महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण
सातारा:- प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
महिला धोरण आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, मात्र आता महिला धोरणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य अशीही महाराष्ट्राची ओळख नवीन धोरणामुळे होणार आहे. महिलांसोबत LGBTQ ( इतर लिंगी समुदाय ) समुदायाचा या धोरणात आवर्जून समावेश करण्यात आलेला आहे. असा समावेश असलेले हे बहुधा देशातील पहिलेच धोरण आहे. महिला धोरण हे केवळ कागदावरच राहणार नाही, तर माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे. शिवाय महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्सही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहिल तसेच, या धोरणात आखून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तताही युद्धपातळीवर होऊ शकेल.या धोरणामुळे जेंडर बजेटची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
चौथ्या सुधारित महिला धोरणाच्या निर्मितीत महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी, लोकप्रतिनिधींनी, तज्ज्ञांनी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला संघटनेने, युनिसेफ तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतलेला असल्याचेही ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.