समाजकार्यातून वैचारिक मंथन आणि वैचारिक मंथनातून समाजकार्याचा शुभारंभ!
समाजासाठी अगदी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची मानसिकता दुर्मिळ होत असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नावासाठी – प्रसिद्धीसाठी समाजकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बॅनरबाजी करून – सोशल मीडियाचा वापर करून जनतेच्याच पैशाने होणार्या कामांचेही श्रेय घेणारी तथाकथीत पुढारी मंडळी आमच्या सदैव डोळ्यासमोर राहते.
पण आपण केलेले समाजकार्य दुसऱ्याला सांगून बढाया मारायच्या नाहीत, केलेल्या समाजकार्यातून स्वतःची प्रसिद्धी करायची नाही; असे तत्व वर्षानुवर्षे जपून सन्माननीय अनिल तांबे साहेबांनी दुसऱ्या बाजूने बहुजन समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आवश्यक असणारे रोखठोक ज्वलंत विचार देण्याची किमया साधली; त्या सन्मानिय अनिल तांबे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ माझ्या चिरंतर स्मरणात राहील. कारण त्यावेळी अनिल तांबे साहेबांनी व्यक्त केलेले मनोगत म्हणजे पुढील ५० वर्षात समाजकार्य कसे करावे आणि ते तसेच का करावे? हे स्पष्टपणे सांगणारे सुक्ष्म, सखोल, दिर्घ अभ्यासांती आणि अनुभवाधिष्टित विचार होते.
२० मार्च २०२० रोजी सन्मा. अनिल तांबे यांचा यथोचित गौरव करणारा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ होणार होता; परंतु अचानक कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीने संपूर्ण जगाला बंधिस्त करून टाकले होते. त्यामुळे हा कार्यक्रम २७ मार्च २०२२ रोजी म्हणजे बरोबर दोन वर्षांनी संपन्न झाला; त्याहीपेक्षा सन्मा. अनिल तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जे विचारांचे मंथन केले; त्या मंथनातून भविष्यात समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली – त्याचा शुभारंभ झाला! असं मला नव्हे तर उपस्थित अनेक विद्वान मान्यवरांना वाटलं.
कारण सन्मा. अनिल साहेबांनी मांडलेले विचार समाजहितास गती देण्यासाठी यथायोग्य होतेच!
त्याशिवाय समाजातील स्वतःला शिक्षणाने, संपत्तीने आणि सत्तेने उच्चभ्रू समजणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणारे होते!
प्रत्येकाने त्यावर विचार करून कृती करण्यासाठीचे आव्हान होते!
समाजातील वास्तव परखडपणे मांडून भविष्यात नेमकं काय करायला पाहिजे? याचे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा आराखडा होता!
अनिल साहेबांचे विचार भविष्यात आधुनिक सामाजिक क्रांतीचे बीज रोवणारे आहेत; असे आमचे स्पष्ट मत आहे!
अशा विचारांची भारावलेली माणसंच इतिहास घडवतात!
सन्मा. अनिल तांबे साहेब नेमकं काय बोलले? त्यांनी नेमके कोणते विचार मांडले? हे आपण प्रत्यक्षपणे आमच्या पाक्षिक `स्टार वृत्त’च्या युट्युब चॅनेलवर खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता!
https://youtu.be/-L6it2Pg-Ag
मा. अनिल साहेबांचा षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार सोहळ्यात सन्मा. अनिल साहेबांचे कर्तृत्व आणि कार्य सर्व मान्यवरांनी सुंदर शब्दात व्यक्त केले. त्यावेळी गौरव विशेषांकाचे प्रकाशनही झाले. त्या गौरव विशेषांकात अनेक मान्यवरांनी लेख लिहून अनिल साहेबांच्या कार्यास सलामी दिली. मा. अनिल तांबे साहेबांनी सर्वांचे आभार व्यक्त करून जे विचार मांडले ते विचार कृतीत – कार्यात रूपांतर करण्याचा शुभारंभ याच दिवशी `सिंपन’च्या माध्यमातून केला; असं अभिमानाने सांगावस वाटतं.
कारण मी कसा घडलो? माझ्यासमोर कोणते ध्येय आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनिल साहेबांनी मांडलेल्या विचारांमध्ये होती. माझ्या सव्वीस वर्षांच्या पत्रकारितेत असे प्रामाणिक, स्पष्ट, निर्मळ व्यक्तिमत्व मला खूप क्वचितपणे सापडलं. व्याख्यानं – भाषणं देणारे, मनाला छान वाटेल असं बोलणारे खूप असतात; पण आपण मांडलेल्या विचार ठाम राहून त्या दृष्टीने समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी नियोजनबद्ध कृती करणारे सन्मा. अनिल तांबे लाखात एक असतात म्हणून आम्ही हा संपादकीय लेख त्यांच्या गौरवासाठी आणि त्यांना जीवनभर साथ देणाऱ्या शीतल वहिनींसाठी समर्पित करीत आहोत!
सन्मा. अनिल तांबे साहेबांच्या विचारांवर समाजाने चिंतन करावं – मनन करावं आणि प्रत्येकाने त्यावर आपापले मत नोंदवावे. विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी ते विचार समजून घेणे गरजेचे आहे, असं आमचं मत आहे आणि त्यासाठी अनिल तांबे षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार समितीला माझे आवाहन आहे की, ह्यावर सखोल मंथन करून बहुजन समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सन्मा. अनिल तांबे साहेबांच्या विचार नेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने मा. अनिल तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विचारातून सुरु झालेल्या कार्याला सहकार्य करण्यासाठी लाखो हात पुढे येतील.
-नरेंद्र हडकर