महाराष्ट्रातील दहा मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान
उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण
नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १० मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
दरवर्षी प्रजासत्त्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये कालच वर्ष २०२० च्या काही पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सकाळी पार पडलेल्या समारोहात ४ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वर्ष २०२० च्या उर्वरित पद्म पुरस्काराचे वितरण सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यामध्ये एकूण ६ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री. आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्री महिंद्रा हे महिंद्रा समुहाचे चेअरमन आहेत. जगभरातील १०० देशांमध्ये त्यांचे उद्योगसमूह आहेत.
डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री गंगाखेडकर हे वरिष्ठ विषाणूशास्त्रज्ञ आहेत. ते इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल ऍण्ड रिसर्च(ICMR) या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणुन काम केलेले आहे.
सरिता जोशी यांना हिंदी, मराठी, गुजरातीमध्ये अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करून गौरविण्यात आले. गेल्या ७ दशकात त्यांनी दूरचित्रवाणी, नाटक आणि सिनेजगतात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
कंगना राणावत यांना हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय क्षेत्रातील कार्यासाठी आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती राणावत यांना त्यांच्या सिनेजगतातील उत्कृष्ट अभिनयासाठी आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरिवण्यात आलेले आहे. यासह त्यांनी महिलाप्रधान चित्रपट अधिक केलेले आहेत.
सिनेक्षेत्रातील गायनासाठी अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री. सामी हे संगीतकारही आहेत. ते जलद पियानो वादनासाठी ओळखले जातात.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना ५ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी ३ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने आज दुसऱ्या टप्प्यात सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सुरेश वाडकर यांना त्यांच्या अविट आवाजाने मराठी, हिंदीसह अन्य भाषेतील गायनासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी एकता कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरचित्रवाणी तसेच चित्रपट सृष्टीतील वैविध्यपूर्ण मालिका तसेच चित्रपट निर्माता म्हणून श्रीमती कपूर यांची स्वतंत्र ओळख आहे. दूरचित्रवाणीवरील त्यांच्या मालिकांनी घराघरात लोकप्रियतेचा कळस गाठलेला आहे.
करण जोहर यांनाही कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी सिने जगतात त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित तसेच निर्देशित केलेल आहेत. मागील २ दशकांमध्ये त्यांनी एका पेक्षा एक असे मनोरंजनपूर्ण हिंदी चित्रपट बनविले आहेत.
पोपटराव पवार यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी पद्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी गौरिवण्यात आले.
वर्ष २०२० मध्ये विविध क्षेत्रातील ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १६ मान्यवरांना पद्म भूषण आणि ११८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील १३ मान्यवरांचा समावेश आहे.