यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती

मुंबई:- महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. २००४, २००९ आणि २०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.

२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते, मात्र सन २०१९ मध्ये या प्रमाणात १ हजार पुरुषांमागे ९११ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, “स्‍वीप” (SVEEP – Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात २००४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ एकूण मतदार होते.

२००९ लोकसभा निवडणुकीत एकूण ७ कोटी २९ लाख ५४ हजार ५८ मतदार होते.

यामध्ये ३ कोटी ८१ लाख ६० हजार १६२ पुरुष मतदार आणि ३ कोटी ४७ लाख ९३ हजार ८९६ महिला मतदारांचा समावेश होता.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत २ कोटी ४ लाख ७८ हजार ९३२ पुरुष मतदारांनी तर १ कोटी ६४ लाख ८७ हजार १९० महिला मतदारांनी नाव नोंदवले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ८ कोटी ७ लाख ९८ हजार ८२३ मतदारांनी नोंदणी केली. यामध्ये २ कोटी ६६ लाख २२ हजार १८० पुरुष मतदार होते तर २ कोटी २० लाख ४६ हजार ७२० महिला मतदार होते. आता २०१९ मध्ये ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ५७ लाख २ हजार ५७९ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी १६ लाख २५ हजार ८१९ महिला मतदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *