स्टेमप्लस क्रायोप्रिझर्व्हेशनला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची साथ

बाळाच्या नाभीनाळेतील मूळ पेशी म्हणजेच स्टेम सेल्स जतन करून भविष्यात त्याचे वैद्यकीय सुरक्षाकवच तयार करण्याचे तंत्रज्ञान आता आपल्या ओळखीचे होऊ लागले आहे. आता हे तंत्रज्ञान बऱ्यापैकी सर्वज्ञात झाले असले तरी पाच ते सहा वर्षांपूर्वी हा विषय नवीन होता. त्यातून पुणे, मुंबईनंतर सांगलीसारख्या ठिकाणी यामध्ये अनिश्चितता होती. पण, ग्रामीण भागातील मातांनाआपल्या बाळाच्या सुरक्षित भवितव्यासाठी डॉ.मेघनाद जोशी यांनी सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ साली स्टेमप्लस क्रायोप्रिझर्व्हेशन ही संस्था स्थापन केली. पश्चिम महाराष्ट्रातील डीसीजीआय आणि एफडीए मान्यताप्राप्त स्टेमसेल जतन करणारी ही बँक आहे.

बाळाच्या जन्मानंतर लगेचच नाभीनाळेतील रक्त एका विशिष्ट प्रकारच्या बॅगेमध्ये घेतले जाते. स्टेम सेल वेगळे करण्याची प्रक्रियासंपूर्ण जंतुविरहित व विशिष्ट अशा क्लास १०००० प्रयोगशाळेत केली जाते. त्यानंतर पेशी उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानात जतन करून ठेवल्या जातात. या शक्तिशाली पेशींचा उपयोग आपण आपल्या तसेच परिवारातील इतर सदस्यांच्या आजारांवर मात करण्यासाठी करू शकतो, हे वैद्यक शास्त्रात सिद्ध झाले आहे. त्यामुळे डॉ.मेघनाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्टेमप्लस क्रायोप्रिझर्व्हेशन ही बँक सुरू आहे.

सुरुवातीला हे तंत्रज्ञान नवीन असल्याने येणाऱ्या ग्राहकांची संख्या जेमतेमच होती. त्यामुळे या बँकेमध्ये आवश्यक विविध साधनसामग्री म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे होते. ना नफा ना तोटा अशीच या बँकेची अवस्था होती. त्यामुळे बँकेमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे पगार करणेही बऱ्याचदा अवघड होऊन बसत होते. दोन वर्षे ही अवघड कसरत डॉ.जोशी यांनी पेलली.

दरम्यान २०१५ साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. त्यावेळी संस्थेने बँक ऑफ इंडियात संपर्क साधला. त्यातून त्यांना पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. याबाबत संस्थेचे संचालक शशिकांत देसाई म्हणाले, ग्रामीण भागातही सुविधा देण्यासाठी व बाळाच्या पेशी जतन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभा करण्यासाठी लाखो रुपये गुंतवणूक केली आहे. मात्र, सुरुवातीला ही संकल्पना नवीन असल्याने महिन्याकाठी आमच्या संस्थेकडे ३ ते ४ ग्राहक येत असत. त्यातून जमा खर्चाचा ताळमेळ बसायला कठीण जात होते. अशावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून पाच लाख रुपये कर्जाची (कॅश क्रेडिट) साथ मिळाली.एखाद्या वेळी ग्राहक कमी आले तरी या रकमेतून आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार व अन्य बँकेसाठी आवश्यक बाबी करू शकत होतो. या तंत्रज्ञानाबाबत जाणीवजागृती निर्माण करण्यासाठीही आम्ही प्रयत्न केले. त्यामुळे आता ग्राहकांची संख्याही महिन्याला २० पेक्षाअधिक होत असते. आमच्याकडे आज जवळपास २० कर्मचारी आहेत. आम्हाला मुद्रा योजनेची साथ मिळाल्याने बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या.

स्टेमप्लस क्रायोप्रिझर्व्हेशन संस्थेकडे सांगलीशिवाय सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, कर्नाटकातील विजापूर, चिकोडी येथूनही सॅम्पल्स येतात. त्यांची चेन्नई येथे एक फ्रॅन्चाईचीही आहे. पश्चिम महाराष्ट्रातील डीजीसीए आणि एफडीए मान्यताप्राप्त स्टेम सेल करणारी ही बँक आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या आठ प्रयोगशाळा (लॅब) आहेत. एकूणच प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे स्टेमप्लस संस्थेला मोठा आधार मिळाला.

– संप्रदा बीडकर (माहिती अधिकारी, सांगली) ‘महान्यूज’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *