मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन
मुंबई, दि. १२: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेंतर्गत वास्तूविशारदांनी आज सादरीकरण केले.
यावेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले. या प्रकल्पासाठी शासनाने 2500 चौ.मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल तर पुढील अठरा महिन्यात मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व डॉ.पी.अनबलगन आदी उपस्थित होते.