स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!

I lहरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।।

‘रामराज्य!’

रामराज्याचं स्वागत मोठ्या श्रद्धेने आनंदाने आणि प्रेमाने गुरुवार दिनांक ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राममध्ये केलं.

श्रीरामाचे राज्य, परमात्म्याचे राज्य, परमेश्वर दत्तगुरु आणि आदिमाता महिषासुरमर्दिनी यांच्या पुत्राचे राज्य आणि ह्या रामराज्यामध्ये आपण सर्वजणांनी प्रवेश केलेला आहे. रामराज्याविषयी परमात्म्याने केलेले प्रवचन आम्ही ऐकलं आणि रामराज्याची संकल्पना आमच्या आमच्या कुवतीनुसार आम्हाला समजून आली.

रामराज्य म्हणजे आनंद.
रामराज्य म्हणजे खरेखुरे सुख.
रामराज्य म्हणजे शांती, तृप्ती, समाधान.
रामराज्य म्हणजे यश.
रामराज्य म्हणजे स्थैर्य.
रामराज्य म्हणजे उचित गती.
रामराज्य म्हणजे उचित प्रवास.
रामराज्य म्हणजे त्रिविध देहांचा विकास.
रामराज्य म्हणजे निर्भयता.
रामराज्य म्हणजे पुण्य.
रामराज्य म्हणजे त्रिविक्रमाचं निलयम्.
रामराज्य म्हणजे सर्वसमर्थंम् सर्वाथसमर्थं.
रामराज्य म्हणजे भक्ती आणि सेवेचा मिलाप.
रामराज्य म्हणजे परमात्म्याने भक्तांसाठी केलेली पार्शियालिटी.
रामराज्य म्हणजे म्हणजे परमात्म्याचे वचन.
रामराज्य म्हणजे रावणाचा विनाश.
रामराज्य म्हणजे सत्याचाच विजय.
रामराज्य म्हणजे पराक्रम.
रामराज्य म्हणजे श्रद्धावानांची फौज जी परमात्म्याचा प्रत्येक शब्द अंतिम आणि सर्वोच्च मानते.
रामराज्य म्हणजे परमात्म्याची सत्ता.
रामराज्य म्हणजे त्रिविक्रमाची सत्ता.
रामराज्य म्हणजे गुरुक्षेत्रमचा प्रभाव.
रामराज्य म्हणजे श्रद्धावानांचे परमात्म्याकडून संरक्षण.
रामराज्य म्हणजे श्रद्धावान भक्तांचा संपूर्ण उचित विकास.
रामराज्य म्हणजे वैयक्तिक ते जागतिक स्तरावर परमात्म्याचे नेतृत्व.
रामराज्य म्हणजे गेलेले जन्म, वर्तमानातील जन्म आणि पुढील जन्म सार्थकी लागतील ह्याची परमात्म्याकडून हमी.
रामराज्य म्हणजे ग्रामविकास.

अशा रामराज्याचा प्रवास सुरू झालाय. सद्गुरु श्री अनिरुद्धसिंह म्हणतात, “रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्थानकापासून सुरू होतो आणि ग्रामराज्य म्हणजे ग्रामविकास.”

हाच ग्रामविकास झाल्याशिवाय भारतवर्षामध्ये रामराज्य येणार कसं? म्हणून आमच्या बापूंची सगळी ही योजना. सात लाख खेड्यांमध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवांना आज खरी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि या योग्य मार्गदर्शनातूनच तो आपल्या शेतीमध्ये आवश्यक ते बदल करून आर्थिक स्तर उंचावू शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मोठा चिंतेचा विषय आणि आमच्या बापूंनी त्यांच्यासाठी सुरू केलेली उपाययोजना, त्यांच्यासाठी काय करता येईल याबाबत मांडलेले विचार, त्यामुळे खरोखरच सुस्पष्ट चित्र उभे राहिले. ग्रामविकास म्हणजे त्या खेड्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा सर्वांगिण विकास. खेडेगावात राहणाऱ्या ह्या माणसांना शेतीवरच अवलंबून राहावं लागतं. शेती निसर्ग चक्रावर अवलंबून असते. त्या शेतीमालाला योग्य भाव यायला हवा, शेतीतून त्या शेतकऱ्याचा आर्थिक फायदा व्हायलाच हवा. तरच तो आपल्या कुटुंबाला सुखात ठेवू शकतो, मुलांना शिक्षण देवू शकतो, त्यांचे विवाह वेळेवर करू शकतो. मात्र आज त्याला योग्य मार्गदर्शन नसल्याने कोणती झाडं लावावीत, त्याच्यापासून कसा व किती फायदा होवू शकतो? हेच त्याला माहिती नाही. म्हणूनच तो आर्थिक संकटात सापडतो. अशा शेतकऱ्यांसाठी ग्रामविकासाचा आमच्या बापूंनी केलेल्या आखणीचा थोडासा भाग समजताच ‘ग्रामविकास’ हा निश्चितच; ह्याची खात्री पटते.

कोकणातील शेती आम्ही जवळून पाहत आहोत. गावात राहून शेती करणारा शेतकरी आज आर्थिक अडचणीत आहे. त्याला योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे. आमच्या पडीक जमिनीत खैराची झाडं आपोआप रूजतात, मोठी होतात. मात्र त्याचं नियोजन करून लागवड करण्याची युक्ती शेतकत्यांना नाही. बोराची झाडं जंगलात आहेत, पण त्याचा उपयोग माहित नाही. अशा झाडांपासून आर्थिक उत्पन्न कसे मिळते? हे शिकविण्याची मोठी निकड आहे. मोहाच्या झाडाचे महत्व पटवून दिल्यावर शेतकऱ्याला त्या झाडाची किंमत कळू शकते. पावसाच्या पाण्याची योग्य प्रकारे साठवणूक केल्यास पाणी टंचाईवर शेतकरी मात करू शकतो. तसेच शेतीला जोडधंदे म्हणून पशुपक्षी पालन करून स्वतःला समृद्ध करू शकतो आणि सात लाख खेड्यातील शेतकरी संपन्न झाला की देश खऱ्या प्रगतीकडे वाटचाल करून येणाऱ्या काळात जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज होवू शकतो. आमच्या बापूंनी आखलेला हा कार्यक्रम रामराज्यासाठी अत्यावश्यक आहे आणि एकदा का बापूंनी कार्यक्रम जाहीर केला की त्यातून मिळणारा लाभ किती व कसा असतो? हे आम्हाला माहितीच आहे.

बापूनी तेरा कलमी कार्यक्रम ३ ऑक्टोबर २००२ ला जाहीर केला. चरख्यातून वस्त्र निर्मिती, बारमास पाणी शेती चारा योजना, रद्दी योजना, जुनं ते सोतं, प्रेमाची उब योजना, विद्या प्रकाश योजना, स्वच्छता मोहिम, अहिल्या संघ, धर्मग्रंथ-सत्यस्मृती, जनरल नॉलेज बँक, भारतीय भाषा संगम, इन्स्टिट्यूड ऑफ स्टडिडज् फाइव्ह कॉन्टिनन्टस्, आपत्ती निवारक दल असा तेरा कलमी कार्यक्रमातूनच रामराज्याची संकल्पना अधिकाधिक घट्ट होत होती.

आमच्या अनिरुद्धरामाने गोविद्यापीठमची स्थापना करून रामराज्याच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचा ठप्पा आमच्यासमोर आणून ठेवला. तेथील सर्वकाही परमात्म्याच्या योजना सुस्पष्ट दाखवत असतात.

आमच्या ह्या परमात्म्याची प्रत्येक कृती आम्हा प्रत्येकाचा सर्वांगिण विकास व्हावा ह्याचसाठी आहे. आम्ही कुठल्याही प्रसंगाला समर्थपणे तोंड देवू शकू अशी आमच्याकडून त्याला तयारी करून घ्यायची आहे. तो आमचा मित्र म्हणून आम्हाला स्पष्टपणे जाहीररित्या सगळ्या गोष्टी सांगतो. आमच्याकडून करून घेतो. तो हे का करतो? कारण तो आमच्यावर खरंखुरं प्रेम करतो. अशा खरंखुरं प्रेम करणाऱ्या मित्राची सोबत हवी असेल तर आम्हाला वैयक्तीक पातळीपासून सुरूवात करायला पाहिजे आणि वेगवेगळ्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. तरच आम्हाला त्याच्या रामराज्यात राहण्याचा परवाना मिळू शकतो. रामराज्यात राहण्याचा परवाना मिळविण्यासाठी आम्हाला समर्थ व्हायला हवे आणि ती समर्थता आम्हाला श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र अर्थात श्रीगुरुमंत्र देणार आहे. श्रीगुरुक्षेत्रम् मंत्राचा स्वीकार करून आपलासा करून आम्हाला श्रीगुरुक्षेत्रम्‌ला शरण जायला हवे. श्रीगुरुक्षेत्रम्‌ला शरण जाणे म्हणजेच त्रिविक्रमाला शरण जाणे, परमेश्वर दत्तगुरुंना शरण जाणे, आदिमाता महिषासूरमर्दिनीला शरण जाणे, हनुमंताला शरण जाणे, परमात्म्याला शरण जाणे, सद्‌गुरुला शरण जाणे. हीच शरणागती आम्हाला उचित – दिशेकडे उचित प्रवास करण्यासाठी उचित गती प्राप्त करून देणार आहे. म्हणूनच रामराज्याबद्दल बोलण्यापुर्वी आमच्या सद्‌गुरुने सर्व पातळीवर अनेक गोष्टी करून घेतल्या. हेच ते परमात्म्याचं अकारण कारूण्य.

हाच परमात्मा आम्हाला रामराज्याविषयी बोलताना वचन देतो; ती वचनं पाहिल्यानंतरच आम्हाला सत्याची जाणीव होईल.

■ रामराज्य आणणे हे माझे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे. रामराज्य येणारच १०८ टक्के! असा समर्थ भारतवर्ष जगाचं नेतृत्व करेल!

■ ‘रामराज्य’ संकल्पनेची मूलाधार आहे – महिषासूरमर्दिनी! जेव्हा तुम्ही रामराज्यासाठी कार्यरत राहता तेव्हा तुम्हाला महिषासूरमर्दिनीचा आशीर्वाद लाभतोच. ह्या रामराज्याचं मुळ गाभा आहे ग्रामराज्य म्हणजेच ग्रामविकास!

■रामराज्य म्हणजे काय? प्रजा सुखी आहे, प्रजा दुःखी नाही, प्रजा दुर्बल नाही, प्रजा दरिद्री नाही, प्रजा भुकेलेली नाही, प्रजा कुणाच्या शिव्या किंवा लाथा खात नाही! असं राज्य म्हणजे रामराज्य!

अशा रामराज्यात आम्ही प्रवेश केलेला आहे. आम्हाला रामराज्यातच राहायचे आहे. कारण श्रीअनिरुद्धरामाचे रामराज्य कसे असणार आहे? हे आम्हाला थोडसं का असेना समजलेलं आहे. थोडसं का म्हणतोय? कारण श्रीअनिरुद्ध रामाच्या रामराज्याचे वर्णन आमच्या सारख्या सामान्य मानवाला करताच येणार नाही.

|| हरि ॐ ।।
।।नाथसंविध।।

(सदर संपादकीय पाक्षिक `स्टार वृत्त’मध्ये शुक्रवार ११ जून २०१० रोजी प्रसिद्ध झाला होता.)

You cannot copy content of this page