होते; परंतु दुर्दैवाने अजूनही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही, उलटपक्षी वरचेवर परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. अनेक रेशन दुकानदार तर दुकानच उघडत नाहीयेत; तर काही उर्मटपणे बोलून लोकांना, काय करायचे ते करून घ्या, अजून शासनाकडून रेशनच आलेले नाही; तर आम्ही काय करणार? असे सांगत आहेत.
त्या पुढे म्हणतात की, गोरगरिबांसाठी रेशन उपलब्ध करून देणाऱ्या दुकानदारांशी संपर्क केला असता सध्या प्राधान्य कुटुंबाच्या रेशनकार्डवर (PHH) प्रतिमाणसी २ किलो ( ३ रुपये प्रति किलोप्रमाणे) तांदूळ आणि प्रतिमाणसी गहू ३ किलो ( २ रुपये किलो प्रमाणे) देण्यासंदर्भात आदेश आले आहेत. परंतु पुरेसे रेशन उपलब्ध नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तसेच ज्यांनी एप्रिल महिन्यामध्ये नियमित रेशन घेतलेले आहे, फक्त अशा व्यक्तीनाच 5 किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे; परंतु अजून धान्यच उपलब्ध झालेले नाही.
याचा अर्थ असा की PHH कार्डधारक कुटुंबातील प्रतिव्यक्तीला तांदूळ दोन किलो आणि गहू तीन किलो मिळणार आणि पाच किलो मोफत तांदूळही याच PHH कार्डधारकांना मिळणार म्हणजे एकाच घरात प्रति व्यक्ती दहा किलो धान्य मिळणार आहे. उर्वरित NPH केशरी कार्ड धारकांना कुठलंही धान्य देण्यासंदर्भात शासन निर्णय झालेला नसल्यामुळे फक्त PHH कार्डधारकांनाच धान्य देण्यात येत आहे.
रेशन कार्यालयाशी संपर्क साधला असता दिनांक १० एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार मे आणि जून मध्ये, NPH कार्डधारकांना ३ किलो गहू (८ रुपये प्रति किलो) आणि २ किलो तांदूळ (१२ रुपये प्रति किलो) दराने देण्यात येणार आहे. आपण जर सरसकट PHH आणि NPH कार्डधारकांना प्रति व्यक्ती १० किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असता तर NPH केशरी रेशन कार्ड धारकांवर एवढी वाईट वेळ आली नसती. आज त्यांच्याजवळ रेशन नाही आणि शासनाने NPH कार्डधारकांना धान्य थेट मे आणि जूनमध्ये मिळेल असा निर्णय घेतल्याने तोपर्यंत या लोकांनी खायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केशरी रेशन कार्ड धारकांचे (NPH ) हे हाल तर ज्यांचे रेशन कार्डच नाही त्यांचे काय हाल होत असतील! हीच स्थिति कमी अधिक प्रमाणात संपूर्ण मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला अन्नधान्य मिळणे गरजेचे आहे. माझी आपणाकडे मागणी आहे की या संदर्भात आपण स्वतः जातीने लक्ष घालावे व अशा भ्रष्टाचारी दुकानदार – दलाल आणि अधिकारी यांची साखळी मोडून काढावी. चुकीचे शासन निर्णय रद्द करावेत आणि NPH कार्डधारकांना मे पर्यंत वाट बघायला न लावता त्यांनाही त्वरित एप्रिल मध्येच अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे, तसेच रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही जातीने लक्ष घालून अन्नधान्य पोचवण्याची व्यवस्था करावी! अशी मागणीही आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केली आहे.