बेळणे येथे आशा प्रकल्पांतर्गत वृध्दाश्रमाचा भूमिपूजन- अक्षरोत्सव प्रदर्शनाला प्रतिसाद

तळेरे (प्रतिनिधी):- भांडुप येथील विजय क्रिडा मंडळाच्या महत्वाकांक्षी आशा प्रकल्पांतर्गत नियोजित वृध्दाश्रमाचे भूमिपूजन व नुतन गणेश मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गोपाळ कलपाटी व विजय कासले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळणे गावातील तसेच मुंबईतील विजय क्रिडा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भांडुप येथील नामांकीत विजय क्रिडा मंडळाने बेळणे येथे निराधार वयोवृध्द नागरिकांस विनामूल्य सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून वृध्दाश्रमाची संकल्पना मांडली. त्याला मुर्त रुप येण्यासाठी नियोजित वृध्दाश्रमाचा भूमिपूजन सोहळा तसेच नुतन गणेश मंदिरात श्री गणरायाची प्राण प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली. भविष्यात बेळणे येथील या वृध्दाश्रमात निराधार असलेल्या वयोवृध्दांना मोफत सेवा दिली जाणार आहे. विजय क्रिडा मंडळाच्या इतर अनेक प्रकल्पांमधील हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या “अक्षरोत्सव” संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी देश परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे प्रदर्शित करण्यात आली होती. यावेळी विजय क्रिडा मंडळाचे अध्यक्ष संतोष कासले, नायब तहसीलदार खरात, बेळणे सरपंच दिक्षा चाळके यांच्यासह विजय क्रिडा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्थिक मदतीचे आवाहन…
विजय क्रिडा मंडळाच्या या आशा प्रकल्पाच्या मदतीसाठी यथाशक्ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी इच्छुकांनी विजय क्रिडा मंडळाच्या बैंक ऑफ इंडिया विक्रोळी शाखेतील खाते क्र. 010010210000074 या खात्यात रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.