जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगर:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. २४ ते २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी गार्डन बाहेरील पटांगण, मोती तलाव जवळ आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समनवय अधिकारी नितीन काळे यांनी दिली.

जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्गात माविम अंतर्गत ग्रामीण भागात १३६ गावात, १ हजार १४ बचत गटांच्या माध्यमातून एकूण ११ हजार ६७ महिला, तसेच शहरी भागात ५८ प्रभागात (वॉर्डमध्ये) २७५ बचत गटांच्या माध्यमातून एकूण २ हजार ८४९ महिला असे एकूण १३ हजार ९१६ महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे.

(नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माविम बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक २४ ते २७ फेब्रुवारी २०२४ असे एकूण चार दिवसाचे प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात शालेय मुलींचे दशावतार नाटक, खेळ पैठणीचा, महिला विविध गुणदर्शन कार्यकम इ. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.