मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री. सुरेंद्र तावडे यांचे कणकवलीत स्वागत
कणकवली:- कणकवलीतील सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सहा महिन्यापूर्वी नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी ते कणकवलीत निवासस्थानी आले असून त्यावेळी त्यांचा स्थानिकांकडून पुष्पगुच्छ आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कणकवलीत झालेल्या न्या. सुरेंद्र तावडे यांचे वडील कै. न्या. पंढरीनाथ तावडे हे देखील जिल्हा न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले होते. तर न्या. तावडे यांचे आजोबा जगन्नाथ तावडे हे शे. का. प पक्षाचे १० वर्षे आमदार व रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या लोकल बोर्डाचे पंधरा वर्षे अध्यक्ष होते. न्या. तावडे यांची चौथी पिढी वकिली क्षेत्रात कार्यरत आहे. तर सुरेंद्र तावडे यांचे भाऊ विजय तावडे हे कणकवलीतील प्रथितयश डॉक्टर म्हणून परिचित आहेत.
त्यांनी मुंबई येथे सोमय्या कॉलेजमध्ये व नंतर एलएलबीचे शिक्षण रुपारेल कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबई- माजगाव येथील न्यायालयात वकिली व्यवसायाची सुरुवात केली. १९९० मध्ये त्यांची पहिल्यांदा लातूर-निलंगा येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांनतर बढती मिळत मिळत त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.
