शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– शिवजयंती निमित्त आज पुरातत्व व वास्तूसंचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी श्री. जाधव, मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी, वायरी – भूतनाथ ग्रामपंचयात कर्मचारी व किल्ल्यावरील नागरिक उपस्थित होते.

या मोहिमेवेळी किल्ल्यावरील प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिकच्या पिशव्या उचलण्यात आल्या. तसेच अनावश्यक वाढलेले गवत, झाडे-झुडपे हटवण्यात आले. पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ करण्यात आला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्ग किल्ला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. किल्ल्यावर प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात होतो. किल्ला स्वच्छ रहावा, तसेच विघटन होणारा व विघटन न होणारा कचरा वेगवेगळा करता यावा यासाठी कचरा कुंड्या पुरवण्यात येतील. अनेक स्वयंसेवी संस्था नियमितपणे किल्ल्या स्वच्छतेसाठी काम करत आहेत. त्यांना प्रशासनाकडून सर्वते सहकार्य करण्यात येईल.

सुरुवातीस किल्ल्याच्या तटबंदीवरून हेरिटेज वॉक करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांना किल्ल्याचा इतिहास आणि माहिती देण्यात आली. त्यानंतर किल्ल्यावरील शिवछत्रपतींच्या मंदिरात शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर किल्ल्यावरील मावळ्यांच्या वारसांना सात-बाराचे वाटप जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.

You cannot copy content of this page