९३ वर्षांचा लढवय्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!
कॉम्रेड दत्ता खानविलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
ज्याचं स्मरण होताच आपसुकपणे नमस्कारासाठी हात जोडले जातात,
ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होत तेव्हा आपसुकपणे त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला जातो,
ज्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपसुकपणे मनात उत्साह असा निर्माण होतो, जीवनाचे सत्य समजून येते; अशा व्यक्ती आपल्या जीवनात येणे सुद्धा परमभाग्य असावं लागतं! असं परमभाग्य मी उपभोगलं आणि उपभोगतोय!
अशा परमप्रिय आदर्शवादी व्यक्तिमत्वाची आज ओळख करून देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी हा शब्दरूपी सुमनांचा लेख…!
आज आमच्या लाडक्या अण्णांचा ९३ वा वाढदिवस! अर्थात कॉम्रेड दत्ता खानविलकर हे आमचे लाडके अण्णा! त्यांना मी नेहमी योद्धा म्हणून पाहतो. फक्त ज्येष्ठ समाजसेवक म्हणून उल्लेख करण्यापेक्षा `लढवय्या ज्येष्ठ समाजसेवक’ असं म्हटलं तर योग्य ठरेल. कारण अण्णांचं संपूर्ण जीवनच लढण्यात गेलं आणि आजही ते लढवय्या वृत्तीने लढत आहेत. समाजसेवा करताना जर ती व्यक्ती लढवय्या नसेल तर समाजसेवेच्या व्रताला पूर्णत्व येणार नाही; कारण समाजसेवेची कामे करताना प्रशासनात-राजकारणात दरारा लागतो. तेव्हाच जनतेची सेवा योग्य पद्धतीने व उचित वेळेत होऊ शकते आणि हेच सद्गुण अण्णांमध्ये आजही आहेत!
लढवय्ये ज्येष्ठ समाजसेवक कॉ. दत्ता खानविलकर यांचा जन्म १० जानेवारी १९३१ रोजी झाला. त्यांचे शालान्त परीक्षेपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर कॉ. खानविलकरांनी आपली रेल्वेमधील नोकरी सांभाळून आपले समाजसेवेचे व्रत जोपासले व ते आजपर्यंत कसोशिने सांभाळीत आहेत. १९५०च्या दशकात कम्युनिस्ट पक्षात आल्यानंतर त्यावेळचे लालबागचे लोकप्रिय आमदार कॉ. कृष्णा देसाई, कॉ. दिनानाथ कामत, सा. गो. पाटकर, तंबिटकर, गुलाबराव गणाचार्य, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी, अशा दिग्गज नेत्यांच्या संपर्काने त्यांच्या समाजसेवेच्या कार्याला नवी झळाळी मिळाली.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा गोवा मुक्ती संग्रामाचा लढा असो वा त्यानंतरचे गिरणी कामगारांच्या प्रत्येक संघर्षात अण्णा हे अग्रणीच असायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा एक भाग म्हणून फ्लोरा फाऊंटन येथून सेनापती बापटांच्या नेतृत्वात निघालेल्या मिरवणुकीमध्ये कृष्णा देसाई, अहिल्या रांगणेकर, एस.जी. तांबिटकर गुलाबराव गणाचार्य यांच्या बरोबर खानविलकरांना अटक होऊन त्यांना अनेक दिवसांचा कारावास भोगावा लागला होता. अण्णांचे हे योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
कॉ. डांगे यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा ४२ दिवसाच्या संपात त्यांनी तनमन अर्पून कार्य केले. याच काळात १९७० साली कॉ. कृष्णा देसाई यांचा खून झाला. त्या खून खटल्यात ते प्रमुख साक्षीदार होते. आरोपींच्यावतीने राम जेठमलानी यांच्यासारखा मातब्बर, निष्णांत वकील बाजू मांडत होते. असे वकील जेव्हा समोर असतात किंवा उलटतपासणी घेतात तेव्हा साक्षीदार कितीही हुशार असला तरी त्याची तारांबळ उडते. तरीही वकील राम जेठमलानी यांच्या सर्व प्रश्नांना सामोरे जात अण्णांनी न्यायालयात सर्व आरोपींना ओळखले आणि झालेली घटना न्यायालयाला कथन केली. अण्णांनी अत्यंत संयमाने आणि निर्भिडपणे घडलेल्या कटु प्रसंगाची प्रत्यक्षदर्शी म्हणून खरी व खंबीरपणे साक्ष दिल्यामुळे राम जेठमलानीसारखे कायदेतज्ञ सुद्धा फिके पडले. त्याच आधारे सर्व आरोपींना सजा सुनावण्यात आली. आपल्या जीवाला आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असूनही अण्णांनी सत्य सोडलं नाही. अण्णा घाबरले नाहीत. अशा खटल्यात साक्षीदार फितूर होत असतात. पण अण्णांनी त्यावेळी दाखविलेले धाडस प्रत्यक्ष रणांगणात लढणाऱ्या योद्ध्यापेक्षा कमी नव्हते म्हणूनच ते आजही आदर्शवत आहेत.
अण्णांनी भारतीय तरूण संघ, लालबाग को-ऑप. क्रेडीट सोसायटी, डॉक्टर कम्पाउड येथील प्रोग्रेसिव्ह चाळ मध्यवर्ती संस्था, प्रथमेश को-ऑप. हौसिग सोसायटी आदी संस्थाची स्थापना केली. चिंचपोकळी उत्सव मंडळाचे ते तब्बल २५ वर्षे संस्थापक सदस्य होते.
आज ९३ वर्षाचा मनुष्य म्हटला की तो म्हातारा असणार; असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण अण्णांच्या बाबतीत ते झालेलं नाही. वयोमानानुसार शरीर थकलं असेल; पण अण्णा थकले नाहीत. आजही तीच समाजसेवेची जिद्द, आजही लढवय्या वृत्ती, आजही सडेतोड विचार, आजही महाराष्ट्रासाठी काम करण्याचे ध्येय, आजही सत्याला सामोरं जाण्याची धमक, आजही मनाने समाजसेवा करण्याची तळमळ त्यांच्याकडे आहे. नव्हेतर ती त्यांनी जोपासली आहे. `मला प्रसिद्धी नको!’ म्हणून ते नेहमीच आग्रही असतात. पण त्यांचे प्रचंड अनुभव, त्यांनी केलेले कार्य शब्दांकित करण्यासाठी एखाद्या लेखकाला अख्खं आयुष्य पुरणार नाही. अशा अण्णांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, पाक्षिक `स्टार वृत्त’कडून ९३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!
कॉम्रेड म्हणजे मित्र नव्हेतर सच्चा मित्र! कॉम्रेड म्हणजे साथीदार जो अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा राहून अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देतो. असा सच्चा दिलदार साथीदार म्हणून मला अण्णा नेहमीच `गुरुस्थानी’ आहेत. त्यांनी माझ्या जीवनाचा चढउतार पाहिला आहे. जीवनातील प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी यश देणारे ठरले. अण्णांकडून हे सगळं कार्य उभं झालं ते अण्णांच्या कोणत्या गुणामुळे? कोणत्या वृत्तीमुळे? ह्याचा शोध घेण्याचा मी नेहमीच प्रयास करतो. तेव्हा तेव्हा एकाच उत्तर मिळतं; ते म्हणजे अण्णा प्रेमळ आहेत. ते आपल्या मातृभूमीवर, देशावर, महाराष्ट्रावर, माणसांवर खरंखुरं प्रेम करतात. त्या प्रेमातूनच त्यांच्याकडून गेल्या सात दशकात जे कार्य झालं ते अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. अशा अण्णांची साथ वर्षानुवर्षे मिळावी; हीच परमात्म्याकडे प्रार्थना! अण्णांच्या ध्येयाची, कार्याची, आरोग्याची, आदर्शाची काळजी परमात्मा घेईल. त्यासाठी माझ्या प्रार्थनेची आवश्यकता मला वाटत नाही. अशा थोर अण्णांना माझ्याकडून नेहमीच मानाचा मुजरा!
– मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाकडूनही हार्दिक शुभेच्छा!
निर्मळ, निःस्वार्थी, प्रेमळ असणारा गुरु मार्गदर्शक म्हणून समोर येतो तेव्हा नतमस्तक व्हावंच लागतं! असं आदर्शवादी व्यक्तिमत्व म्हणून कॉम्रेड दत्ता खानविलकर अर्थात अण्णा यांना ९३ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक गोष्ट मुद्दामहून नमूद करावीशी वाटते; ती म्हणजे अण्णांचे शिक्षण क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या शिक्षण संस्थेत अर्थात परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कुलमध्ये झाले. त्याचा उल्लेख ते नेहमी आदराने करतात. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे आद्यसंस्थापक, शिक्षण महर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर यांनी समर्पित त्यागी जीवनातून उभारलेल्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्याने अण्णांसारखा गुरुतुल्य व्यक्तिमत्व उदयास आले. त्या संस्थेचे क्रियाशील सभासद असल्याचा आम्हाला आपसुकपणेच स्वाभिमान वाटतो आणि चुकीच्या, गैर गोष्टींना विरोध करण्याचे धाडस आमच्यामध्येही येते. असो; अण्णांना आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
– नरेंद्र हडकर
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’