असामान्य धैर्य दाखविणाऱ्या धैर्यवानांचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्याकडून कौतुक

मुंबई:- प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची, काळजी न करता समोर अडकलेला माणूस आपला कुटुंबीय आहे, असे मानून त्यांच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या धैर्यवानांचे काल मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक केले.

चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत गुरुवारी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव वाचविणाऱ्या सौरभ लंके, सुधाकर शेट्टी, अविनाश भाटे यांच्यासह बचाव कार्यात अग्रेसर असलेल्या इतर सहकाऱ्यांचे मंत्रालयात आज कौतुक करण्यात आले. या तिघांनी दाखविलेल्या धैर्यामुळे तब्बल २५ जणांचे प्राण वाचले. यावेळी आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव डी. के. जैन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, चेंबूर विभागाचे स्थानिक नगरसेवक सुषम सावंत आदी उपस्थित होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा अशी दुर्दैवी परिस्थिती ओढावते, तेव्हा सामान्य माणसाने काय केले पाहिजे याचे उत्तम उदाहरण या तिघांनी घालून दिले असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत जीवितहानी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *