स्व. मोहनराव मुरारीराव सावंत साहेब यांची आज ८६ वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
कणकवली:- स्व. मोहनराव मुरारीराव सावंत साहेब यांची आज ८६ वी जयंतीनिमित्त पुनाळ वकल समाज उन्नती मंडळ भिरवंडे मार्फत आज सकाळी पूर्वज हॉल पुनाळवाडी भिरवंडे येथे साहेबांच्या प्रतिमेस साहेबांचे निस्सीम चाहते श्री. मधुकर सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
स्व. मोहनराव मुरारीराव सावंत साहेब हे भिरवंडे गावचे सुपुत्र. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक कार्य करताना वीस वर्षे अविरत समाजसेवा केली. कुर्ला मतदार संघात व परिसरात आजपर्यंतचे अढळ प्रतिभावंत म्हणून त्यांची प्रतिमा.
बी.ई.एस. टी. अध्यक्ष, कोकण विकास महामंडळाचे संचालक, भिरवंडे -सांगवे -नाटळ दशक्रोशीतील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सुधारणांचे प्रवर्तक, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय! `मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी’ची उभारणी करुन लाखो तरुणांपर्यंत शिक्षणगंगा त्यांनी पोहोचवली.
मोहनराव मुरारीराव सावंत आरोग्य केंद्र कनेडी सांगवेची स्थापना करुन गोरगरीबांना हक्काची आरोग्य सेवा त्यांनी उपलब्ध करुन दिली. `देवालय संचालक मंडळ भिरवंडे’चे अध्यक्ष पद स्विकारुन “न भूतो न भविष्यती” अशा स्वरूपाच्या श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.
`गाव ,देव ,भाव यांची आठवण यांची आठवण असू द्या!’ ह्या साहेबांनी दिलेल्या मूलमंत्राचे आपण सर्वांनी सदैव स्मरण करुन त्यानुसार सर्वांनी वाटचाल करूया व संघटीत राहून समाजउन्नतीचे ध्येय साध्य करुया! असे प्रतिपादन श्री. मधुकर सावंत यांनी स्व. मोहनराव मुरारीराव सावंत साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना केले.