तरुणांचे प्रेरणास्थान : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

जागतिक स्तरावर एक उच्च दर्जाचे विद्यापीठ म्हणून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाचा उल्लेख होतो. कारण या विद्यापीठातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या जोरावर आपले अस्तित्व दाखवून दिले. या विद्यापीठाचा उल्लेख येण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे याच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रकांड पंडित, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे आणि त्याखाली लिहिले आहे की, SYMBOL OF KNOWLEDGE. हा सर्वात मोठा आणि अभिमानाचा क्षण भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व भारताचे स्वप्न ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणांच्या दृष्टिने महत्वाचा असेल.

ज्या काळात माणसांचा माणसांशी स्पर्श हा विटाळ होता. त्या काळात एका सर्वसामान्य पण उत्तुंग विचार असलेल्या सुभेदाराच्या पोटी जन्माला येऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व जगाला आपल्यासह आपल्या सर्व समाजबांधवांच्या दुःखाची दखल घ्यायला लावली. एवढेच नव्हे तर आपल्या चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर गावकुसाबाहेर जगणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे अत्त्युच कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आपल्या कोणत्याही अडचणींचा, संकटांचा बाऊ न करता ज्ञानाच्या जोरावर त्यांनी जगाला हेवा वाटेल एवढे कार्य केले. भारतात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात असे एकही क्षेत्र नसेल ज्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला नसेल. शिक्षण, कामगार, महिला, शेती, संरक्षण, नियोजन, अर्थ यासह सर्व विभागात कार्य करताना आजपर्यंतच्या पिढीला मार्गदर्शक तत्वे निर्माण केली. म्हणूनच आजच्या जबाबदारी टाळणाऱ्या आणि त्या सोडून वागणाऱ्या, समाजमनाचा भान हरवणाऱ्या तरुणाईला, आपला हेतू वा स्वप्ने विसरणाऱ्या तरुणाईला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्त्रोत ठरतात. आजच्या काळात जगणाऱ्या प्रत्येक तरुणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरील कोणताही प्रसंग घ्यावा, त्यातून विद्यार्थ्यांना कायम आणि सतत प्रेरणाच मिळेल.

एक काळ असा होता की, ज्यावेळी एक विद्यार्थी फळ्यावर असणारे गणिताचे उदाहरण सोडवण्यासाठी येत असताना, त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी त्याचा स्पर्श फळ्यामागे आपल्या जेवणाच्या डब्यांना होईल म्हणून त्याला बेदम मारले. तरीही त्या विद्यार्थ्यांने शिक्षण सोडले नाही. ज्या विद्यार्थ्यांला पिण्यासाठी पाणी मिळाले नाही, तरीही त्या विद्यार्थ्याने भविष्यात आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारतातील ओल्या आणि सुक्या दुष्काळावर उपाय म्हणून नद्याजोड प्रकल्प आणला. ज्यांनी परदेशात घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर बडोदा संस्थानात नोकरी मिळवली, मात्र तेथे देखील त्याचा स्पर्श नको म्हणून त्याच्या टेबलावर फाईली फेकून टाकण्याचे प्रकार घडत होते. तरीही त्यांनी मनात कसलाही द्वेष न ठेवता समानतेचा पुरस्कार केला. जी व्यक्ती आपल्या समाजाला न्याय मिळविण्यासाठी आपल्या समाजबांधवांनी देखील विधिमंडळात यावे, म्हणून राखीव जागांची मागणी करतात; मात्र हे असे घडल्यास कुठेतरी आपली चळवळ कमी होईल या भीतीने वा अन्य काही कारणाने प्राणांतिक उपोषण झाले. तरीही त्यांनी सर्वांसाठी न्यायव्यवस्था निर्माण केली. सतत अपमान आणि तीच – तीच अवेहलना वाट्याला येऊनही या महामानवाने कधीही आपल्या वैयक्तिक दाव्यासाठी वा फायद्यासाठी प्रयत्न केला नाही. इंग्रज सरकारने दिलेल्या सर्व सुखसोयी, दाखविलेली आमिषे झिडकारून समाजासाठी, देशासाठी सतत झुंजत राहीले. ज्यांनी भारतातील स्त्रियांना देखील समान हक्क मिळावे यासाठी आपल्या ज्ञानाची कसोटी लावली. तरीही प्रस्थापित समाजव्यवस्थेने त्यांना वा त्यांच्या नियोजनाला न्याय दिला नाही. तरीही हे महामानव कधीही डगमगले नाहीत. मानसिक गुलामगिरीत अडकलेल्या आणि प्रथा, परंपरा, चालीरितीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यात ते यशस्वीदेखील झाले. त्यामुळेच आज भारतात मोठ्या प्रमाणात समानता दिसून येते. त्याच महामानवाचे नाव म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच मानसिक गुलामगिरीचा चष्मा काढून त्यांच्या कार्याचा अभ्यास आजच्या तरुणाईने  करणे गरजेचे आहे.

विचारांच्या गर्तेत अडकलेल्या आणि भारत – हिंदूस्थान – इंडियात विभागलेल्या तरुणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच इतिहास नक्कीच प्रेरणा देणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मत मांडत असत. कारण त्यांना माहीत होते की, शिक्षण हेच आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय तरणोपाय नाही. त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अजून एक आवाहन देशातील तरुण वर्गाला करायचे की, तुम्ही खूप शिका. मोठे व्हा. स्वतःचे आयुष्य घडवा. तुम्ही शिकलात तरच तुमचे व तुमच्या कुटुंबासह या देशाचे भवितव्य बदलेल. आम्ही सर्व तरुणांनी त्यांच्या याच विचारांचा आधार घेऊन सतत शिकत राहिले पाहिजे.

ज्या समाजातून तुम्ही पुढे आलात त्यातील सामाजिक परिस्थिती तुम्ही पाहिलीच आहे. अशा समाजाला नवी दिशा देण्याचे आत्यंतिक महत्वाचे कार्य तुम्हाला करायचे आहे. जेणेकरून जी चळवळ सर्वसामान्य लोकांच्या उद्धारासाठी सुरू केली आहे ती चळवळ पुढे कायम राहील, असे आवाहन ते आपल्या भाषणातून नेहमी करत असतात. त्यासोबत तरुणांनी शिक्षणासोबतच आपले शील जपावे. कारण शीलवान माणसेच इतिहास घडवतात, त्यामुळे शिक्षणासोबतच प्रत्येकाने शिलास महत्व द्यावे. आत्मविश्वास हाच कोणत्याही संकटावरचा जालीम उपाय आहे. त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास असावा असे त्यांना वाटत असे. त्याच देशाचे भवितव्य आपल्या हाती असताना आपण खरेच ते सुरक्षित ठेवत आहोत का? हा प्रश्न आजच्या तरुणाईने स्वतःलाच विचारणे गरजेचे आहे.

या सर्व बाबींचा म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज समाजातील असंख्य तरुणांना आहे. आजचा तरुण शिकतो, मोठा होण्याची स्वप्ने पाहतो. पण त्यासाठी लागणाऱ्या कष्टांची तयारी कशी आणि किती करतो हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासोबतच आज कष्टाला पर्याय नाही हे तरुणांना पटत असेल का?  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कष्ट केले, अभ्यास केला, तार्किक विवेचन केले, नवा मार्ग शोधण्यासाठी उपाययोजना सुचवल्या, संघर्ष केला याचे अनुकरण आजच्या तरुणांनी करण्याची गरज आहे.

ज्या वयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवे वळण आयुष्याला दिले त्या वयात आज तरुण व्यसनांच्या आहारी जाऊन आपले, आपल्या कुटुंबाचे अर्थातच समाजाचे खुप मोठे नुकसान करता असतो. छोट्या – छोट्या गोष्टी मनावर घेऊन आज तरुण स्वतःचे आयुष्य संपवत आहे. यामागील कारणे काही असोत, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांनी दिलेल्या राष्ट्रसेवेच्या कार्याला ओझे समझत असल्यामुळे त्याला ते झेपत नाही असे वाटते.

ज्या काळात शिक्षणाच्या वा इतर बाबींची सोयीसुविधा नसतानादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:सह समाजाला घडविले. मग त्यामागे काय कारण असेल तर त्याला कारण अनेक आहेत. पण त्यातही एक म्हणजे घरातील संस्कार, प्रस्थापित समाजव्यवस्था, त्यांची स्वतःची जिद्द, चिकाटी. पण आज सकाळी उठल्यापासून आजच्या तरुणाईला टार्गेट, लेटर बॉम्ब, जिलेटीनच्या कांड्या, दंगल, जाळपोळ, मारामारी, भ्रष्टाचार, जातीय – धार्मिक द्वेष, विनयभंग, बलात्कार, यासह अनेक बाबी गुंतवून ठेवतात. तरुणांच्या मनाचा ताबा घेतात. त्यातून बाहेर पडायचे मार्ग त्यांना सापडतच नाही. किंबहुना त्यांना त्या मायाजालातून बाहेर पडावेसे वाटत नाही. त्याहूनही दुर्दैव म्हणायला हवे की, त्यांना कुणी बाहेर काढायचा प्रयत्न देखील करत नाही. त्यात अजून विदारक दुर्दैव असे की, जर असा कुणी प्रयत्न केला तर त्यालाच व्यवस्था दोषी ठरवत असते. अशा विचित्र कात्रीत आजचा तरुण सापडला आहे. अशावेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष सांगण्याची आवश्यकता आहे. त्यांना पटवून द्यावे लागेल की,  या भारतात असा एक महामानव जन्माला आला ज्याने सर्वांनाच जगण्याचा मार्ग दाखवताना मानसिक गुलामगिरीचे ओझे फेकून द्यायला लावले. एवढेच नव्हे तर स्वतंत्र विचार करायला भाग पाडले. त्यामुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांची जयंती साजरी केली जाते.

भारताच्या प्रत्येक तरुणाला या जयंतीनिमित्त या लेखाच्या माध्यमातून माझी विनंती आहे की,
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रस्थापितांनी दिलेल्या नजरेतून पाहू नका, त्यांच्यावर ठराविक वर्गाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अफाट राष्ट्र कार्याला बंदिस्त करू नका.
२) माझ्या तरुण मित्रानो, तुम्हांला या देशाचा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवले आहे मतदानाचा अधिकार देऊन. तो मतदानाचा अधिकार तुम्ही क्षुल्लक रुपयांत आणि व्यसनात वाया घालवू नका.
३) तुम्हाला शिक्षणच दारे  उघडून दिली. का? तुम्ही सृजनशील बनावं, त्यातून समाज उद्धाराचे, राष्ट्रनिर्माणाचे कार्य हाती घ्यावे म्हणून आणि अजूनही ज्यांच्यापर्यत शिक्षणाची गंगा पोहचली नाही त्यांच्यापर्यंत ती न्यावी म्हणून.

म्हणून तरुण मित्रांनो, जेंव्हा जेंव्हा आयुष्यात कधीही डोळ्यासमोर अविचार, मत्सर, नैराश्य, अपयश, वैचारिक गोंधळ इत्यादीमुळे कधीही अंधार आला वा मन खचायला लागले तर एकवेळ या प्रेरणेच्या अखंड झऱ्याचा शोध घ्या. तुमच्या डोळ्यासमोर आलेला अंधार एकदम नाहीसा होईल.

काही वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत(UPSC) फझल शाह नावाचे एक तरुण अधिकारी उत्तीर्ण झाले. ते काश्मीर मधून होते. त्यांना त्यांच्या या यशाचे रहस्य विचारले तर त्यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षातून प्रेरणा घेत मी यश संपादन केले. असे कितीतरी यशस्वी माणसे आज समाजात होऊन गेली, काही उभी आहेत ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या विचारणा शिरोधार्य मानून आपला जीवनप्रवास घडवला.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम नेहमी सांगायचे की, या देशातील तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करायला हवे.

डॉ. होमी भाभा असे म्हणतात की, थोड्याशा कालावधीमध्ये नदीच्या व खोऱ्याविषयी व तेथील प्रकल्पाविषयी घेतलेले निर्णय आणि आम्हाला मिळालेली प्रेरणा यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मूळ आहे.

असे अनेक व्यक्ती ज्या पुढे चालून आपल्या संघर्षाच्या जोरावर महान व्यक्ती बनल्या त्या सर्व महनीय व्यक्तिमत्वामागे त्यांनीच मान्य केल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आणि त्यांच्या संघर्षाची प्रेरणा होती. जर त्यांना जमत असेल तर नक्कीच आपणासही हा मार्ग यशाच्या किनाऱ्यावर घेऊन जाऊ शकतो. फक्त त्या प्रेरणेतून स्वतःच्या मनात दिवा पेटवण्याची गरज आहे.

एक काळ तर असा होता की, त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी कुणीच संबंध ठेवत नव्हते. त्या काळातही त्यांनी आपल्या मनावरील संयम वा धैर्य ढळू न देता आपले कार्य करत राहिले. म्हणून आज जर देशाला प्रगतिपथावर न्यायचे असेल तर नक्कीच देशातील तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघर्षगाथा अनुसरायला हवी. कदाचित त्यांच्या विचारातून तरुण तयारही होतील.

फक्त त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेले युवक आणि माणसे हवी आहेत. जी आपल्यातून निर्माण होणे गरजेचे आहे. या लेखाचा शेवट करताना मला एकच आठवण द्यावीशी वाटेल की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनात आणले असते तर नक्कीच आजच्या भाषेतील ऐषोरामातील जीवन जगू शकले असते. त्यांच्याही गाड्या, बंगले असते. त्यांच्या पत्नी रमाई यांनादेखील मोठेपणाचा आव आणता आला असता; परंतु त्यांनी वैयक्तिक ऐषोरामाला दूर करत ते देशासाठी, समाजसाठी, समाज बांधवांसाठी जीवन जगले. आपणही कधीतरी त्यांचा हा कित्ता गिरवला पाहिजे.

रोजच स्वतःसाठी जगतानाच कधीतरी देशासाठी अगदी नि:स्वार्थीपणे जगून पाहायला हरकत नाही. किती दिवस नोकरी करत करत त्यातून फक्त आर्थिक फायदा बघायचा. कधीतरी त्या सेवेतून इतरांनाही मार्ग मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तेंव्हाच या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षातून केलेल्या कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल. त्यासाठी त्यांचा विचार अंगिकारला पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हेच प्रेरक विचार देशातून आणि प्रत्येकाच्या मनातील वाईट आणि निराशेचे विचार काढून टाकतील.

थोडक्यात सांगायचे म्हणजे दारू, ड्रग्स आणि इतर व्यसनांच्या आहारी जाऊन चमचमत्या दुनियेतील पडद्यावरील लोकांना आपला आदर्श मानून लाइफस्टाइल बनवणाऱ्या तरुणाईने कधीतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन जीवन घडवावे ही आज देशाची अपेक्षा आहे.

आजच्या ह्या महामानवाच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी विचारांना आणि त्यांच्या अतुलनीय संघर्षला विनम्र अभिवादन!

श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाटद खंडाळा ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०/ ९०२१७८५८७४