तपासणी करून चाकरमान्यांना गावी पाठवा! -मुख्यमंत्र्यांना कोकणवासियांची विनंती
चाळीत-झोपडपट्टीत राहणारे लाखो लोक विलगीकरण (Qurantine) कसे करणार?
मुंबई:- मुंबईत चाळीत-झोपडपट्टीत राहणारे लाखो लोक विलगीकरण (Qurantine) करू शकत नाहीत; त्यांची तपासणी करून त्यांना कोकणात त्यांच्या घरी पाठवा; असे आवाहन कोकणातील मुंबईस्थित चाकरमानी करीत असून तशी मागणी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात असलदे विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश डामरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
सदर पत्रात मुंबईत चाळीत-झोपडपट्टीत राहणाऱ्या कोकणातील लाखो चाकरमान्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात की, जगावर कोरोना विषाणूचे महासंकट आलेले असून आपण म्हटल्याप्रमाणे ह्या युद्धात आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली लढण्यास सज्ज झालेलो आहोत. प्रत्येक मनुष्य हा आपल्यासाठी महत्वाचा असून आपण आमची पुरेपुर काळजी घेत आहात. त्याबद्दल तुम्हाला मनःपुर्वक धन्यवाद आणि तुमच्या कार्याला सलाम! त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.
आमच्या कोकणातील लाखो श्रमजीवी लोक मुंबईच्या ऐंशी-शंभर चौरस फुटाच्या चाळीतील व झोपडपट्टीतील खोलीत कुटुंबियांसह राहतात. त्याचप्रमाणे त्यांना सार्वजनिक शौचालयात जावे लागते. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एकमेव प्रभावी ‘विलगीकरणाचा’ (Qurantine) मुख्य उपाय अमलात येत नाही. ह्याचा विचार गंभीरपणे होणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव जोरात होत असताना ज्यांना ह्या साथीची लक्षणे नाहीत त्यांना लगेच मुंबईतून कोकणात जाण्याची परवानगी द्यावी. परवानगी देताना…
१) कोकणात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शासकीय डॉक्टरकडून तपासणी करावी व तपासणी दाखला द्यावा. ज्यांना कोरोना विषाणू रोगाची लक्षणे असतील त्यांना शहर सोडण्याची परवानगी देऊ नये.
२) मुंबई, मुंबईउपनगर, विरार, डोंबिवली, कल्याण, पनवेल ह्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीची सोय करून ग्रुप बुकींग करून एसूटी किंवा खाजगी बस व इतर खाजगी वाहनातून कोकणात जाण्याची परवानगी द्यावी आणि तशी सूचना प्रवासी जाणाऱ्या जिल्हा-तालुका प्रशासनाला द्यावी.
जर मुंबईत राहणारे कोकणातील रहिवासी पुन्हा आपल्या गावी गेले तर त्यांच्याकडून योग्य प्रकारे (Qurantine) विलगीकरण होऊ शकेल. कोकणातील सर्वच घरे मोठी असतात. तसेच बहुतांशी घरे एकमेकांपासून दूर असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने नागरिकांचे विलगीकरण (Qurantine) होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील की नाही, ह्या संभ्रमात अनेकजण राहिल्याने त्यांना गावी जाणे शक्य झाले नाही.
मुंबई शहरातील चाळीत-झोपडपट्टीत हा आजार झाला तर खूपच गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणूनच मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना गावी जाण्यास चार दिवसांची मुदत द्यावी. कोकणातील प्रत्येक गावची मंडळे आपणास सहकार्य करतील! असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.