संपादकीय- सिंधुदुर्गातील राणे बंधुंचा अपेक्षित विजय!
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आपल्या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात आपली छाप पाडली आहे. विशेषतः सिंधुदुर्गात कणकवली-देवगड आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांचा विजयी झाला; जो अपेक्षित होता!
लोकसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील तीनही विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले होते. त्याचप्रमाणे मतदारसंघातील प्रत्येक गावात सर्व प्रकारचे नियोजन करून राणे बंधू निश्चितच विरोधकांपेक्षा वरचढ ठरले. प्रत्येक गावातील संपर्क यंत्रणा, कार्यकर्त्यांची फौज आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबईतून आलेल्या कार्यकर्त्यांची फौज; ही राणे बंधूंची काम करण्याची पद्धत निवडणुकीत मताधिक्य वाढविण्यासाठी फलद्रुप झाली. त्यामानाने त्यांच्यासमोर उभे असणारे उमेदवार निश्चितच कमी पडले; हे मान्य करावेच लागेल!
नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक केली. सलग दहा वर्षे मतदारसंघात क्रियाशील राहिल्याने नितेश राणे यांचा विजय सहज सोपा होता; उलट ठाकरे सेनेचे संदेश पारकर हे सगळ्याच आघाडीवर कमकुवत ठरले. शिवसेना पक्षातून शिंदे सेना बाजूला गेली; नंतर मूळ शिवसेना शिंदे यांच्याकडे आली. त्यामुळे ठाकरे शिवसेना इतर ठिकाणांप्रमाणे कणकवली-देवगड मतदारसंघातही कमजोर झाली आहे. तरीही संदेश पारकर यांना मिळालेली ५० हजार ३६२ मते ही लक्षणीय आहेत. ही ठाकरे शिवसेनेची मते कधीही कमी होणार नाहीत; पण ती विजय मिळवून देऊ शकत नाहीत. ह्या मतांच्या पाठींबामुळे भविष्यात ठाकरे शिवसेनेला भरारी घेता येईल; त्यासाठी पक्षाला खूप मेहनत घ्यावी लागेल!
डॉ. निलेश राणे यांनी वैभव नाईक यांची हॅट्रिक रोखली आहे. दहा वर्षांपूर्वी नारायण राणे यांचा पराभव करून राणेंना आव्हान देणारे वैभव नाईक आपल्या मतदारसंघातून लोकसभेला विनायक राऊत यांना मताधिक्य देऊ शकले नाहीत. इथेच त्यांचा पराभव झाला होता. त्या दृष्टीने त्यांनी नियोजन करणे आवश्यक होते; ते नियोजन करण्यात नाईक अपयशी ठरले. उलट ह्या मतदारसंघात राजकीय नेते दत्ता सामंत यांनी केलेल्या मेहनतीला निलेश राणे यांच्या विजयाने फळ आले. ह्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. त्याचा निवडणुकीमध्ये परिणाम दिसला नाही. वैभव नाईक यांचा प्रभाव का पडला नाही? याचे आत्मचिंतन ठाकरे शिवसेनेला करावेच लागेल. हे आत्मचिंतन जिल्ह्यातील पराभवाबाबतही त्यांनी केल्यास त्यांना त्यांच्या अपयशाची कारणे समजतील.
निवडणुकीच्या तोंडावर डॉ. निलेश राणे यांनी शिंदे शिवसेनेत येणं फायदेशीर ठरलं; तर भाजपातून ठाकरे शिवसेनेत येणं राजन तेली यांना अपयश देऊन गेलं. भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष विशाल परब यांनी ३३ हजार २८१ मते घेऊन दीपक केसरकर यांचा विजय सुखकर केला. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत विशाल परब आणि देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप लोकांसमोर आली. तसेच विशाल परब यांच्यावर झालेले जमीन विक्रीचे आरोप दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. निवडणुकीच्या माध्यमातून अशा गोष्टी समोर येत असतात; ज्या गंभीर असतात. मात्र त्यावर निवडणुकीनंतर चर्चा होत नाही; हे दुर्दैव आहे.
एकेकाळी राजन तेली, जीजी उपरकर, गौरीशंकर खोत हे नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी काम करीत होते. त्यातून त्यांनीही राजकीय फायदा मिळविला; हे नाकारता येत नाही. हेच नेते राणे कुटुंबियांच्या विरोधात एकवटले तरी ते प्रभाव टाकू शकले नाहीत. कारण त्यांचे मुद्दे नाविन्यपूर्ण नव्हते. जिल्ह्यातील दहशतवाद, जिल्ह्यात झालेल्या हत्या; हे मुद्दे पुढे करून जिल्ह्यात आता राणेंच्या विरोधात निवडणुका जिंकता येणार नाहीत; हे राणे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे.
निवडणुकीच्या काळातच जनतेच्या समस्या मांडण्यापेक्षा सातत्याने जनतेला दिलासा देणाऱ्या प्रश्नांवर विरोधकांनी काम करायला पाहिजे. जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अमली पदार्थांचा आणि गोवा बनावटीच्या अनधिकृत दारू धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अशा प्रश्नांवर आक्रमक होऊन विरोधकांनी लढले पाहिजे.
महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेचे, शरद पवार राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नेतृत्व सर्वच आघाड्यांवर कमकुवत ठरत आहे! हे समजून घेतल्यानंतर राणे बंधूंचा विजय सहज सोपा का झाला? ते लक्षात येईल.