उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२१
शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २२
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष दशमी १४ नोव्हेंबरच्या पहाटे ०५ वाजून ४८ मिनिटापर्यंत
नक्षत्र- शततारका दुपारी १५ वाजून २३ मिनिटापर्यंत
योग- व्याघात १४ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून १५ मिनिटापर्यंत
करण १- तैतिल संध्याकाळी १७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत
करण २- गरज १४ नोव्हेंबरच्या पहाटे ०५ वाजून ४८ मिनिटापर्यंत
चंद्रराशी- कुंभ अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४७ मिनिटांनी
सूर्यास्त- संध्याकाळी १७ वाजून ५९ मिनिटांनी
चंद्रोदय- दुपारी १४ वाजून २९ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री ०१ वाजून ३४ मिनिटांनी
भरती- सकाळी ०७ वाजून २४ मिनिटांनी आणि रात्री २० वाजून १७ मिनिटांनी
ओहोटी- रात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून १९ मिनिटांनी
———–
दिनविशेष:-
आज आहे जागतिक दयाळूपणा दिन.
हा दिवस १९९८ सालापासून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाची संकल्पना जागतिक दयाळू चळवळीतून निर्माण झाली. यामध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंड, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांचा पुढाकार होता. सर्व लोकांनी एकत्र यावे, माणुसकी जपावी, हिंसात्मक कृत्यांना आळा बसावा अशा उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
ऐतिहासिक दिनविशेष:-
१८७३ साली पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते लेखक, विधिज्ञ, राजकीय पुढारी, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरु होते. पुणे करारावर स्वाक्षर्या करणार्या नेत्यांमध्ये यांचा समावेश होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नाही; तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले. या दृष्टीने १९३१ साली झालेला ’गांधी–आयर्विन करार आणि १९३२ साली झालेला पुणे करार यामध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.
१९१३ साली रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले. ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते.
१९१७ साली महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. सांगलीतील, मिरज तालुक्यात असलेल्या पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.