महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
नवी दिल्ली:- महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व अधिकारी-कर्मचारी योगासने करून प्रफुल्लित झाली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. अंथरलेल्या कार्पेटवर पहिल्या रांगेत निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव आभा शुक्ला, सहायक निवासी आयुक्त इशू संधू, विजय कायरकर, अजित सिंग नेगी तसेच महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह योगासने करण्यासाठी उपस्थित होते.
रोजच्या दिनचर्येत स्वस्थ राहण्यासाठी व्यायामाला विशेष महत्व आहे. बहुतेक लोक दररोज व्यायाम करीत असतात. मात्र, योग दिनानिमित्त सर्व अधिकारी-कर्मचारी एकत्रित योग करण्यासाठी सदनाच्या प्रांगणात एकत्रित झाले. मोराराजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे प्रशिक्षक आदर्श तोमर यांनी यावेळी योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक दाखविले.
योगाला प्रार्थनेन सुरूवात करून चलन क्रिया करायला लावली. यात मानेचे, खांद्याचे व्यायाम करून शरिराला योगासनासाठी सज्ज केले. यानंतर ताडासन, वृक्षासन, पडाहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वक्रासन, मकारासन, भुजंगासन, शलभासन, सेतुबंधासन, उत्तान पद्मासन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन करून शवासनाने योगसाधनांचा शेवट केला.
श्री.तोमर यांनी प्रत्येक योगासनाचे महत्व स्पष्ट करून यापासून मिळणाऱ्या लाभाबाबत सविस्तर माहिती दिली. कामकरी स्त्री-पुरूषांसाठी हे सर्व आसने अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगून कामामुळे येणाऱ्या तणावावर योगासनांमुळे बऱ्यापैकी नियंत्रण आणता येते, असेही श्री.तोमर यांनी सांगितले.
योगामध्ये आसनांसह प्राणायामालाही महत्व असल्याने आसने झाल्यावर प्राणायामाचे प्रशिक्षण दिले गेले. नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम करून शेवटी ध्यान लावायला सांगितले. यामुळे मन आणि शरीर अगदी हलके होत असून दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळत असल्याचा संदेशही श्री.तोमर यांनी दिला.
एकत्रित योगासने करते वेळी शेवट हा संकल्पाने होत असतो. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सर्वे भवन्तु सुखिन………… शान्ति: शान्ति: शान्ति: चा संकल्प घेऊन योग साधनेचा अभ्यास पूर्ण केला. (‘महान्यूज’)