विनाकारण आरटीपीआर टेस्ट करण्यामागे गौडबंगाल काय? मुंबईकरांचा सवाल!
मुंबई (प्रतिनिधी):- कोरोना प्रतिबंधित लस घेतली नसल्यास न्यु लिंक रोड, मालाड पश्चिमेला असलेल्या `डी मार्ट’ मध्ये जाणाऱ्या ग्राहकांची सक्तीने आरटीपीआर टेस्ट केली जाते. अन्यथा `डी मार्ट’च्या मॉल मध्ये प्रवेश नाकारला जातो. सदर टेस्ट मुंबई महानगरपालिकेतर्फे खाजगी ठेकेदाराकडून केल्या जात असून ह्याचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न मुंबईवासियांचा आहे.
यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने पाठविलेले वृत्त असे की, न्यु लिंक रोड, मालाड पश्चिमेला असलेल्या `डी मार्ट’मध्ये जाण्यासाठी नेहमीच ग्राहकांची प्रचंड मोठी गर्दी असते. गेल्या एक-दोन महिन्यापासून मुंबई महानगरपालिकेने सदर `डी मार्ट’मध्ये ज्या ग्राहकांना जायचे आहे त्यांच्याकडे कोरोना प्रतिबंधित लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र मागितले जाते. अन्यथा आरटीपीआर टेस्ट केली जाते.
कोरोना प्रतिबंधित लसीचा तुटवडा असल्याने आजही लाखोजणांना लस मिळाली नाही. त्यामुळे सदर `डी मार्ट’मध्ये जाण्यासाठी आरटीपीआर टेस्ट केल्याशिवाय ग्राहकांना पर्याय नसतो. सदर आरटीपीआर टेस्ट मुंबई महानगरपालिकेतर्फे खाजगी ठेकेदाराकडून केली जात आहे, असे `डी मार्ट’च्या व्यवस्थापनाने म्हणणे आहे. इथे आरटीपीआर टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येतो. मात्र आरटीपीआर टेस्ट करताच ग्राहकांना आत सोडले जाते. मग त्या आरटीपीआर टेस्टचा उपयोग काय? दिवसाला हजारो आरटीपीआर टेस्टचा खर्च मुंबई महानगरपालिका का करते? ह्याचे नेमके गौड बंगाल काय? ह्याची त्वरित चौकशी व्हायला पाहिजे; अशी मागणी अनेक जागृत नागरिकांनी केली आहे.
लाखो आरटीपीआर टेस्ट किट्सच्या मुदत कालबाह्य (Expired Date) काही दिवसातच होणार आहेत. त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण आरटीपीआर टेस्ट करण्याचा घाट मुंबई महानगरपालिकेने घातला आहे का? असा सवाल मुंबईकरांचा आहे.