पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन

 

 

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरिक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने एकटेच राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक होताना दिसून येत आहे. काही ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करण्याची माहिती नसल्याने ते कोणत्यातरी अनधिकृत मल्टि लेव्हल चैन मार्केटींगच्या कंपनीमध्ये किंवा कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याच्या आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. परंतु बऱ्याचदा त्यांची आर्थिक फसवणूक झालेली दिसून येते.

ज्येष्ठ नागरीकांची सायबर व आर्थिक फसवणूक होऊ नये, तसेच त्यांनी सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, बैंक व पोस्टचे अकाऊंट, ATM कार्ड, क्रेडीट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलआयसी, पीपीएफ इ. बाबतची माहिती गैरव्यक्ती पर्यंत पोहचू नये, आर्थिक सक्षम ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या घराजवळील परिसरात CCTV कैमेरे, सुरक्षित कंपाऊंड इ. उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करणे, अनोळखी तसेच परप्रांतिय व्यक्ती यांच्यांशी संपर्कात आल्यानंतर घ्यावयाची दक्षता, शासनाच्या ज्येष्ठ नागरीकांशी संबंधित योजनांची माहिती, फिरस्त्या व्यक्तींकडून वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी, घरातील मौल्यवान वस्तु, दागिणे, पैसे इ. ठेवताना घ्यावयाची दक्षता इत्यांदी विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन कराण्यासाठी दि. २३ फेब्रुवारी २०२४ ते दि. २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ज्येष्ठ नागरिक जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त ज्येष्ठ नागरीकांची फौजदारी प्रकरणांची प्राधान्याने निर्गती करणे, पंचायत समिती, तहसिलदार कार्यालय, नगरपालिका, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ज्येष्ठ नागरीकांचे आसपास राहणारे स्वयंसेवक, सामाजिक संस्था, वृद्धाश्रम यांच्याशी योग्य समन्वय ठेवून शहर व गावनिहाय प्रत्येक ज्येष्ठ नागरीकांपर्यंत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस दुरक्षेत्र अंमलदार पोहचून ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याच्या तसेच, पोलीस दलाची तात्काळ, तत्पर मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन नं. ११२ बाबत माहिती तसेच सर्व पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

या अभियानामध्ये जिल्हा, तालुका व गाव स्तरांवरील सर्व प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, बँकांचे मॅनेजर, पोस्ट ऑफिसर, ज्येष्ठ नागरीकांसाठी काम करणाऱ्या संस्था, सर्व विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटना, स्वयंसेवक, पोलीस पाटील, पत्रकार यांनी सहभागी राहून अभियानाचा उद्देश सफल करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page